अहिल्या नगर : धर्मगुरूच्या नावाची रांगोळी रस्त्यात काढत विटंबना! आंदोलनकर्ते हिंसक

29 Sep 2025 14:47:40

अहिल्या नगर : धर्मगुरुच्या नावाची रांगोळी काढून त्यांची विटंबना केल्याची घटना घडल्याने दोन गटांत तणाव निर्माण झाला. अहिल्या नगरमध्ये घटलेल्या या घटनेने आंदोलन पेटले आणि त्याला हिंसक वळण लागले. रांगोळी काढून त्याची विटंबना करणाऱ्या अज्ञातावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सोमवार दि. २९ सप्टेंबर रोजी अहिल्यानगरमधील कोटाला गावात आंदोलक रस्त्यावर जमले होते. मात्र काही क्षणातच या आंदोलनाने हिंसक वळण घेतले. जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला.

अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागातील बारातोटी कारंजा येथे एका अज्ञाताने रस्त्यावर एका धर्मगुरुबद्दल रांगोळी काढत, त्यांची विटंबना केल्याप्रकरणी दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाला. सोमवारी याच तणावाने आंदोलनाचे रूप घेतले आणि काही कार्यकर्त्यांनी अहिल्यानगर- संभाजीनगर रोडवरील कोटला गावात आंदोलन सुरू केले.

संबधित तरुणाला ताब्यात घेतले असून आता आंदोलन करण्याची गरज नाही, असे पोलीस आंदोलकांना समजावून सांगत होते. मात्र आंदोलक काही केल्या ऐकायला तयार नव्हते. काही आदोलकांनी पोलिसांवर दगडफेक करत गोंधळ निर्माण केला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना जमावावर लाठीचार्ज करावा लागला. मात्र, आता परिस्थिती नियंत्रणात आली असून संबधित गावात तणावपूर्ण शांतता आहे. आंदोलनाला हिंसक वळण देणाचा प्रयत्न करणाऱ्या ३०-३५ आंदोलकांवरही कारवाई करण्यात आली आहे.


Powered By Sangraha 9.0