महेश मांजरेकर यांच्या पहिल्या पत्नीचे निधन

    28-Sep-2025
Total Views |

मुंबई : मराठी सिनेविश्वातून अतिशय वाईट बातमी समोर आली आहे. अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार २६ सप्टेंबर रोजी त्यांचं निधन झालं. दीपा या प्रसिद्ध कॉस्च्युम डिझायनर होत्या. अतिशय मनमौजी आयुष्य जगणाऱ्या होत्या. त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या अशी अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. दीपा आणि महेश यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सोशल मीडियावर आईच्या निधनाची बातमी दिली आहे.

दरम्यान, दीपा या मांजरेकरांच्या पहिल्या पत्नी होत्या. महेश मांजरेकर आणि दीपा मेहता यांचं १९८७ साली लग्न झालं होतं. दोघंही कॉलेजपासूनच एकत्र होते. त्यांना अश्वमी आणि सत्या ही दोन मुलंही झाली. मात्र लग्नानंतर आणि मुलांच्या जन्मानंतर महेश मांजरेकर आणि दीपा यांच्या नात्यात दुरावा आला. आणि पुढच्या काही वर्षातच त्यांचा संसार मोडला. दोघांनीही घटस्फोट घेत वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर काही वर्षांनी महेश मांजरेकरांनी मेधा यांच्याशी लग्न केलं. त्यांना सई मांजरेकर ही मुलगी आहे.


दीपा मेहता यांनी स्वतःचा व्यवसाय सांभाळला. या एकट्याच राहत होत्या. त्या स्वत:चा 'क्वीन ऑफ हार्ट्स' हा साड्यांचा ब्रँड चालवत असत. त्यांची लेक अश्वमी या ब्रँडसाठी मॉडेलिंगही करते. त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सोशल मीडियावर आईच्या आठवणीत भावुक पोस्ट केली आहे. दरम्यान दीपा मेहता यांच्या निधनाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सिनेविश्वातूनही दीपा यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. दीपा मेहता यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने आईचा जुना फोटो शेअर करत 'मिस यू मम्मा' असं लिहिलं आहे. दरम्यान सत्या मांजरेकर देखील अभिनेता आहे तर त्याने काही चित्रपटांमध्येही काम केलं आहे.