अमेरिका आणि भारतादरम्यान सध्या व्यापार करारावरुन वाटाघाटी सुरु असल्या, तरीही भारतीय बुद्धिबळपटूंच्या खेळाने अमेरिकेतील प्रेक्षकांच्या मनात केव्हाच घर केले आहे. त्यामुळेच भारताचे प्रमुख खेळाडू अमेरिकेच्या प्रमुख खेळाडूंबरोबर खेळणार आहेत. त्यानिमित्ताने दि. 4 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे स्वरुप, नियम, आयोजन यांचा घेतलेला आढावा...
टेक्सासच्या आर्लिंग्टनमधील स्टेडियमवर दि. ४ ऑटोबर रोजी प्रेक्षकांची गर्दी होणार आहे. याचे कारण आहेभारत-अमेरिका यांच्यातील एकदिवसीय सामना! अमेरिकेतील क्रीडाप्रेमी अमेरिकन फुटबॉल, रग्बी, सॉकर, बास्केटबॉल, बेसबॉल असे त्यांच्याकडील लोकप्रिय खेळ बघण्यासाठी गर्दी करतील, असे कोणालाही चटकन वाटेल. पण, जर कोणाला ती गर्दी भारत-अमेरिका यांच्यातील स्पर्धेसाठी होणार आहे असे समजल्यास, ती गर्दी टेनिस, क्रिकेट अशा खेळांच्या सामन्यासाठी असणार असेही वाटेल. पण, वास्तविक ती गर्दी होणार आहे भारत-अमेरिका यांच्यातील बुद्धिबळ सामन्याचा आनंद लुटणार्या क्रीडाप्रेमींची आणि तीदेखील स्टेडियममध्ये. होय, बुद्धिबळ पुन्हा एकदा स्टेडियमवरचा खेळ म्हणून परत येत आहे.
ऑगस्ट २०२५ सालच्या शेवटच्या आठवड्यात ‘जागतिक बुद्धिबळ संघटने’ने एक घोषणा केली होती की, जी भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरली होती. त्या घोषणेत म्हटले होते की, ‘बुद्धिबळ विश्वचषक २०२५’चे आयोजन दि. ३१ ऑटोबर ते दि. २७ नोव्हेंबर रोजीदरम्यान गोव्यात केले जाईल. ती घोषणा करताना ‘जागतिक बुद्धिबळ संघटने’चे अध्यक्ष आर्कडी ड्वोर्कोविच यांनी भारताबाबत गौरवोद्गार काढत हेदेखील नमूद केले होते की, भारत आता बुद्धिबळाच्या जगात एक प्रमुख राष्ट्र बनले आहे.
जो खेळाडू एखाद्या स्पर्धेत नियमांनुसार पात्र नसताना विशेष बाब म्हणून, त्या स्पर्धेत सहभागी होण्यास त्याला परवानगी देण्यात येते. अशा व्यक्तीला वाईल्डकार्ड आमंत्रण दिले जाते. अर्थात, त्याला वाईल्डकार्ड दिले असेच संबोधतात. आर्कडी ड्वोर्कोविच यांनी आगामी २०२५ विश्वचषक स्पर्धेसाठी, सहा वाईल्डकार्ड आमंत्रणे मंजूर केली आहेत. अशा घोषित खेळाडूंमध्ये किरिल अलेसेन्को, अॅण्डी वुडवर्ड, अभिमन्यू मिश्रा, वोलोदर मुरझिन आणि आयएम फॉस्टिनो ओरो यांच्यासमवेत, भारताची महिला विश्वचषक २०२५ पदक विजेती दिव्या देशमुख हिचाही समावेश आहे.
भारतीय बुद्धिबळविश्वातील प्रमुख बुद्धिबळपटू, दिवसेंदिवस जगात सर्वत्र लोकप्रिय होत आहेत. भारतीय बुद्धिबळपटूंचा खेळ बघायला, देशोदेशीचे बुद्धिबळप्रेमी आता सर्वत्र आतूरतेने वाट बघत असतात. अमेरिकेतील बुद्धिबळप्रेमी स्वतःच्या बुद्धिबळपटूंच्या खेळाएवढेच, भारतीयांचाही खेळ बघायला उत्सुक असतात. या दोन देशातील खेळाडू जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा तर त्यांचे ते डाव नक्कीच बघण्यासारखेच असणार. हे जाणून घेत एका अमेरिकनने, चक्क भारत-अमेरिका यांच्यात सामने आयोजित करत चाहत्यांना मेजवानीच देऊ केली आहे.
आर्लिंग्टनच्या आयोजकांना आशा आहे की, काही अनोख्या आकर्षक प्रयोगांसह कट्टर बुद्धिबळ चाहते आणि सर्वसाधारण क्रीडाप्रेमीही तेथे नक्की भेट देतील. या स्टेडियमवर होणार्या प्रदर्शनीय सामन्यात, बुद्धिबळ जगतातील अनेक मोठ्या नावांचा समावेश असेल. एका नेत्रदीपक खेळाचे आश्वासन आयोजकांतर्फे देण्यात आले आहे. अव्वल खेळाडू, नामांकित महिला विजेते, प्रभावशाली आणि उदयोन्मुख तारे, असे अनेक बुद्धिबळपटू तेथील स्टेडियमवर आपले कसब दाखवत चाहत्यांना मंत्रमुग्ध करतील.
भारत विरुद्ध अमेरिका यांच्यात होणार्या या सामन्यांत, भारताचा विश्वविजेता ग्रॅण्डमास्टर गुकेश डोममाराजू आणि अमेरिकेच्या जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर असलेल्या ग्रॅण्डमास्टर हिकारू नाकामुरा यांच्यात सामना होईल. तसेच, अमेरिकन ग्रॅण्डमास्टर फॅबियानो कारुआना विरुद्ध भारतीय ग्रॅण्डमास्टर अर्जुन एरिगाइसी, अमेरिकन इंटरनॅशनल मास्टर कॅरिसा यिप विरुद्ध भारताची ग्रॅण्डमास्टर दिव्या देशमुख, अमेरिकन इंटरनॅशनल मास्टर लेव्ही रोजमन विरुद्ध भारतीय इंटरनॅशनल मास्टर सागर शाह, आणि अमेरिकन इंटरनॅशनल मास्टर तानी अदेउमी विरुद्ध भारतीय इंटरनॅशनल मास्टर इथन वाझ यांच्यात लढती होणार आहेत.
हे फक्त दोन राष्ट्रांमधील सामने नसून, थेट प्रेक्षकांसाठी आणि मुख्य प्रवाहातील क्रीडा चाहत्यांसाठी बुद्धिबळाच्या खेळाचे कसे सादरीकरण करता येईल याचा हा एक अनोखा प्रयोग आहे. वेळेचे नियंत्रण, नाट्यमयता आणि पारंपरिक बुद्धिबळ स्पर्धेपेक्षा, एनबीए किंवा बॉसिंग नाईटसारखी वातावरणनिर्मिती येथे होणार असल्याचेे आयोजकांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पूर्ण दिवस चालणार्या या कार्यक्रमाची, बुद्धिबळ महोत्सवासारखी मांडणी करण्यात आली आहे. तेथे भेट देणार्या चाहत्यांना केवळ खेळ पाहण्याचीच नाही, तर खेळाप्रती समर्पित फॅन्सला भेट देण्याची संधीदेखील मिळेल. पाहुण्यांमध्ये आयोजनकर्त्या ‘चेस डॉट कॉम’चे मुख्य बुद्धिबळ अधिकारी इंटरनॅशनल मास्टर डॅनी रेन्श असणार आहेत. जे त्यांच्या डार्क स्क्वेअर्स या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी स्वाक्षरी समारंभाचे आयोजन करतील आणि चाहत्यांना भेटतील.
अर्लिंग्टनमधील अमेरिका विरुद्ध भारत सामन्याला, अंदाजे २ हजार, ५०० प्रेक्षकांची उपस्थिती असेल. याआधी आर्लिंग्टनने अनेक महत्त्वाच्या ई-स्पोटर्स स्पर्धांचे आयोजन केले आहे आणि आता ते एका खर्या शोसाठी, डिझाईन केलेल्या नावीन्यपूर्ण बुद्धिबळ स्पर्धेचे व्यासपीठ म्हणून काम करणार आहेत. स्टेडियमच्या आतमध्ये चाहत्यांना घोषणा द्यायला, टाळ्या वाजवण्यास आणि मुक्तपणे प्रतिक्रिया देण्यास प्रोत्साहित केले जाईल; पण आवज करण्याची कोणतीही परवानगी नसेल. कोणतेही मोठे प्रायोजक किंवा टीव्ही करार नसल्यामुळे, त्यांना नफा कमावण्याची अपेक्षा नाही. केवळ तिकीट विक्रीवरच कार्यक्रम शय झाला आहे. मुख्य कार्यक्रम आर्लिंग्टन येथे संध्याकाळी ७ वाजता सुरू होईल. या कार्यक्रमात संपूर्ण उद्घाटन समारंभासह खेळाडूंचा वॉक-इन, लाईट शो आणि राष्ट्रगीत यांचाही समावेश असेल. प्रत्येक खेळ स्वतंत्रपणे सादर केला जाईल, सर्वांचे लक्ष एका वेळी एकाच बोर्डवर केंद्रित केले जाईल. हा कार्यक्रम चार तास चालण्याची अपेक्षा आहे. याची तिकिटे कार्यक्रमाच्या अधिकृत वेबसाईटवरून खरेदी करता येतील.
अलीकडच्या वर्षांत, जागतिक ई-स्पोटर्स मंचावर बुद्धिबळ वेगाने वाढत आहे. पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ स्पीड बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना आणि सौदी अरेबियातील रियाध येथे नुकताच संपलेला ई-स्पोटर्स विश्वचषक, ही त्याची उदाहरणे. याच धर्तीवर आर्लिंग्टनमधील अमेरिका विरुद्ध भारत सामना खेळवला जाणार आहे. २ हजार, ५०० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या ई-स्पोटर्स स्टेडियममध्ये, आर्लिंग्टनने अनेक प्रमुख ई-स्पोटर्स स्पर्धांचे आयोजन केले असून, आता ते एका नव्या शोसाठी डिझाईन केलेल्या नावीन्यपूर्ण बुद्धिबळ स्पर्धेचे व्यासपीठ म्हणूनही काम करेल.
भारत-अमेरिका यांच्यातील सामने बुद्धिबळ महोत्सवाची रंगत वाढवत असताना, भारताबाहेरील ठिकाणी आज भारतातील बुद्धिबळपटू दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसतात; हीच कदाचित भारतीय ‘चतुरंग’ला मिळणारी खरी दाद असेल.
(लेखक माजी खेलकूद आयाम प्रमुख, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, जनजाती कल्याण आश्रम आणि माजी हॉकीपटू आहेत.)
श्रीपाद पेंडसे
९४२२०३१७०४