डोंबिवली : १९७६ साली डोंबिवलीत स्थापन झालेल्या अभिनव सहकारी बँकेची १८ वी नूतन शाखा दिवा येथे सुरू होत आहे. सोमवार दिनांक २९ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता चंद्रगण रेसिडेन्सी, ए विंग, पहिला मजला, स्टेशन रोड, दिवा पुर्व येथे बँकेचे अध्यक्ष रमेश रतन पाटील यांच्या हस्ते या नूतन शाखेचे उद्घाटन होणार आहे. यावेळी कल्याण ग्रामीण विधानसभेचे माजी आमदार सुभाष भोईर हे प्रमुख पाहूणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अभिनव बँकेचे यंदा सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू आहे. त्या औचित्याने आम्ही वर्षभर अनेक कार्यक्रम हाती घेतले आहेत. नांदिवली शाखेचे स्थलांतर, बँक कर्मचाऱ्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव असे कार्यक्रम झाले असून सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने दिवा येथे नवीन शाखा सुरू करीत असल्याची माहिती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांनी दिली. दिवा शहराची लोकसंख्या आणि विकास वाढत आहे. त्या मुळे ग्राहकांना आम्ही उत्तम आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर असणारी सर्वोत्तम सेवा देऊ असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. दिवावासियांनी आपल्या कुटुंबासह या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन शाखा व्यवस्थापक अमोल मोरे यांनी केले आहे.