मुंबईत 'या' अनोख्या दोन दुर्मीळ पक्ष्यांचे एरंगळ किनाऱ्यावर आगमन

29 Sep 2025 08:33:41
rare bird in mumbai

छायाचित्र - मयुरेश परब

मुंबई (विशेष प्रतिनिधी) -
मालाडच्या पश्चिमेकडे असलेल्या एरंगळ किनाऱ्यावर 'युरेशियन आॅयस्टर कॅचर' म्हणजेच कालव फोड्या आणि 'काॅमन रिंगड् प्लोवर' म्हणजेच मोठा कंठेरी चिखल्या पक्ष्याचे आगमन झाले आहे (rare bird in mumbai). स्थलांतरी असणारे हे पक्षी फार तुरळक संख्येने महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर स्थलांतर करतात (rare bird in mumbai). एरंगळ किनारी या पक्ष्याचे दर्शन घडत असल्यामुळे शहरातील पक्षीनिरीक्षकांची पाऊले या किनाऱ्याकडे वळली आहेत (rare bird in mumbai).

मुंबईच्या पश्चिम किनारपट्टीवर एरंगळ नावाचा छोटा किनारा आहे. या किनाऱ्यावर दोन दिवसांपूर्वी 'युरेशियन आॅयस्टरकॅचर' आणि काॅमन रिंगड् प्लोवर' पक्ष्याचे आगमन झाले आहे. किनाऱ्यावरील संत बोनाव्हेंचर चर्चच्या समोरील वाळूच्या पुळणीवर आणि त्याला लागून असणाऱ्या खडकाळ किनाऱ्यावर या पक्ष्यांचा वावर आहे. त्यामुळे या पक्ष्याला पाहण्यासाठी पक्षीनिरीक्षक भर पावसातही या किनाऱ्याला भेट देत आहे. या दोन्ही पक्ष्यांच्या आगमनाने मुंबईत हिवाळी स्थलांतरी पक्ष्यांच्या आगमनाला देखील सुरुवात झाली आहे.

कालव फोड्या पक्षी स्थलांतरित असून तो पश्चिम युरोप, रशियाचा पश्चिमेकडील भाग आणि चीन व कोरियाच्या पश्चिम किनारपट्टी प्रदेशात प्रजनन करतो. तर भारतासह आखाती देश आणि आफ्रिकेच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवर स्थलांतर करतो. भारतामध्ये दाखल होणारे हे पक्षी चीन आणि कोरियामधून स्थलांतर करुन येत असावेत, असा अंदाज आहे. हे पक्षी प्रामुख्याने पालघर, वसई येथील किनारपट्टीवर प्रामुख्याने दिसतात. मध्य आणि दक्षिण कोकणात त्यांच्या फार कमी नोंदी आहेत. 'युरेशियन आॅयरस्टरकॅचर' हा पक्षी नावाप्रमाणेच कालवे फोडून खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. या पक्ष्यांमधील मादी आणि नर रंगाने सारखेच दिसत असले, तरी मादीची चोच ही नरापेक्षा मोठी असते. 'काॅमन रिंगड् प्लोवर' हा पक्षी आकाराने लाव्या पेक्षा लहान असतो. त्याचे जाड गोल डोके असते. उघडे पिवळे पाय असतात. त्याची कबुतारासारखी चोच असते. वरून वाळूसारखा उदी खालून पांढरा असतो. त्याचे कपाळ पांढरे असते व डोके व कानाच्या पिसे काळी असतात. डोळ्याभोवती काळा रंग असतो. गळ्याभोवती पांढरा पट्टा असतो. हा पक्षी 'युरेशियन आॅयरस्टरकॅचरपेक्षाही मुंबईकरिता दुर्मीळ आहे.

तुरळक नोंदी
मुळातच कालव फोड्या आणि मोठा कंठेरी चिखल्या हे पक्षी तुरळक संख्येने मुंबईत स्थलांतर करतात. इतर हिवाळी स्थलांतरी पक्ष्यांप्रमाणे ते मुंबईत थव्याने स्थलांतर करत नाहीत. त्यांची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढीच असते. त्यामुळे मुंबईसाठी या पक्ष्याच्या नोंदी तशा दुर्मीळ आहेत. - डाॅ. राजू कसंबे, ज्येष्ठ पक्षीअभ्यासक

कंठेरी चिखल्याचा बहुदा थांबा
एरंगळ किनाऱ्यावर साधारण सातच्या संख्येने मोठा कंठेरी चिखल्या पक्षी दिसत आहेत. हे पक्षी बहुदा याठिकाणी विश्रांतीसाठी थांबले असण्याची शक्यता डाॅ. कसंबे यांनी वर्तवली. हे पक्षी बहुतेक पॅसेज मायग्रंट असावेत, असे त्यांनी सांगितले. कारण पूर्व रशियामध्ये प्रजनन करणारे या पक्ष्यांमधील 'टुंड्रे' नावाची उपप्रजाती ही पर्शियन गल्फमधून सोमालिया (पूर्व आफ्रिका) येथे स्थलांतर करते. त्यामुळे कदाचित हे पक्षी इथे थांबून त्यानंतर अरबी समुद्रावरुन उडत ८ हजार किलोमीटरचा प्रवास करणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली.
Powered By Sangraha 9.0