हैदराबादमध्ये 'पिंक पॉवर रन 2.0; २० हजार नागरिकांचा स्तनाच्या कर्करोगाविरोधात एकजूटीचा संदेश
28-Sep-2025
Total Views |
हैदराबाद : स्तनाच्या कर्करोगाविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने Meil आणि सुधा रेड्डी फाउंडेशनतर्फे आयोजित पिंक पॉवर रन २०२५ च्या दुसऱ्या पर्वात रविवारी २०,००० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेतला. नेकलेस रोडवर पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक सेलेब्रिटीजनी सुध्दा भाग घेतला आणि आरोग्य आणि जन जागृतीचा संदेश दिला.
या पॉवर रनची सुरुवात सुधा रेड्डी, टेनिसपटू लिएंडर पेस, मिस वर्ल्ड ऑर्गनायझेशनच्या अध्यक्षा जूलिया मॉरले आणि मिस वर्ल्ड २०२५ ओपल सुचाता चुआंगसरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून झाली. मिस इंडिया वर्ल्ड नंदिनी गुप्ता यांच्यासह विविध देशांतील मिस वर्ल्ड प्रतिनिधींनीही सहभाग नोंदवला. ३ किमी, ५ किमी आणि १० किमी अशा तीन श्रेणींमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. विजेत्यांना एकूण ₹१५ लाखांहून अधिक रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कार्यक्रमात फिटनेस वर्कशॉप्स घेण्यात आले, कर्करोगातून बरे झालेल्या प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची ओळख करुन देण्यात आली. या उपक्रमाचा पुढचा टप्पा पिंक पॉवर रन: बियॉन्ड बॉर्डर्स या नावाने २०२६ मध्ये १४० देशांमध्ये राबविण्याची तयारी सुरू आहे. ही मोहीम मिस वर्ल्डच्या ७५व्या वर्धापन दिनाचा एक भाग असेल.