अहिल्या नगर : एका विशिष्ट समाजातील धर्मगुरूंच्या नावे अज्ञाताने रस्त्यावर काढलेल्या रांगोळीमुळे अहिल्या नगर येथे दोन गटात प्रचंड तणाव निर्माण झाला. हा तणाव निर्माण करण्यामागे पूर्वनियोजित कट असल्याची प्रार्थमिक माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
धर्मगुरूंच्या नावे रांगोळी काढून त्यांची विटंबना केल्याचा दावा करण्यात आला. हे कृत्य करणाऱ्या अज्ञाताविरोधात कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी अहिल्या नगरमधील कोटला गावात आंदोलक रस्त्यावर जमले होते. मात्र काही क्षणातच या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. या प्रकरणाची दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे.
यवतमाळ येथे माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अहिल्या नगरमध्ये तणाव निर्माण करण्यामागे काही षडयंत्र आहे का?, हे आपल्याला पाहावे लागेल. तेढ कोण निर्माण करत आहे, हेही पाहणे आवश्यक आहे. लोकसभा निवडणुकीतही हाच प्रकार घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आताही त्याच प्रकारे कोणी आपल्यात ध्रुवीकरण करत आहे का?, असा प्रश्न देखील त्यांनी केला. सोबतच, प्रत्येकाला आपला धर्म पाळण्याचा आधिकार आहे, परंतु अशा प्रकारे लोकांमध्ये तणाव निर्माण करणे चुकीचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तणावाच नेमक कारण काय?
माध्यमांद्वारे मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्या नगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे एका अज्ञाताने रस्त्यावर धर्मगुरूंची रांगोळी काढत, त्यांची विटंबना केल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. सोमवारी याच तणावाने आंदोलनाचे रूप घेतले आणि काही कार्यकर्त्यांनी अहिल्या नगर- संभाजी नगर रोडवरील कोटला गावात रस्ता अडवत आंदोलन सुरू केले.
संबंधित तरुणाला ताब्यात घेतले असून आता आंदोलन करण्याची गरज नाही, असे पोलीस आंदोलकांना समजावून सांगत होते. मात्र आंदोलक काही केल्या ऐकायला तयार नव्हते. काही आदोलकांनी पोलीसांवर दगडफेक करत गोंधळ निर्माण केला. ज्यात सात पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती माध्यमांकडून मिळत आहे.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलीसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आली असून संबंधित गावात तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलनाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ३० आंदोलकांवरही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, कुठल्याही अफवा किंवा गैरसमजांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी, जेणेकरून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. असे आवाहन अहिल्या नगर पोलीसांनी सर्व जनतेला केले आहे.