लालपरीचा जागतिक ‘वाहक’

28 Sep 2025 22:05:03

छंद जोपासत ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असणाऱ्या लालपरी ‘एसटी’ची हुबेहूब प्रतिकृती बनविणाऱ्या जळगावच्या पवन भगवान कोळी यांच्या ‘स्वरांगी मिनिएचर आर्टस’चा कलाप्रवास...


जळगाव जिल्ह्यातील चुंचाळे या छोट्या खेड्यात राहणारे पवन महादेव कोळी, हे आपल्या अप्रतिम मिनिएचर बस मॉडेल्ससाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या बस प्रतिकृती केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर इतर राज्यांमध्येही लोकप्रिय झाल्या आहेत. एवढेच नाही, तर त्यांच्याआ कलाकृतींची भूरळ ओमान आणि न्यूयॉर्कमधील त्यांच्या चाहत्यांनाही पडली. गावात एक छोटेसे मोबाईल दुरुस्तीचे दुकान ते व्यवसाय, असा पवन यांचा रंजक प्रवास.

पवन यांचे संपूर्ण बालपण चुंचाळे या छोट्या गावातच गेले. पवन यांचे वडील महादेव कोळी हे ‘राज्य परिवहन महामंडळा’त चालक म्हणून १९९९ साली रुजू झाले, ते आजही कार्यरत आहेत. पवन यांनी २०११-१२ मध्ये बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर, काहीकाळ खासगी ठिकाणी कामही केले. मात्र, शालेय जीवनापासूनच पवन यांना हस्तकला आणि कागदी वस्तू, मातीच्या वस्तू तयार करण्याचा छंद होता. फावल्या वेळेत पवन आपला हा छंद जोपासत होते. अगदी आजतागायत त्यांनी हा छंद जपला आहे. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरीच्या शोधात असताना, कमी शिक्षणामुळे नोकरी मिळण्यात कायमच अडचणी येत होत्या. अशातच घरापासून जवळच नोकरी असावी, अशी पवन यांची इच्छा होती.

वडिलांच्या सतत मागणीनुसार पवन यांनी, गावातच मोबाईल दुरुस्तीचे छोटे दुकान सुरू केले. दुकान सांभाळतानाच पवन आपला छंदही जोपासत होते. पवन यांच्या कलेला वडिलांकडून थोडा विरोधच होता. पवन यांनी कामात आणि व्यवसायात लक्ष द्यावे किंवा नोकरी करावी असे वडील त्यांना सांगत. पवन यांनी चार वर्षे वडिलांच्या मर्जीनुसार दुकान सांभाळले.

२०१८ मध्ये पवन यांचा विवाह लक्ष्मी कोळी यांच्याशी झाला. लक्ष्मी यांच्या येण्याने पवन यांचा भाग्योदय झाला. पवन यांनी तयार केलेल्या वस्तू, ‘एसटी’ बसच्या हुबेहूब प्रतिकृती लक्ष्मी यांनी घरात पहिल्या. यावेळी पत्नी लक्ष्मी आणि भाऊ मोहन यांनी, पवन यांना मिनिएचर निर्मितीला व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र, पवन यांच्या वडिलांचा विरोध कायम होताच.

वर्ष २०१९ मध्ये एक घटना पवन यांच्या वडिलांचे मतपरिवर्तन करण्यास कारणीभूत ठरली. महादेव कोळी यांच्या डेपो व्यवस्थापकांना वाढदिवसनिमित्ताने काहीतरी भेटवस्तू देण्याबाबत महादेव कोळी यांनी पवन यांना विचारले. यावेळी पवन यांनी आपण स्वतः तयार केलेली बसची प्रतिकृतीच डेपो व्यवस्थापकांना द्यावी, असे सुचवले. पवन यांनी पूर्वी रस्त्यावर धावणार्या पिवळ्या-लाल रंगांतील बसची हुबेहूब प्रतिकृती तयार केली. हे प्रतिकृती डेपो व्यवस्थापकांच्या पसंतीसही उतरली. याचवेळी, पवन यांना डेपो व्यवस्थापकांकडूनच पहिल्या चार बसच्या प्रतिकृतींची ऑर्डर मिळाली. यावेळी वडिलांनाही मुलाच्या कामाचे आपल्या वरिष्ठांकडून कौतुक होतेय, हे पाहून आनंद झाला. हा दिवस पवन यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि खास ठरला. कारण, कला साधनेला कौतुकाची थाप मिळण्यापेक्षा, वडिलांचा विश्वास जिंकल्याचे समाधानच पवन यांना जास्त होते. इथेच वर्ष २०१९ मध्ये ‘स्वरांगी मिनिएचर आर्टस’ या व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली गेली.

सुरुवातीला एका डेपोपुरती मर्यादित असणारी पवन यांची ख्याती, हळूहळू तालुयात, जिल्ह्यात, राज्यात, देशात आणि अगदी परदेशातही पोहोचली.

आज हा व्यवसाय दोघेही कोळी बंधू मिळून सांभाळतात. पवन यांचे लहान बंधू मोहन कोळी, हेदेखील आता पूर्णवेळ मिनिएचर बनविण्याच्या कामात हातभार लावतात. प्रामुख्याने, पवन यांचा ‘एसटी’ बस बनविण्यात, तर मोहन यांचा बस, ट्रक, ट्रॅटर आणि कार इतर गाड्या बनविण्यात हातखंडा आहे. इतकेच नाही, तर आता या कलादालनात मागणीनुसार घरे, रुग्णालये, इमारती यांच्या प्रतिकृतीचीही निर्मिती करण्यात येते. पूर्णपणे हाताने तयार केलेल्या या प्रतिकृतींसाठी एक्रेलिक आणि फोमशीट वापरली जाते. आजतागायत दोन्ही बंधूंनी मिळून, साडेचार हजार मिनिएचर मॉडेल्स तयार केले आहेत. एका आठवड्यात २० ते ३० मिनिएचर मॉडेल तयार होतात. ‘एसटी’ किंवा मिनिएचरची किंमत ही त्यांच्या आकार आणि कलाकुसरीनुसार ठरते. साधारण ५०० ते एक हजार रुपये इतया किमतींच्या ‘एसटी’ मिनिएचरला सर्वाधिक मागणी असते. ‘एसटी’ महामंडळातील कर्मचारी वर्गाला हे मॉडेल्स विकत हवे असल्यास, त्यांना विशेष सूट देण्यात येते.

परदेशातून मिळालेल्या ऑडर्सविषयी पवन सांगतात की, "परदेशातील आपल्या मराठी देशवासीय बंधूंना आपल्या ‘लालपरी एसटी’विषयी खूप आत्मीयता आहे. आमच्या गावापासून आठ किमी अंतरावर वास्तव्यास असणार्या एका महिलेने, आपल्या प्रशासकीय अधिकारी असणार्या सासर्यांना या बसच्या मिनिएचर मॉडेल्सविषयी सांगितले. त्यांनी तत्काळ एक बस माझ्या कडून तयार करून घेतली आणि एका समारंभात त्यांनी हे बसचे मॉडेल, दूतावासातील एका परदेशी अधिकार्यांना भेट दिले.” अशारितीने हे पवन यांचे पहिले मिनिएचर थेट परदेशात ‘ओमान’ इथे गेले. तर अशारितीने आणखी एक मॉडेल हे न्यूयॉर्क येथेही पाठविण्यात आले आहे.

"मी करतो आहे, ती माझ्या माऊलीची सेवा आहे. माझे वडीलही एक ‘एसटी’ कर्मचारी आहेत. माझा हा व्यवसाय नाही, तर माझा छंद आहे. माझ्या वडिलांनी ‘एसटी’ची सेवा केली. मीही त्याच पावलावर पाऊल ठेवून, अनोख्या पद्धतीने ‘एसटी’ लोकांच्या घरापर्यंत पोहोचवली. मी पहिली ऑर्डर घेतली, तेव्हाही हा माझा छंद होता आणि आजही हे काम मी माझा छंद म्हणूनच, भावाच्या मदतीने करतो. येत्या काही काळात मीही महामंडळात नोकरीत रुजू होईल,त्यानंतर केवळ भाऊ मोहन हा व्यवसाय बघेल. याला व्यवसाय म्हणून मूर्तरूप अजूनतरी नाही मात्र, मला योग्य मार्गदर्शन मिळाल्यास, नक्कीच हा व्यवसाय अधिकृत नोंदवून अधिक संपन्न करण्याचा माझा प्रयत्न असेल.” ‘स्वरांगी मिनिएचर आर्टस’ हा कोळी बंधूंचा व्यवसाय अधिकाधिक प्रगती करो यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या पवन कोळी यांना हार्दिक शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0