सिंधुदुर्गातील गजराजाची धडपड ! शेतकरी हवालदिल; 'वनतारा' हत्ती पकडणार ?

29 Sep 2025 10:52:01
sindhudurg elephant



आजवर भारताच्या नकाशावर हत्तींचे राज्य म्हणून ओळख नसलेले महाराष्ट्र राज्य आता हत्तीबाधित राज्य झाले आहे (sindhudurg elephant). हा प्रश्न सोपा नसून तो समस्येला कारक आहे. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तीबाधित क्षेत्राचा विषय चिघळला आहे (sindhudurg elephant). हत्तीपकड मोहिमेपर्यंत हा विषय येऊन ठेपलेला आहे (sindhudurg elephant). या प्रकरणामध्ये मध्यबिंदू साधणे आवश्यक आहे. त्याविषयीचा ऊहापोह करणारा हा लेख...


हत्तींचा अधिवास
जगामध्ये हत्तींच्या तीन प्रमुख प्रजाती आहेत. त्यामध्ये ‘बूश एलिफंट ’, ’फॉरेस्ट एलिफंट’ आणि ’एशियन एलिफंट’ यांचा समावेश होता. ’आफ्रिकन बूश एलिफंट’ , ’आफ्रिकन फॉरेस्ट एलिफंट’, ’इंडियन एलिफंट’, ’श्रीलंकन एलिफंट ’, ’सुमात्रा एलिफंट’ आणि ’बोर्णेण एलिफंट’ या त्यांमधील चार उपप्रजाती आहेत. जगातील एकूण आशियाई हत्तीच्या अधिवासापैकी 55 टक्के अधिवास आज नष्ट झाला आहे. भारतात जवळपास 25 हजार (50 टक्के) आशियाई हत्ती आहेत. त्यांमधील दहा हजार हत्तींचा वावर हा पश्चिम घाटाच्या पर्वतरांगांमध्ये आहे. कर्नाटक राज्यात जवळपास सहा हजार हत्ती आहेत, तर उत्तर कर्नाटक आणि अणशी-दांडेली भागात 50-60 हत्तीचा नियमित वावर आहे. महाराष्ट्रातील केवळ सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमावर्ती भागांमध्येच हत्तीचा वावर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 49 टक्के क्षेत्र वनाच्छादित असले, तरी त्यापैकी 89 टक्के वन हे खासगी मालकीचे आहे. केवळ 11 टक्के क्षेत्रच प्रत्यक्ष वनविभागाकडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हत्तीसाठी सलग जंगलपट्टा आज अस्तित्वात नाही. लहान लहान गावे आणि विखुरलेल्या वस्त्यांमुळे येथे रानटी हत्तींकडून शेतीची नासधूस आणि कुठूनही गेले, तरी मनुष्याशी संघर्ष अटळच आहे.
 
 
सिंधुदुर्गातील हत्ती
2002 साली प्रथम सात हत्तींचा कळप सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात दाखल झाला. पुढील वर्षभर या कळपाच्या हालचाली दोडामार्गपुरत्याच मर्यादित होत्या. याच दरम्यान 2004 साली आठ हत्तींनी कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश केला. सन 2004 मध्ये दोडामार्ग तालुक्यात आलेल्या 25 हत्तींपैकी 16 हत्तींना मागे पिटाळून लावण्यात वनविभागाला यश आले. मात्र, 2005 सालापासून रानटी हत्ती खर्‍या अर्थाने सिंधुदुर्गवासी झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2009 साली एकूण 17 हत्ती असल्याचे सांगितले जात होते. सन 2009 मध्ये दुसर्‍या वेळी वनविभागाने ‘हत्ती हटाव मोहिमे’ची तयारी केली. आसाममधून हत्तींना पकडण्यासाठी विशेष पथक आले होते. मात्र, या मोहिमेत दोन हत्तींचा दुदैवी मृत्यू झाला. त्यानंतर 2015 मधील ‘हत्ती पकड मोहिमे’नंतर पकडलेल्या तीन नर हत्तींपैकी दोन हत्तींचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू झाला होता. सध्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापुरात आठ रानटी हत्तींचा वावर आहे. यामधील दोडामार्ग तालुक्यात गणेश नावाचा टस्कर त्याच्यासोबत माई नावाची मोठी मादी, लहान मादी आणि दोन पिल्ले अशा एकूण पाच हत्तींचा वावर आहे. काही दिवसांपूर्वी गोव्यात गेलेला ओंकार नावाचा हत्तीदेखील महाराष्ट्रात दाखल झाला आहे.

सौर कुंपणाचे राजकारण
हत्तींच्या बंदोबस्ताकरिता वनविभागाने दोडामार्गात कर्नाटकातील दांडेलीच्या पार्श्वभूमीवर ‘टेंटिकल सोलार फेन्सिंग’ या लटकणार्‍या सौर कुंपणाची उपयायोजना राबवली. यामध्ये विजेचे वहन करणार्‍या तारा या 12 फुटांपासून जमिनीच्या दिशेने सोडल्या जातात. तारांमधून विजेचे वहन होत असल्याने हत्तीला विजेचा धक्का बसतो आणि तो या तारा ओलांडून पुढे येत नाही. दोडामार्गातील बांबर्डे, घोडगेवाडी या गावांच्या भोवती साधारण साडे तीन किमीपर्यंत लटकणारे सौर कुंपण बांधण्यात आले. दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या टीमनेदेखील प्रत्यक्ष जाऊन केलेल्या पाहणीत हत्ती या सौर कुंपणाच्या पुढे येत नसल्याचे दिसले. सौर कुंपणाच्या प्रभावी बांधकामासाठी दांडेलीमधूनच या कामाचा अनुभव असणार्‍या कंत्राटदाराकडून हे काम करून घेण्यात आले. मात्र, अनुभव नसलेल्या स्थानिक कंत्राटदाराला हे काम दिले नाही, म्हणून कंत्राटदाराच्या बगलबच्च्यांनी वनविभागासमोर आंदोलन आणि उपोषण केले आणि काम थांबविले. हे काम अजूनही थांबलेले असून हत्तींसाठीची प्रभावी उपययोजना स्थानिक राजकारण आणि हितसंबंधामुळे स्थगित आहे.

पूर्वसूचना यंत्रणा
हत्ती पकडून त्यांना प्रशिक्षित करणे, फटाके आणि ढोल वाजविणे अशा पारंपरिक पद्धतींचा अवलंब करण्याऐवजी प्रशासनाने हत्ती लोकवस्तीनजीक येण्यापूर्वी पूर्वसूचना देणारी यंत्रणा निर्माण करणे आवश्यक आहे. ‘नेचर कन्झर्वेशन फाऊंडेशन’ने (एनसीएफ) केरळमधील वालपराई पठारावर हत्ती व्यवस्थापन प्रणाली ही पूर्वसूचना प्रणाली विकसित केली आहे. जी स्थानिकांना हत्तीच्या वावरासंदर्भात पूर्वसूचना देते. सध्या सिंधुदुर्गात हाकारी पद्धतीने हत्तींच्या वावराचे नियोजन होत आहे. वालपराईमध्ये मिस्ड-कॉल सक्रिय अलर्ट लाईट्स आणि व्हॉईस-कॉल अलर्ट, हत्ती दिसल्याची तक्रार करणार्‍या प्रशिक्षित स्वयंसेवकांचे नेटवर्क आणि व्यापक सूचनांसाठी एसएमएस आधारित अलर्ट सिस्टम यांचा उपयोग केला जातो.
शेतकरी हवालदिल
दोडामार्ग तालुक्यातील शेतकरी हे हत्तीकडून केल्या जाणार्‍या पीकनुकसानीमुळे हवालदिल झाल्याचेही चित्र आहे. या भागात हत्ती हा प्रामुख्याने भात, केळी, नारळ, सुपारी, बांबू आणि काजू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. नारळाच्या झालेल्या नुकसानीमुळे येथील शेतकर्‍याचे आर्थिक गणित बिघडते. वर्षानुवर्ष जपलेला नारळ हत्ती काही मिनिटांमध्ये जमीनदोस्त करतो. त्यामुळे या नारळामधून मिळणार्‍या उत्पादनाला शेतकर्‍याला मुकावे लागते. त्यामुळे या नुकसानाची भरपाई वेळेवर मिळणेदेखील आवश्यक आहे. वनविभागाने त्यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे.
सूचनांकडे दुर्लक्ष?
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी एप्रिल महिन्यात झालेल्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हत्तींचा उपद्रव रोखण्यासाठी काही उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. या सूचना हत्ती आणि मानव अशा दोघांच्याही अस्तित्वाच्या विचार करून देण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये प्राथमिक दलाची स्थापना करणे, हत्तींना तिलारी धरण परिसरात नेऊन त्याभोवती रेल्वे रुळांचे कुंपण घालणे, हत्तींना रेडिओ कॉॅलर लावणे आणि हत्तींच्या उपजीविकेसाठी बांबू, केळी, फणस अशी झाडे लावणे अशा उपाययोजनांचा समावेश होता. ज्यामधील केवळ प्राथमिक दलाची स्थापना हीच उपाययोजना करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतर उपाययोजनांसाठी साधारण 650 कोटी रुपयांचा प्रस्ताव हा मुख्य वनसंरक्षक (कोल्हापूर) स्तरावर पाठविण्यात आला असून तो लाल फितीमध्ये अडकून पडला आहे.
Powered By Sangraha 9.0