डोंबिवली : एकीकडे वाहनांची वाढलेली प्रचंड संख्या, वाहतूक कोंडीमुळे धूर ओकणारे सायलेन्सर, प्रदूषणकारी कारखाने, धूळ-मातीचा उडणारा धुरळा, आदी नानाविध प्रकारांनी कल्याण-डोंबिवलीत हवेची गुणवत्ता पुरती ढासळलेली दिसून येते. या पार्श्वभूमीवर डोंबिवलीकरांनी शनिवारी सकाळी एकत्र येऊन प्रदूषण नियंत्रणासह स्वच्छतेसाठी जनजागृती व्हावी आणि शासन-प्रशासनाचे लक्ष केंद्रित व्हावे, या हेतूने रॅली काढली होती. या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या रॅलीमध्ये पर्यावरण दक्षता मंचतर्फे रूपाली शाईवाले, उज्वला केतकर, अनिल मोकल, प्राची कुलकर्णी, सुदर्शननगर निवासी संघातर्फे सुरेखा जोशी, विजय सावंत, चंद्रशेखर राईलकर, विवेक पाटील, स्मिता फाटक, मिलापनगर रेसिडेन्स वेलफेअर असोसिएशनतर्फे वर्षा महाडिक, अरविंद टिकेकर, डोंबिवली वेल्फेअर असोसिएशनचे सचिव राजू नलावडे, माया परांजपे, ज्येष्ठ पशु वैद्य डॉ. मनोहर अकोले, अरूण जोशी, एव्हरग्रीन सायकल प्रेमीग्रुपतर्फे हर्षल सरोदे, आदींह विद्यार्थी, शिक्षक आणि रहिवासी उपस्थित होते.
डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागामध्ये हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छता जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सुदर्शननगरातील औदुंबर कट्ट्याजवळून या रॅलीस सकाळी साडेसात वाजता वाजता सुरूवात झाली. या रॅलीमध्ये ज्ञानमंदीर विद्या संकुल, के. रा. कोतकर माध्यमिक/उच्च माध्यमिक विद्यालय, टिळकनगर कॉमर्स कॉलेजचे विद्यार्थी, एव्हरग्रीन सायकल प्रेमी ग्रुपच्या महिलांसह निवासी विभागातील रहिवाशी पाऊस पडत असतानाही मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रसंगी हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छतेच्या संदर्भात रॅलीमध्ये सहभागी झालेल्यांकडून घोषणा देण्यात आल्या. तर विद्यार्थ्यांनी हातात घेतलेले फलक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते. या रॅलीच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या रहिवासी, दुकानदार आणि व्यापाऱ्यांनी या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. एमआयडीसीच्या निवासी विभागातील प्रमुख रस्त्यांवरून फिरून रॅलीचा ज्ञानमंदीर विद्यासंकुला जवळ समारोप करण्यात आला.
सदर रॅलीमध्ये जवळपास १५० विद्यार्थी आणि ७५ रहिवाशांनी सहभाग घेतला होता. समारोप प्रसंगी ज्ञानमंदीर शाळेच्या मुख्याधपिका संगीता पाखले, पर्यावरण दक्षता मंचचे अनिल मोकल आणि रूपाली शाईवाले यांनी हवा प्रदूषण नियंत्रण आणि स्वच्छतेविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.