दुबई (Asia Cup Final Match Ind vs Pak) : पाकिस्तानला धुरळा चारत भारतीय संघाने आशिया चषकावर विजय तर मिळवलाच. मात्र, आशियाई क्रिकेट काऊन्सिलचा आणि पाकिस्तानी क्रिकेड बोर्डाचा अध्यक्ष मोहसीन नक्वीचेही संपूर्ण जगासमोर नाक कापले. नक्वी हा पाकिस्तानी मंत्रीसुद्धा आहे. त्याच्या हातून आम्ही आशिया चषक स्वीकारणार नाही, अशी ठाम भूमिका बीसीसीआय आणि भारतीय संघाने घेतल्यांनंतरही आशियाई क्रिकेट काऊन्सिल जुमानली नाही.
परिणामी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या विजेत्या संघाला सन्मानाने चषक देण्यास आशियाई क्रिकेट काऊन्सिल अपयशी ठरली आहे. भर मैदानात छी थूँ झाल्यानंतर नक्वींनी ट्रॉफी उचलून पॅव्हेलिअनची वाट धरली आणि क्रिकेट मालिकेचा संपूर्ण सोहळा समाप्त झाल्याची घोषणा केली. परिणामी भारतीय संघाने चषकावर नाव कोरले असतानाही ते देण्यात आलेले नाही.
सुमारे दीड तास सुरू असलेल्या या नाट्यामध्ये पाकिस्तानी खेळाडूही ड्रेसिंग रूममधून परतले नाहीत. अखेर बक्षीस वितरण समारंभ सुरू झाला. मात्र, नक्वीकडून चषक स्वीकारणार नाही ही भूमिका भारतीय संघाने कायम ठेवली. भारतीय संघाला विनाचषक परतावे लागले तरीही कर्णधार सुर्यकुमार यादवसोबत भारतीय संघाने प्रतिकात्मक चषक घेत विजयोत्सव साजरा केला आणि पाकिस्तानला आरसा दाखवून दिला.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बीसीसीआयनेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी घेतलेल्या भूमिकेनुसार, “ज्यांनी आमच्या देशाविरोधात युद्ध पुकारले आम्ही त्यांच्याकडून चषक स्वीकारणार नाही.”, असे म्हणत या प्रकरणाची तक्रार आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सलिकलडे (आयसीसी) करणार असल्याचेही म्हटले आहे.
या संपूर्ण प्रकरणानंतर एमिरेट्स क्रिकेट बोर्डाचे उपाध्यक्ष खालिद अल जरूनी आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अमिनुल इस्लाम यांनीही भारताला चषक देण्याची तयारी दाखवली होती. भारतीय संघाने हा प्रस्ताव मान्यही केला होता. मात्र, नक्वी त्याच्या हट्टावर कायम राहिला. मीच ट्रॉफी देणार, असा अट्टहास धरून बसला. आयोजक वारंवार भारतीय संघाला बोलावत राहिला मात्र, भारतीय संघातील सर्वच खेळाडू मैदानात विश्रांती घेत बसले होते.
भारतीय क्रिकेट संघाची आक्रमक भूमिका पाहून पाकिस्तानी संघाने ड्रेसिंग रुममध्ये वेळ काढण्याचे ठरवले. मात्र, काही काळाने पाकिस्तानी संघ मैदानात उतरला. तेव्हा उरलेली कसर भारतीय प्रेक्षकांनी भरून काढली. त्यांचे यछेच्छ स्वागत केले, ज्यामुळे पाकिस्तानी संघाला मान खाली घालावी लागली.
“मी क्रिकेट खेळू लागल्यापासून इतिहासात अशी गोष्ट कधीच पाहिलेली नाही. विजेत्या संघाला चषक मिळायलाच हवा. आम्ही ४ सप्टेंबरपासून इथे होतो. दोन्ही सामने उत्तम खेळलो. यापेक्षा आम्ही काही बोलणार नाही. ट्रॉफीबद्दल विचाराल तर त्या माझ्या ड्रेसिंग रुममध्ये आहेत. १४ खेळाडू आणि त्यांना मदत करणारे सर्वचजण हीच माझी ट्रॉफी आहे.”, असे कर्णधार सुर्यकुमार यादव याने सांगितले. यानंतर लगेचच भारतीय नियामक मंडळ (बीसीसीआय)ने भारतीय संघाला २१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
खेळाच्या मैदानावरचे ऑपरेशन सिंदूर
पहलगामचा हल्ला भारत अद्याप विसरलेला नाही. त्यामुळे भारतीय संघाने केलेल्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही कौतूक केले आहे. त्यांनी भारतीय संघाला कौतूकाची थाप देत ‘खेळाच्या मैदानावरील ऑपरेशन सिंदूर’, असे नामकरण करत टीम इंडियाचे अभिनंदन केले.