“नक्षलवादी कधीही आंबेडकरवादी किंवा संविधानवादी होऊ शकत नाही” : नितीन मोरे यांचे स्पष्ट मत

    28-Sep-2025
Total Views |

मुंबई : जन सुरक्षा कायद्याच्या समर्थनार्थ जयभीम आर्मीच्या वतीने टागोर नगर, विक्रोळी पूर्व येथे सभा आयोजित करण्यात आली. या सभेत बहुजन समाजामध्ये कायद्याबाबत निर्माण झालेल्या गैरसमजांबाबत माहिती दिली गेली आणि संविधानाच्या अनुषंगाने कार्यरत असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या पाठीमागे हा कायदा ठामपणे उभा असल्याची भूमिका मांडली गेली.


सभा संबोधित करताना जयभीम आर्मीचे अध्यक्ष नितीन भाऊ मोरे यांनी सांगितले की, बंदूक हातात घेऊन नक्षलवादी चळवळीला समर्थन देणारे कधीही आंबेडकरवादी किंवा संविधानवादी असू शकत नाहीत. देशाच्या विरोधामध्ये कट कारस्थान करणाऱ्या आणि समाजात संभ्रम निर्माण करणाऱ्या संघटनांवर हा कायदा कठोर कारवाई करण्यासाठी आहे, परंतु संविधानिक मार्गाने हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्यांना या कायद्यापासून कधीही धोका होणार नाही.


मोरे यांनी अधोरेखित केले की, हा कायदा लागू करण्यापूर्वी न्यायालयीन परवानगी घेणे अनिवार्य आहे, त्यामुळे समाजात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करणारी नक्षलवादी चळवळीला साथ देणारी तत्वे निष्फळ ठरतात. त्यांनी सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार लक्षात घेतले तर बहुजन समाजातील संविधानिक मार्गावर कार्यरत कार्यकर्ते सदैव तयार असतात.


कार्यक्रमाला जयभीम आर्मी अध्यक्ष नितीन भाऊ मोरे, विवेक विचार मंचाचे मुंबई महानगर संयोजक जयवंत तांबे, ब्लू टायगर सामाजिक संघटनेचे बाळासाहेब शेळके, राष्ट्रीय बहुजन अधिकार संघाचे राकेश मोहिते, विक्रोळीतील बौद्ध समाजासाठी कार्यरत मुरली लोखंडे आणि विविध महिला संघटना प्रमुख उपस्थित होते.