
गरिबी भाकरी हिरावू शकते मात्र, कष्टामध्ये आयुष्य बदलण्याची ताकद असते, असे विचार असणाऱ्या माधव वसंत सोमवंशी यांच्याविषयी...
कधी नव्हे ते धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत होता. त्या मुसळधार पावसात सुशिला बाई शेतावर गेल्या कारण, मोठ्या कष्टाने उडीद, मूग लावले होते. मात्र, पावसाने उभे शेत आडवे झाले. आता वर्षभर खायचे काय? वर्षभराचे सोडा; पण आता घरी चार लेकरे उपाशी आहेत, त्यांना काय द्यायचे? या विचाराने त्या शेताच्या बांधावरची शेंदाडी (पावसाळ्यात पिकणारे फळ) घेऊन आल्या. त्यांनी ती शेंदाडी कापली आणि चारही मुलांना खाऊ घातली. पावसाने चिंब भिजलेली, गारठलेली आई आणि पावसाच्या पाण्यातही तिच्या डोळ्यातले अश्रू लपले नव्हते. ते पाहून तिच्या मोठ्या मुलाने माधवने ठरवले की, आईचे दुःख दूर करायचे. आज तोच मुलगा म्हणजे, माधव वसंत सोमवंशी!
माधव हे पालघर परिसरात ‘द हिंदू अॅकेडमी’चे संस्थापक आहेत. या अॅकेडमीमध्ये प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणार्या विद्यार्थ्यांना, स्पर्धा परीक्षांसंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. माधव गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा प्राप्त व्हाव्यात, तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी काम करतात. रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे आवश्यक असते. या विचाराने माधव रक्तदान शिबिराचे आयोजित करतातच, शिवाय समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भातही समाजजागृती करतात. २०१४ सालापासून रा. स्व. संघाच्या प्रेरणेने सामाजिक कार्यात सातत्याने कार्यमग्न असलेल्या माधव सोमवंशी यांना इयत्ता दहावीपर्यंत चप्पल काय असते, तेही माहिती नव्हते. अनेक रात्री केवळ पाणी पिऊनच माधव झोपले आहेत. असे असले तरीही आज माधव पालघरच्या ग्रामीण भागात सामाजिक कार्यात आघाडीवर आहेत. या मागची त्यांची प्रेरणा समजून घेतली पाहिजे.
वसंतराव आणि सुशीला सोमवंशी हे आष्टा (कासार) धाराशिवमधील मराठा समाजाचे दाम्पत्य. त्यांच्याकडे पिढीजात शेतजमीन होती पण, दुष्काळामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे शेतीत सारे काही नावालाच पिके. त्यातून विकणार काय आणि खाणार काय? वसंतराव शिकले सवरलेले पण, त्यांच्या दारूच्या आणि पत्ते खेळण्याच्या व्यसनाने, अवघ्या सोमवंशी कुटुंबाचा घात केला. गरिबीने घरात घर केले, त्यासोबतच दुर्दैवाचे फेरेही सुरू झाले. वसंतरावांच्या पत्नी सुशीलाबाईंच्या कष्टाला सीमा राहिली नाही.
या अशा परिस्थितीमध्ये माधव यांना प्रेरणा द्यायचे ते छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र. मराठा समाजाचे कर्तृत्व मोठे आहे. आज आपली परिस्थिती वाईट असली, तरीसुद्धा समाजाच्या नावाला कलंक लागेल किंवा समाजाची प्रतिष्ठा जराही कमी होईल, असे आपण काहीच करायचे नाही हे संस्कार त्यांच्यावर लहानपणापासूनच झाले. त्यामुळे कुणाकडे मागण्यापेक्षा, त्यांनी कष्ट करून शिकायला सुरुवात केली. दहावीला तर मूग उडिदाच्या शेतात कष्ट करून, त्यांनी पैसे एकत्र केले आणि दहावीचे परीक्षा शुल्क भरले. बारावीपर्यंत शिकून ‘डीएड’ करावे, शिक्षक व्हावे, असे त्यांना वाटत होते. बारावीनंतर ‘डीएड’चा फॉर्म भरला मात्र, खुल्या प्रवर्गात त्यांना प्रवेश मिळाला नाही. शिक्षण किंवा नोकरी हा पर्याय होता, त्यासाठी त्यांनी पुणे गाठले. पुण्यात ओळखीच्या व्यक्तीच्या मदतीने ट्रान्सपोर्ट कंपनीमध्ये अर्थार्जन करु लागले. १ हजार, ७०० रुपये पगारातून १ हजार, २०० रुपये घरी पाठवून, उरलेल्या ५०० रुपयांमध्ये एकवेळची खाणावळ त्यांनी लावली. बाकीचे पैसे ते वाचवत असत. मुलाचे हे कष्ट पाहून गावात असलेल्या वसंतरावांना वाटले की, शिकायच्या वयात लेक काम करतो, आपणही काम करावे, म्हणून ते नोकरीला लागले. त्यांनी माधव यांना गावी बोलावले. गावी आल्यावर माधव यांनी छोट्या-मोठ्या नोकर्या करत, ‘एमए’पर्यंचे शिक्षण पूर्ण केले. पुढे कुरियर कंपनीही काढली. माधव यांच्या प्रयत्नामुळे घराला स्थैर्य लाभले होते.
आपल्याला शिक्षणात अनंत अडचणी आल्या मात्र, आपल्या भावंडांना त्याची झळ नको या ध्येयाने, माधव यांनी भावंडांच्या शिक्षणात कसलीच कमतरता बासू दिली नाही. मात्र, एका भीषण अपघातात दोघाही भावांचा मृत्यू झाला. या दुःखाने माधव कोलमडले. पुढे आईबाबांच्या म्हणण्यानुसार त्यांचा विवाह शिक्षिका असलेल्या शीतल यांच्याशी झाला. कामानिमित्त हे दोघे २००८ सालच्या दरम्यान पालघरमध्ये स्थायिक झाले. याच काळात माधव यांनी ‘एमपीएससी’ गट ब विक्रीकर निरीक्षकपदाची परीक्षा दिली. पुढे स्पर्धा परीक्षेचा सराव कसा असतो? अभ्यास कसा करायचा, यावरच त्यांनी अभ्यास सुरू केला. मुंबईमध्ये विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास शिकावणार्या संस्थांमध्ये ते प्रशिक्षक म्हणून शिकवू लागले. त्यांना वाटले की, शहरात स्पर्धा परीक्षांसाठी शैक्षणिक संस्था आहेत मात्र, आदिवासी समाज बहुसंख्य असलेल्या पालघरच्या ग्रामीण भागात स्पर्धा परीक्षा अभ्यासकेंद्र असायलाच हवे. त्यातूनच त्यांनी ‘द हिंदू अॅकेडमी’ सुरू केली. राष्ट्रधर्मासाठी काम करणार्या कुणावरही अन्याय झाल्यावर पीडितांना कायद्याचे सहकार्य मिळावे या उद्देशाने सध्या ते ‘एलएलबी’चे शिक्षण घेत असून, सध्या ते तिसर्या वर्षाला आहेत. माधव म्हणतात, "येणार्या काळात सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्यांचे जीवन सामाजिक न्यायाच्या परिभाषेतून मानवी व्हावे, यासाठी काम करत राहणार आहे.” माधव यांचे विचारकार्य प्रत्येक संघर्षशील व्यक्तींसाठी मार्गदर्शक आहे.