मुंबई : “अण्णाभाऊंना जनतेने दिलेली लोकशाहीर पदवी ही शंभर भारतरत्नांनीही ओवाळावी इतकी थोर आहे. जनतेकडून मिळालेला मान हा सर्वोच्च असतो.” असे विधान ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे यांनी केले. ते अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था (आर्टी) आयोजित लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलन मुंबई २०२५ या भव्य कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवित होते.
हा ऐतिहासिक संमेलन सोहळा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाट्यगृह, भायखळा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. संपूर्ण सभागृह समाजबांधवांच्या उत्स्फूर्त उपस्थितीने भरून गेले होते.
कार्यक्रमाचे आर्टीचे महासंचालकनिमंत्रक सुनील वारे होते,तर स्वगताध्यक्ष प्रा. डॉ. बळीराम गायकवाड, नागेश धोंडगे, सहनिमंत्रक शंकर कांबळे, डॉ. स्मिता गालफाडे, किशोर आल्हाट व विक्रम गायकवाड उपस्थित होते. याशिवाय वरिष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुमाताई बाबासाहेब गोखले, माजी आमदार राम गुंडीले, प्रा. सुवर्णाताई रावळ, निलेश गद्रे, आर्टी निबंधक इंदिरा आस्वार, सुप्रसिद्ध लेखिका व तहसीलदार स्नेहलता स्वामी, तसेच अनिल वारे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते
प्रास्ताविकात सुनील वारे म्हणाले की, आर्टीची स्थापना ही समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी झाली आहे. विशेषतः शिक्षणाच्या माध्यमातून समाज पुढे नेणे हा उद्देश असल्याचे ते म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे आणि महामानवांचा आदर्श घेऊन तरुणांनी शासनाच्या मदतीने स्वतःचा विकास घडवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर आपल्या अध्यक्षीय भाषणात रमेश पतंगे म्हणाले, “अण्णाभाऊंच्या साहित्यातील पात्रे ही सामान्य माणसांच्या जीवनाशी जोडलेली आहेत. त्यांच्या लेखणीतून श्रमिकांचे दुःख, संघर्ष आणि नैतिक मूल्यांचे दर्शन घडते. अण्णाभाऊंनी समाजाला वाचायला-लिहायला प्रवृत्त केले.” ते पुढे म्हणाले की, आज मुंबईच्या आधुनिकतेतून खरा श्रमिक हरवत चालला आहे. उरलेल्या श्रमिकांच्या व्यथा मांडण्यासाठी नव्या पिढीतून नवे अण्णाभाऊ घडले पाहिजेत.
पतंगे म्हणाले की, “प्रत्येक मनुष्यात अफाट शक्ती आहे, जी आत्मचिंतनातून जागृत करावी लागते. साहित्य समाजाला दिशा देते. अण्णाभाऊंच्या ‘फकीरा’तून अन्यायाविरुद्ध बंड करण्याची ताकद मिळते. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवलेले समतेचे आंदोलन हे जगातील सर्वोच्च आणि शांतिप्रिय आंदोलन आहे.”
सामाजिक ऐक्याशिवाय प्रगती शक्य नाही, असे नमूद करताना ते म्हणाले की, जातीचा अभिमान असावा पण परजातीचाही सन्मान झाला पाहिजे. देशाने समरसतेतून समतेकडे जावे हेच खरे ध्येय आहे. तरुण पिढीने तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा योग्य वापर करून सक्षमतेकडे वाटचाल करावी, कष्टाशिवाय भविष्यात पर्याय नाही, असा ठाम संदेशही त्यांनी दिला.
या संमेलनातून अण्णाभाऊंच्या साहित्याचा समाजपरिवर्तनाचा वारसा, बाबासाहेबांच्या समतेचा संदेश आणि समाजाच्या सक्षम भविष्यासाठी प्रेरणादायी विचारांचा संगम घडला आहे, अशी भावना मंचावरील सर्व मान्यवरांनी उपस्थित समाजबांधवांसमोर व्यक्त केली.