
ज्येष्ठ कादंबरीकार, थोर तत्त्वज्ञ, विचारवंत, पटकथालेखक ‘पद्मभूषण’ एस. एल. भैरप्पा यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ कन्नड साहित्यविश्वच नाही, तर देशभरातील साहित्यसृष्टीत हळवळ व्यक्त करण्यात आली. कारण, भैरप्पांच्या वास्तवदर्शी, भावस्पर्शी आणि अर्थगर्भ कादंबर्यांनी कन्नडसह मराठी, हिंदी, तेलुगू, तामिळ आणि इंग्रजी वाचकांनाही कित्येक दशके मंत्रमुग्ध केले. आज भैरप्पा आपल्यात नसले, तरी त्यांच्या शब्दस्मृती चिरंतन राहतील आणि भविष्यातही वाचकमनाचा ठाव घेत राहतील. भैरप्पांना शब्दसुमनांजली अर्पित करताना, त्यांच्या संघर्षमयी जीवनाचा कानोसा घेणारे आणि त्यांच्या गाजलेल्या कादंबर्यांचे रसग्रहण करणारा हा लेख...कादंबरी हा ललित वाड्मयातला प्रामुख्याने दीर्घ विस्तार असणारा बहुकेंद्री व वाचकमनावर प्रभाव टाकणारा साहित्यप्रकार. जीवनातले अनेक गर्भित काल्पनिक व वास्तव अनुभव कादंबरीच्या प्रदीर्घ पटलावर विस्तृतपणे येऊ शकतात. त्यामुळेच वाचकमन साहित्य प्रकाराशी खोलवर समरस होऊ शकते व कादंबरीचा परिणाम मनावर दीर्घकाळ टिकू शकतो.
एस. एल. भैरप्पा हे श्रेष्ठ कन्नड कादंबरीकार. त्यांची पुस्तके जरी मूळ कन्नड भाषेत असली, तरी त्याच्या सकस अनुवादातून ते भारतीय वाचकांपर्यंत पोहोचले आहेत व संपन्न अनुभव देणार्या या लेखनामुळे भारतीय वाचकांच्या मनावर त्यांनी एक सघन असा ठसा उमटवला. त्यांच्या २६ कादंबर्यांपैकी बर्याच पुस्तकांचे अनेक भाषांमधून अनुवाद झाले आहेत. मराठीत उमा कुलकर्णी यांनी केलेल्या अनुवादामुळे ते मराठी वाचकांना परिचित तर आहेतच; पण त्यांच्या अनोख्या लेखनशैलीमुळे त्यांनी वाचकमनावर पसंतीची मोहोर उमटवली.
कर्नाटकातील हासन जिल्ह्यातील सांतीशिवारा या गावात जन्म घेतलेल्या या लेखकाचे आयुष्य विविध चढउतारांनी व नानाविध कष्टप्रद अनुभवांनी भरलेले आहे. हा संघर्ष, नकार, दुःखाचे तीव्र आवेग या सगळ्यांची पार्श्वभूमी त्यांच्या लेखनामागे आहे. संपूर्ण लेखनामागे तत्त्वज्ञान व इतिहासाचा उत्तम अभ्यास आणि मानवी जीवनाची सखोल जाण असल्यामुळे, त्यांच्या दीर्घ कादंबर्या लोकप्रिय ठरल्या. तत्त्वज्ञान व सौंदर्यशास्त्रामध्ये भैरप्पांनी ‘पीएच.डी.’ केली, तरी त्यांनी स्वतःला व्यक्त करण्याचे माध्यम म्हणून ‘कादंबरी’ हाच प्रकार निवड १९६२ साली त्यांची ‘वंशवृक्ष’ ही कादंबरी प्रकाशित झाली. त्यानंतर ५० वर्षे गंभीर चिंतनात्मक पद्धतीच्या कादंबर्या ते लिहित राहिले. मराठी वाचकांच्या मनातही त्यांचे खास स्थान निर्माण झाले आहे. त्यांच्या सगळ्याच कादंबर्यांचा आढावा इथे घेणे शय नाही. पण, लोकप्रिय कादंबर्या व त्यातील बांधून ठेवणारी सशक्त आशयसूत्रे, ओघवती लेखनशैली व थक्क करणारा जीवनानुभव यांचा एक मोजका आलेख इथे मांडता येईल.
भारतीय वाचकांमध्ये अतिशय लोकप्रिय झालेली कादंबरी ‘पर्व’ जी महाभारतावर आधारलेली आहे. भारतीय मनाला मुळात महाभारत नवीन नाही. पण, त्यातल्या रूढ व्यक्तिरेखांचे त्यांच्या परिघाबाहेर जाऊन या कादंबरीत एक वेगळे चित्र भैरप्पांनी उभे केले आहे. भैरप्पा यांची लेखनशैली प्रवाही व सशक्त बांधणीची आहे. उत्तम कादंबरीकाराकडे बहुधा ती असतेच. त्यांच्या सर्वच कादंबर्यांचे पटही तितकेच विस्तृत आहेत. अनेक पात्रे व्यक्तिरेखा, घटना, समांतर कथानके, उपकथानक व त्यांचे एकमेकांशी जोडले जाणे, हे प्रत्येक कादंबरीतच अतिशय ठळकपणे आले आहे. या सगळ्यातून मुख्य कादंबरीची वीण मात्र कुठेही विस्कळीत होत नाही. आरंभबिंदूपासून कादंबरीच्या अंतिम टप्प्यापर्यंत वाचक या अर्थविवरात अडकून पडतो, किंबहुना वाचकमनाचा प्रवास त्या लेखनाबरोबरच पुढे पुढे होत राहतो. महाभारतात तर शेकडो व्यक्तिरेखा, अनेक चमत्कृतीपूर्ण प्रसंग, कल्पनातीत घटना आणि मानवी भावभावनांचे नानाविध आविष्कार आहेत. या कादंबरीलेखनाची पार्श्वभूमी त्यांनीच सांगितली आहे. भैरप्पांचे वास्तव्य दिल्लीला असताना ते त्या भागात भटकंती करत होते. उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार या प्रदेशांतून फिरताना तेथील माणसे त्यांची भाषा, देहयष्टी, सामाजिक रूढी या गोष्टी त्यांनी बारकाईने टिपल्या. त्याच काळात त्यांच्या मनात ही कादंबरी आकार घेत होती. त्यांनी कादंबरी लिहिण्याअगोदर महाभारतकालीन अनेक स्थानांना भेटी दिल्या. अभिमन्यूच्या मृत्यूची जागा, कर्णाच्या मृत्यूची जागा, तेथील विस्तीर्ण परिसर पाहताना त्या कालखंडाचा एक सजग स्पर्श जणू काही त्यांच्या मनाला झाला.
त्यामुळे ‘पर्व’ कादंबरी ही एका अर्थाने फक्त पौराणिक कादंबरी राहत नाही. ती मानवी भावनांच्या गूढ अवकाशाला स्पर्श करते. आजवर आपल्याकडे ऐतिहासिक, पौराणिक कादंबर्यांमध्ये इतिहासकालीन स्त्री-पुरुष व्यक्तिरेखांकडे भारावलेल्या दृष्टीने बघण्याची पद्धत होती. इतिहासाचे गुणगान, त्यातील व्यक्तिरेखांचे दैवतीकरण, भावनाप्रधानता आणि अभिमानबिंदू म्हणूनच त्यांच्याकडे पाहणे असा दृष्टिकोन होता. भैरप्पांनी ‘पर्व’मध्ये मात्र पूर्णतः वेगळी मांडणी केली आहे. या कादंबरीतल्या सर्व व्यक्तिरेखा आपल्याला पूर्वी माहीत आहेत, त्या त्यांच्या विशिष्ट गुणांमुळे. पण, ‘पर्व’मध्ये त्या आपल्यासमोर निखळ मानवी स्वरूपात येतात. त्यांचेही पाय मातीचे आहेत; त्यांचे विशिष्ट ग्रह आहेत. त्यांच्या स्वतःच्या मर्यादा आहेत. त्या काही लोकोत्तर अशा व्यक्तिरेखा नाहीत. या व्यक्तिरेखांचे सामान्यीकरण करून भैरप्पांनी खरंतर भारतीय मानसिकतेला सांस्कृतिक धक्का दिला होता. पुराणकाळातील चमत्कार दाखवणे किंवा त्या व्यक्तिरेखांचे उदात्तीकरण करणे, हा त्यांचा हेतू नाही. किंबहुना, आमची संस्कृती भव्य, दिव्य, उदात्त होती, हे गृहीतकच त्यांनी इथे नाकारले. ही माणसे सामान्य रागलोभ असणारी, मातीशी नाते सांगणारी आहेत.
या कादंबरीची मांडणीही वैशिष्ट्यपूर्ण आहे. १४ भागांमध्ये विभागणी केली असून, प्रत्येक भागात एक व्यक्तिरेखा आपल्या गतकाळाचे अवलोकन करताना आपल्यासमोर येते आणि मग उलगडत जातो तो स्तिमित करणार्या भावनांचा पट. यातील सर्व घटना भारतीयांना माहीत आहेत. पण, या व्यक्तिरेखा इथे सामान्य मानवी मनाच्या आरशातून तो इतिहास समोर मांडतात. एका भागात गंगा नदीच्या काठावर बसून कुंती गतजीवनाच्या घटना आठवते आहे. भीम, द्रौपदी, अर्जुन, कर्ण, शल्य, कृष्ण यांच्या दृष्टिकोनातून अनेक प्रसंग समोर येतात. गतकाळातील स्मृतींद्वारा कथानक पुढे जाते आणि मग युद्धाला प्रारंभ होतो. ही कादंबरी आशयदृष्ट्या संपन्न आहेच; पण तिची बांधणी अतिशय लक्षवेधी व अचूक झालेली आहे. ‘पर्व’मध्ये लेखकाने पौराणिक मिथकांमध्ये अडकून न पडता, व्यक्तिरेखांच्या अंतरंगात प्रवेश केलेला आहे. त्यांच्या आयुष्यातील अनेक वादळे, अनेक तळमळींचे प्रसंग, मनोभंग, स्वप्न व वास्तव यांचा गुंता आणि त्यांच्या मनातील कोलाहल बारकाईने टिपले आहेत. पण, हे टिपताना भैरप्पांची लेखणी तटस्थ राहते, हे विशेष! किंबहुना, अतिशय जोमदार वेगवान शैलीत कथानक पुढे नेताना हा लेखक अतिशय तटस्थपणे घटनांकडे, व्यक्तिरेखांकडे पाहतो. अर्थात, हे त्यांचे वैशिष्ट्य प्रत्येक कादंबरीतच दिसते. ते कुठल्याही व्यक्तिरेखांच्या अनाठायी प्रेमात न पडता, भावूकता टाळून त्यांच्यातील मानवी संवेदन उकलून दाखवतात. द्रौपदी आपल्याला नेहमी मनस्विनी, अभिमानी, देहस्विनी अशी माहीत आहे. पण, इथे मात्र अर्जुनाने सुभद्रेशी विवाह केल्यावर ती मनातून दुखावते व नंतर समंजस भूमिकाही घेते. अर्जुन व भीम यांचे संबंध अंतर्गत तणावाचे आहेत. वासना, युद्ध व मृत्यू या तीन बिंदूंभोवतीच आयुष्य फिरते आणि शेवटी येणारी व्यर्थपणाची भावना ही कादंबरी अधोरेखित करते.
भैरप्पांच्या कोणत्याही कादंबरीत असणारा हा बांधेसूदपणा वाचकाला खिळवून ठेवतो. कादंबरी संपल्यावर कधीकधी मानसिक थकवा येतो व त्याचवेळी आपण माणूस म्हणून अधिक समृद्ध झालो, असाही अनुभव येतो. ‘पर्व’ कादंबरीचे वाचन हा असा द्विस्तरीय अनुभव देतो. त्यांच्या सर्वच पुस्तकांमध्ये भारतीय जगण्याचा स्पर्श आणि त्या जगण्याचा अंश आहे. सगळ्या कादंबर्या गुंतागुंतीच्या, अनेक उपकथानके असणाऱ्या आहेत. अनेक वेळा परंपरागत निवेदनशैली, कथनशैली टाळून एका वेगळ्या शैलीचा वापर केलेला दिसतो.
‘साक्षी’ हीदेखील अशीच उत्कृष्ट कादंबरी आहे. साक्ष देणं, खरं बोलणं हे फक्त रूढ अर्थाने न घेता, आपल्या अंतरात्म्याशी केलेला संवाद, अशा दृष्टीने इथे पाहिले आहे. याचा संबंध आपल्या मन, बुद्धी व चित्ताशी आहे. मानवी मनाचा संघर्ष डोळ्यांसमोर ठेवून लिहिलेली ही कादंबरी गतिमान व मानवी भावनांची अतर्य रूपे चित्रित करते. या कादंबरीची सुरुवातच वैशिष्ट्यपूर्ण आहे. सत्प्रवृत्त, सात्विक मनाचा गांधीवादी नायक परमेश्वरय्या मृत्यू पावला आहे व स्वर्गामध्ये यमाच्या सभेमध्ये स्वतःच्याच पूर्वायुष्याकडे बघतो आहे. त्याला सूक्ष्मदेहाने भूतलावर येण्याची मुभा दिलेली आहे. त्याने जावयासाठी खोटी साक्ष दिली आहे व त्यानंतर आत्महत्या केलेली आहे. यानंतर एका गतिमान कथानकाचा प्रवास सुरू होतो. नायकाचा जावई म्हणजे, त्याच्या पूर्ण विरोधी वृत्तीचा, स्वभावाचा मंजय्या हा रंगेल पुरुष आहे. ज्याच्या प्रेमात परमेश्वरयाची मुलगी आकंठ बुडते व त्याच्याशी विवाह करते. या रंगेल पुरुषाची व्यक्तिरेखा कुठेही कृतक, उपरी, खोटी वाटत नाही. कादंबरीच्या शेवटी मात्र अतिशय नाट्यपूर्ण कलाटणी येते. ज्या भरलेल्या तळ्याशी ही मुलगी मंजय्याच्या प्रेमात पडलेली असते; काही वर्षांपूर्वी तिची आई त्याच तळ्याकाठी मंजय्याकडे मोहित झालेली असते.
भैरप्पांच्या पुस्तकातील कथानक किंवा त्यांच्यातील मूळ आशयबंध असे दोन-चार वायांमध्ये सांगता येणे शयच नाही. मानवी मनातील वासना, मोह, विचार, अनैतिकता हे अतिशय टोकदारपणे या कादंबरीत व्यक्त झालेले आहेत. पण, गतिमान घटनाप्रधान असल्या, तरी भैरप्पांच्या कादंबर्या रंजनवादी नाहीत. वाचकाला उत्सुकता वाटेल, असे ताण निर्माण करायचे, कुतूहल निर्माण करायचे व ते शमवायचे अशी रचना कुठेही दिसत नाही. वास्तव जीवन जसे कधी सरळ असते, कधी अडखळत, चुकत जाते, दोलायमान होते, त्यात विविध आंदोलने असतात, तसा हा लेखनप्रवाह आहे.
भैरप्पांची कादंबरी वाचायला घेतली की, ते वातावरण हळूहळू वाचकाच्या मनात भिनत जाते. ती माणसे, त्यांचे मनोव्यापार, त्यांचे मनोधर्म, त्यांची भाषा त्यांच्या रूढी, त्यांचे प्रश्न, तिथली घरं, बाजारपेठा, माणसं, पदार्थांची वर्णने, पात्रांचे रागलोभ, भावनांची स्थित्यंतरे या सगळ्यांचा एकसंध परिणाम आपल्या मनावर होतो.
भारतीय शास्त्रीय संगीताचीही जाण भैरप्पांना होती. ‘मंद्र’ ही कादंबरी त्यावरच आधारित आहे. अतिशय दीर्घ टप्प्याची ही कादंबरी आहे. ‘तंतू’ ही कादंबरीसुद्धा प्रदीर्घ आहे. भैरप्पांच्या कादंबर्या दीर्घतेकडे वळतात. कारण, ते काळाचा पट अतिशय सूक्ष्मतेने कवेत घेतात. त्यामध्ये फक्त माणसांचे जगणे नसते ते काळाचे स्पंदन असते. त्या कालखंडाचा स्वर त्यामध्ये उमटतो आणि तरी मानवी मनातील आरोह-अवरोह असतात.
‘गृहभंग’ ही त्यांची लोकप्रिय कादंबरी जे एका अर्थाने त्यांचे आत्मचरित्र आहे. नंजम्मा ही एका खेड्यातील सात्विक, सालस, कष्टाळू वृत्तीची बाई. तिचा नवरा गावचा शानभोग आहे; पण तो अतिशय नाकर्ता, आळशी आहे. ही कादंबरी एकट्या नंजम्माची नाही, तर भारतातील कोणत्याही खेड्यातील कष्टाळू स्त्रीची आहे, जिला असा कर्तृत्वहीन नवरा मिळतो आणि तिचं जगणं खडतर होत जातं. ‘माझ्या जगण्याचा हेतू काय?’ असा विदीर्ण करणारा प्रश्न ती विचारते. या कादंबरीत तर अनेक घटना, प्रसंग इतके उत्कट व सरस उतरले आहेत की, वाचकाला एक क्षण वाचन थांबून शांत बसावेसे वाटते. गरोदर नंजम्मा दोन मुलांना हाताशी धरून उन्हात चालते, तो प्रसंग किंवा तिची मुलगी व मुलगा एकाच दिवशी लागोपाठ मरण पावतात, तो प्रसंग हे अतिशय उत्कट झालेले आहे. प्रचंड बारीक-सारीक तपशिलांनी ही कादंबरी जिवंत झाली आहे. नंजम्माच्या मुलीचं वर्णन भैरप्पा करतात, तिचा गोल चेहरा, त्या भोवतीच्या कुड्या, चेहर्यावरील निरागसता किंवा छोट्या विश्वचा खोडकरपणा हे सगळं साक्षात आपल्यासमोर उभं राहतं. या कादंबरीला एक करूण अशी महिरप आहे. पण, इथेही भैरप्पांची लेखनशैली तटस्थ आहे. जे आहे ते स्पष्ट दाखवणारी अशी ती शैली अकारण भावनिक होत नाही. पण, वाचक मात्र त्या संगरात पूर्णपणे चिंब होतो. हेच त्यांचं वैशिष्ट्य!
‘आवरण’ या कादंबरीच्या एकूण ३४ आवृत्ती निघाल्या. ती विवादास्पद ठरली. यात आंतरधर्मीय विवाह, हिंदू-मुसलमान संबंध, मुघलकालीन इतिहास इत्यादींवर भैरप्पांनी प्रकाश टाकला आहे. यातून सत्य महत्त्वाचे की, आपली विचारधारा? असा एक विचार ते समोर ठेवतात. त्यांच्या सर्वच कादंबर्यांना एक वैचारिक बैठक आहे. ‘वंशवृक्ष’ ही कादंबरी वंश सातत्याच्या कल्पनेला छेद देणारी आहे. अपत्यावर पहिला अधिकार कोणाचा? मातेचा का पित्याचा? अशी बीजरेषा असणारी ही कादंबरी वाचताना अतिशय रसपूर्ण अनुभव देते.
भैरप्पांच्या अनेक कादंबर्यांमध्ये रूढ गोष्टींपेक्षा वेगळा विचार दिसतो, बंडखोरी दिसते. त्यांच्या लेखणीत थेटपणा आहे. त्यांचा अभ्यास, व्यासंग व मुख्य म्हणजे, मानवी जगण्याची असलेली खोल जाण प्रत्येक कादंबरीत दिसते. त्यामुळे त्यांच्या कादंबर्या रंजनवादी नसतानाही लोकप्रिय ठरल्या. त्या गुंतागुंतीचे व्यामिश्र अनुभव प्रकट करतात. अशा वाचनामुळे वाचकाला एकाच आयुष्यात वेगवेगळे जीवनानुभव घेता येतात. भैरप्पांच्या पुस्तकातील पात्रे, घटना कधी प्रगल्भ निर्मळ अनुभव देतात, कधी वासनांची दलदल दाखवतात, मानवी मनाचे क्षूद्रपण दाखवतात, कधी करूणेचा स्पर्श, ईश्वरी प्रसादाचा अनुभव, कधी टोकाचे राजकारण, लोभ, मत्सर, निराशा, ईर्षा, सुखलोलुपता, अतिमहत्त्वाकांक्षा, ध्येयवाद, शरीर प्रेम, आध्यात्मिक ओढ अशा अनेक भावना प्रत्ययास येतात.
कुठलेही पुस्तक वाचल्याने आपल्या आयुष्यात प्रत्यक्ष भौतिक बदल होत नसतात. पण, आपल्या मनोधारणा, समज नक्कीच बदलत जाते. ती समृद्ध होत जाते. दोस्तोवस्की या श्रेष्ठ रशियन कादंबरीकाराची पुस्तकं वाचताना पहिल्यांदा काहीच घटना घडत नाहीत. तो मजबूत पार्श्वभूमी तयार करतो. पानांमधून पाने अशी जातात आणि मग सुरुवात होते. आपल्याकडे भालचंद्र नेमाडे यांच्या कादंबरीतही काही प्रमाणात असं घडतं. भैरप्पांची कादंबरी सुरुवातीचे संगीत ऐकू आल्यावर मूळ रागाची आवर्तने छेडली जावी व मन त्याच्यामध्ये गुंतून जावं, अशा प्रकारची आहे. ती एकाच वेळी तटस्थ व उत्कट आहे.
‘कादंबरी’ हा प्रकार संस्कृतमध्ये बाणभट्टाने आणला. त्यावेळी त्याने कदंब झाडांच्या फळांवरून हे नाव या साहित्यप्रकारासाठी योजलं होतं. कदंबाची फळे खाल्ल्यानंतर मनाला एक थोडीशी धुंदी व अलौकिक उत्कट अवस्था येते. उत्तम कादंबरी वाचनानेही असाच परिणाम घडतो. भैरप्पांची कादंबरी अशीच मनाला एका वेगळ्या अवस्थेकडे घेऊन जाणारी व समृद्ध वाट दाखवणारी आहे. त्यांच्या लेखनाचं मराठी वाचकांशी एक वेगळंच नातं आहे. या प्रतिभाशाली कादंबरीकाराला मराठी वाचकांतर्फे विनम्र श्रद्धांजली!
सुजाता राऊत