अंतरंगाचे पदर उलगडताना...

29 Sep 2025 12:11:16

रंगूनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा, गुंतूनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा.‌’ सुरेश भटांच्या या ओळी म्हणजे, माणसाच्या एका विशेष प्रवृत्तीचे वर्णन करणाऱ्या आहेत. माणूस हा एक सामाजिक प्राणी असल्याने त्याच्या अस्तित्वासाठी, जीवनवृद्धिसाठी त्याला भोवती माणसं आवश्यकच असतात. यातूनच पुढे समूहमनाची निर्मिती झाली आणि पुढे संस्कृती उदयाला आली. उत्क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाचे भावविश्व नव्याने आकार घेऊ लागले. आधुनिक काळात हे भावविश्व टिपण्याचा मार्ग वैज्ञानिक प्रगतीमुळे सुकर झाला. परिणामी माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे अंतरंग आपल्याला लक्षात येऊ लागले. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे प्रकार, माणसाच्या मनावर असलेले प्रभाव या सगळ्या गोष्टींच्या अभ्यासातून मानसशास्त्राच्या कक्षा रुंदावल्या. या कक्षांमुळे आज आपल्याला माणसाच्या निरनिराळ्या छटा टिपता येतात. ‌‘इन्ट्रोव्हर्ट‌’ अर्थात अंतर्मुखी, ‌‘एक्सट्रोव्हर्ट‌’ अर्थात बहिर्मुखी यांच्या जोडीला आता ‌‘ओट्रोव्हर्ट‌‘ ही नवीन संज्ञा उदयास आली आहे.

अमेरिकेतील नामांकित मानसोपचारतज्ज्ञ डॉ. रामी कामिन्स्की यांनी नुकतेच ‌‘ओट्रोव्हर्ट‌’ या संज्ञेला जन्म दिला. ही संज्ञा अशा लोकांसाठी वापरली जाते, ज्यांना सहजासहजी आपण ‌‘इन्ट्रोव्हर्ट‌’, ‌‘एक्सट्रोव्हर्ट‌’ ही विशेषणे आपण लावू शकत नाही. सुरुवातीला व्यक्तिमत्त्वांच्या प्रकाराची ही मांडणी समजून घेऊ. ‌‘इन्ट्रोव्हर्ट‌’ व्यक्तीला सामाजिक व्यवहारांमध्ये फारसा सहभाग न घेता, निवडक लोकांच्या सहवासात किंवा एकटे राहायला आवडते. ‌‘इन्ट्रो‌’ म्हणजे (आत, अंतर्गत) तर ‌‘व्हर्ट‌’ म्हणजे (वळवणे) या दोन लॅटिन शब्दांपासून, ही संज्ञा तयार झाली. या संज्ञेचा विरुद्धाथ शब्द म्हणजे ‌‘एक्सट्रोव्हर्ट‌’. अर्थात ज्याला एकटे राहण्यापेक्षा सामाजिक व्यवहारांमध्येच अधिक रस असतो. स्वीस मानसशास्त्रज्ञ कार्ल युंग यांनी 1921 साली, या दोन संज्ञा मांडल्या. युंग यांच्या संकल्पनांवर पुढे अनेक मानसशास्त्रज्ञांनी संशोधन केले. 1927 मध्ये अमेरिकेतील मानसशास्त्रज्ञ किमबॉल यंग यांनी, ‌‘ॲम्बिव्हर्ट‌’ ही नवी संज्ञा आपल्या ‌‘सोर्स बुक फॉर सोशल सायकोलॉजी‌’ या आपल्या पुस्तकात जन्माला घातली. यंग यांच्या मते, बहुतांशी लोकं ही अंतर्मुख किंवा बहिर्मुख नसतात, तर या दोन्ही गुणांचे मिश्रण आपल्याला त्यांच्यामध्ये बघायला मिळते. लोकांमध्ये मिसळणे, वेगवेगळ्या सामाजिक कार्यांमध्ये सहभाग घेणे, याचसोबत एकांतवाससुद्धा त्यांना प्रिय वाटतो. अशातच आता डॉ. रामी कामिन्स्की यांच्या नव्या संज्ञेने, अनेक अभ्यासकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

‌‘ओट्रोव्हर्ट‌’ या संज्ञेचा अर्थ म्हणजे, एखादे असे व्यक्तिमत्त्व जे भावनिकदृष्ट्या सामाजिक व्यवहारांपासून अलिप्त असतात. मात्र, भौतिकदृष्ट्या ते लोकव्यवहारामध्ये उपस्थित असू शकतात. ‌‘ओट्रोव्हर्ट‌’ व्यक्तिमत्त्वाचे लोक भावनिकदृष्ट्या स्वावलंबी असतात, त्यासाठी ते सामाजिक व्यवहारांवर अवलंबून नसतात. परंतु, म्हणून ही माणसं रुढार्थाने ‌‘ॲम्बिव्हर्ट‌’ नसतात. कारण, ‌‘ॲम्बिव्हर्ट‌’ व्यक्ती आपले वर्तन अंतर्मुखी आणि बहिर्मुखी या वर्तनांमध्ये बदलू शकते. परंतु ‌‘ओट्रोव्हर्ट‌’ व्यक्ती ही संज्ञा एका विशिष्ट सातत्याने अलिप्तपणाची भावना व्यक्त करणाऱ्या माणसांबद्दल व्यक्त करण्यात आली आहे. परंतु, हा अलिप्तपणा नकाराथ नाही. मोठमोठ्या समूहांमध्ये वावरण्यापेक्षा, त्या समूहांचे निरीक्षण करणे, मोजक्याच लोकांसोबत व्यवहार करणे हे यांचे विशेष लक्ष्य.

डॉ. रामी कामिन्स्की यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व याच प्रकारात मोडते. मागची अनेक वर्षे त्यांना या गोष्टीची प्रचिती येत होती. त्यांच्याकडे समुपदेशनासाठी येणाऱ्या अनेक लोकांनासुद्धा हेच वाटत होते. अखेर या विचाराला त्यांनी आपल्या ‌‘द गिफ्ट ऑफ नॉट बिलोंगिंग‌’ या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केले. कामिन्स्की म्हणतात की, “फ्रिडा काहलो, फ्रान्झ काफ्का, अल्बर्ट आईनस्टायीन अशा अनेक दिग्गजांचा कल ‌‘ओट्रोव्हर्ट‌’ या व्यक्तिमत्त्व प्रकाराकडेच असल्याचे आपल्याला बघायला मिळते. ‌‘ओट्रोवर्ट‌’ या शब्दाला ‌‘ओमनीव्हर्ट‌’ या संज्ञेसोबत जोडण्याची गल्लत होऊ शकते. मात्र, ‌‘ओमनीव्हर्ट‌’ या संज्ञेचा अर्थ आहे एक असे व्यक्तिमत्त्व, ज्याची मनस्थिती टोकाच्या अंतर्मुखता आणि बहिर्मुखता यांच्यामध्ये वावरत असते.

मानसशास्त्रातील या गुंतागुंतीच्या संज्ञा सामान्यांसाठी कितीही किचकट वाटत असल्या, तरी एकार्थाने त्या मानसशास्त्राचे, मानवी भावभावनांच्या व्यवहारांचे आकलन सोप्या करणाऱ्या आहेत हे स्पष्ट होते.

Powered By Sangraha 9.0