'पिनकोड ४०००१७' धारावीकरांची व्यथा; लाखो धारावीकरांच्या नशिबी दैनंदिन अवहेलना

Total Views |

मुंबई : आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावीचा '४०००१७' हा पिनकोड सुमारे १० लाखांहून अधिक स्थानिकांसाठी केवळ एक पत्ता नसून एक व्यथा बनली आहे. मानसिक कुचंबणा, सततची अवहेलना आणि इतरांचा पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन यामुळे स्थानिक धारावीकर दैनंदिन जीवनात मोठ्या दडपणाखाली असल्याचे दिसून येते.

सुमारे २ चौरस किलोमीटरच्या परिसरात वसलेल्या धारावीत प्रति चौरस किलोमीटर सुमारे ४.१८ लाख लोकसंख्या आहे. या दाटीवाटीच्या वस्तीतच स्थानिकांच्या जीवनाचे कटू सत्य लपले आहे. इथल्या अनेक पिढ्या 'आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी' हे नकारात्मक बिरूद कपाळावर घेऊन वर्षानुवर्षे सामाजिक अवहेलनेचा सामना करत आहेत.

गैरसमज आणि सजा

वास्तविक, मिनी इंडियासारखी घट्ट सामाजिक वीण असलेली धारावी म्हणजे लघुउद्योगांचे केंद्र आहे. मात्र, धारावीबाहेरील बहुतांशी लोकांचा धारावीकडे बघण्याचा दृष्टिकोन तसा नाही. धारावी म्हणजे कचऱ्यावर प्रक्रिया करणारे उद्योग,चर्मोद्योग आणि कुंभारकाम करणाऱ्या लोकांनी वसवलेली अनधिकृत झोपडपट्टी असून ही एक अनौपचारिक अर्थव्यवस्था आहे, असा गैरसमज धारावीबाहेरच्या बहुतांशी लोकांचा आहे. वर्षानुवर्षे लोकांच्या मनात असलेला हा गैरसमज हेच धारावीकरांच्या अवहेलनेचे मुख्य कारण आहे.

कोणी कर्ज देता का?

मुंबईच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणाऱ्या लघुउद्योगांचे केंद्र, अशी ओळख असणाऱ्या धारावीला बँकिंग क्षेत्रात मात्र हायरिस्क एरिया (अतिधोकादायक परिसर) मानले जाते. बहुतांशी गाळ्यांचे टायटल क्लिअर नाही, तसेच मालमत्ता नावावर नाही, म्हणून बँकेत तारण ठेवता येत नाही. तारण नाही म्हणून कर्ज नाही, अशा दुष्टचक्रात इथले स्थानिक सापडले आहेत. उत्पन्नाचा पुरावा, नोंदणीकृत दस्तावेज, कायमचा पत्ता यांच्या अभावामुळे धारावीकरांना सहजतेने कर्ज घेता येत नाही.

राबणारे दुर्लक्षित हात

कचऱ्याचे वर्गीकरण करणाऱ्या शबाना (नाव बदलले आहे) सारख्या अनेक जणींना दररोज अवहेलनेला समोरे जावे लागते. "आम्ही कचरा वर्गीकरणाचं काम केलं नाही, तर तयार होणाऱ्या कचऱ्याच्या ढिगाखाली संपूर्ण मुंबई गाडली जाईल. कचऱ्याने बरबटणारे हात आणि आमचा अवतार यामुळे अनेकांच्या कुत्सित नजरांचा सामना करावा लागतो. पण आम्ही हे काम केलं नाही, तर शहराचं काय होईल? हा विचार करा" असा सवाल शबाना यांनी केला. "आम्ही शहरासाठी इतकं काम करतो पण आमची दखल कुणीच घेत नाही" अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.

बालमनावर ओरखडा

धारावीतल्या चिमुकल्यांना देखील अनेकदा अवहेलना सहन करावी लागते. बहुतांशी मुले धारावीतल्या शाळांमध्ये दाखल होतात. मात्र, धारावीबाहेरच्या शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कळत- नकळत 'वेगळेपणाची' जाणीव पदोपदी करून दिली जाते. धारावीबाहेरच्या शाळांमध्ये आपल्या पाल्याला दाखल करताना, इथल्या पालकांना देखील मोठा संघर्ष करावा लागतो.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.