मुंबई : धाराशिव जिल्हयातील पुरग्रस्तांना आर्थिक मदत करून आधार देण्याचे कळकळीचे आवाहन सेवा सहयोग संस्थेचे संचालक किशोर मोघे यांनी नुकतेच केले. माटूंगा येथे २७ सप्टेंबर रोजी सेवा सहयोग संस्थेचा १६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी त्यांनी हे आवाहन समाजाला केले आहे.
वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि सरस्वती वंदना करून झाली. फाउंडेशनशी जोडलेले अनेक देणगीदार, स्वयंसेवक आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. उदय साळुंखे (ग्रुप डायरेक्टर, वेलिंगकर इन्स्टिट्यूट) यांनी आपल्या भाषणात स्वयंसेवक आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव कथन केले, तर विविध शाळांचे मुख्याध्यापक आणि संस्था प्रतिनिधींनी फाउंडेशनच्या कार्याबद्दल अभिनंदन केले. या कार्यक्रमामध्ये शहरी आणि ग्रामीण भागासाठी पुढील पाच वर्षांतील सर्वोच्च पाच प्राधान्य क्षेत्रांवर झालेले सखोल विचारमंथन. गटचर्चेत शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, पायाभूत सुविधा आणि सामाजिक न्याय यांसारख्या क्षेत्रांना प्राधान्य देण्याची गरज व्यक्त करण्यात आली. ग्रामीण भागासाठी वित्तीय साक्षरता, कृषी अर्थव्यवस्था आणि शिक्षणातील शिक्षकांची उपलब्धता यावर विशेष भर देण्यात आला.