आदिशक्तीचे अपरिचित स्थान - बैताल मंदिर

    27-Sep-2025
Total Views |

शारदीय नवरात्र उत्सव सुरू असून, विश्वातील चैतन्यमयी असलेल्या शक्तितत्त्वाच्या उपासनेसाठी हा कालखंड सर्वोत्तम मानला जातो. त्यामुळेच देशभरातील देवीच्या अनेक मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी दिसते. देवीची अनेक मंदिरे ही भारतीय स्थापत्य कलेच्या उत्तम नमुन्यांपैकी एक गणली जातात. त्यांचे सौंदर्य बघणाऱ्याला प्रसंगी आनंदाबरोबरच विस्मितही करते. असेच एक देवीचे मंदिर म्हणजे ओडिशातील बैताल मंदिर होय! या मंदिराच्या इतिहासाबरोबरच स्थापत्याच्या दृष्टीने त्याच्या सौंदर्यस्थळांचा घेतलेला मागोवा...

शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने आज आपण, देवीला समर्पित केलेल्या एका वेगळ्या मंदिराची ओळख करून घेणार आहोत. ‘जगन्नाथाची भूमी’ म्हणून ओळख असलेला ओडिशा प्रांत. या भागाचे प्राचीन नाव ‘कलिंग’ असे होते. सम्राट अशोकाचे जे भयंकर युद्ध झाले, ते याच भूमीत. जैन आणि बौद्ध विचार देशभरात रुजला, त्याची सुरुवात इथून झाली. मौर्य, नंद, सातवाहन, महामेघवाहन, गुप्त, शैलोद्भव, भौमकर इत्यादी अनेक राजघराण्यांनी, या भागाच्या सांस्कृतिक विकासात मोलाचे योगदान दिले. कोणार्कमधले सूर्य मंदिर, पुरीमधले जगन्नाथ मंदिर आपल्याला माहीत आहेच; पण भुवनेश्वर (ओडिशा राज्याची राजधानी)मध्येदेखील शेकडोंच्या संख्येने मंदिरे उभारली गेली.

सर्वांत जुने परशुरामेश्वर मंदिर, कलिंग स्थापत्य शैलीचा सर्वोत्कृष्ट उदाहरण असलेले मुक्तेश्वर मंदिर, केदारगौरी मंदिर, पंचायतन ब्रह्मेश्वर मंदिर आणि सर्वांत मोठे लिंगराज मंदिर हे तिथेच आहे. ओडिशामध्ये तयार झालेल्या मंदिरांच्या शैलीला ‘कलिंग’ शैली असे म्हणतात. साधारण उत्तर भारत आणि मध्य भारत इथे असणार्या नागर मंदिर स्थापत्य शैलीमध्ये, याचा समावेश होतो. मंदिरासाठी वापरल्या जाणार्या संज्ञादेखील, कलिंग शैलीमध्ये वेगळ्या आहेत. आपण मंदिराच्या मध्यभागी असणार्या भागाला मंडप म्हणतो, त्यालाच इथे ‘जगमोहन’ असे संबोधन आहे. गर्भगृहावर असणार्या उंच भागाला आपण शिखर म्हणतो, त्यालाच कलिंग शैलीमध्ये ‘देऊळ’ असा शब्द आहे. रेखा देऊळ, पिढा देऊळ, खाकरा देऊळ असे त्याचे विविध प्रकारदेखील, भुवनेश्वरमधल्या मंदिरांमध्ये दिसतात. त्या त्या स्थानिक परंपरांचा झालेला परिणाम अशा पद्धतीने आपल्याला दिसून येतो.

याच भुवनेश्वरमधल्या बिंदू सरोवरापासून जवळ असणार्या, देवीला अर्पण केलेल्या बैताल किंवा वैताल मंदिराचे सौंदर्य आपण समजून घेणार आहोत. आजपासून साधारण १३०० वर्षांपूर्वी इसवी सनाच्या आठव्या शतकात, या मंदिराची रचना झाली. सर्वांत आधी आपण लक्षात घ्यायला हवे की, या मंदिराचे जे नाव आहे त्याचा संबंध ‘वेताळ’ या संकल्पनेशी नसून, ओडिया भाषेत ‘बोट किंवा नाव’ याला ‘बैतुल’ म्हणतात. तशा आकाराचे मंदिर असल्यानेच, बैताल मंदिर असे याचे नामकरण झाले.

खूप कमी आढळणाऱ्या ‘खाकरा’ प्रकारच्या शैलीमध्ये, या मंदिराची रचना केलेली आहे. अभ्यासकांच्या मते, या शैलीमधली मंदिरे ही शयतो देवी या संकल्पनेला समर्पित केलेली असतात. खालून वर निमुळते होत जाणारे शिखर, त्याच्यावर हत्तीच्या अर्धगोलाकार पाठीसारखी (गजपृष्ठाकार) रचना असलेला भाग आणि सर्वंत वर कळस अशी ही रचना. दक्षिणेतल्या मंदिरांमध्ये असणार्या गोपुरांची आठवण इथे आल्यावर आपल्याला होते. शिखराच्या खाली गर्भगृह असून, समोर आयताकृती मंडप आहे. या मंडपाच्या चारही कोपर्यांमध्ये छोटी देवळे असून, या देवळांची शिखरेदेखील अतिशय सुंदर बांधलेली आहेत. मुख्य शिखराचा खालचा भाग जिथे मंडपाच्या छताला जोडला जातो, त्या समोर दिसणार्या गोलाकार भागाला ‘शुकनासिका’ म्हणतात. इथे या भागात सूर्य आणि वर नटराज यांचे शिल्पं कोरलेले दिसते.

स्थानिक लोक या मंदिराला तिनीमुंडिया असेदेखील म्हणतात. गोलाकार भागावर असणार्या तीन कळसांमुळे, हे नाव पडले असावे. या तिन्ही कळसांना अनुक्रमे महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली यांचे प्रतीक म्हणतात. अशा तिन्ही एकत्रित देवींचे देऊळ म्हणजे कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर. या ठिकाणी देवीची उपासना चामुंडा रूपात होत असून, गर्भगृहात इतर मातृका मूर्तीदेखील ठेवलेल्या दिसतात. हे अतिशय दुर्मीळ असे उदाहरण आहे. गर्भगृहात अशा अनेक मूर्ती दिसत नाहीत, म्हणूनच हे मंदिर थोडे विशेष आहे. बाह्य भिंतींवर असलेल्या काही शिल्पांची ओळख आता आपण करून घेऊयात.

चामुंडा देवी या मंदिराची अधिष्ठात्री देवता आहे. इथे मोठ्या प्रमाणात तांत्रिक उपासनादेखील होत होती. स्थानिक भक्त या देवीला कपालिनी असेदेखील म्हणतात. देवीची मूर्ती आठ हातांची असून, पूजेमुळे पूर्ण झाकलेली असते. तिच्या गळ्यात नरमुंडमाला असून हातात तलवार, त्रिशूल, धनुष्यबाण, इत्यादी आयुधे आहेत. प्रेतावर विराजमान असलेल्या या देवीच्या पायाशी घुबड आणि कोल्हा हे प्राणीदेखील दिसतात.

अर्धनारीश्वर- शिव आणि पार्वती यांचे एकत्रित रूप म्हणजे अर्धनारीश्वर. पुरुष आणि प्रकृती एकत्र येऊन नवनिर्मिती होते, हेच तत्त्व सांगणारे शिल्पं. या शिल्पात अर्धा पुरुष आणि अर्धी स्त्री दाखवलेली आहे. दोघांचे कानातले, स्तनांचा भाग, कमरेचा बाक, अंगावरची वस्त्र, दागिने अशा सर्व गोष्टी वेगवेगळ्या कोरलेल्या आहेत. शिल्पशास्त्राच्या दृष्टीने हे अतिशय अवघड असे काम. शिवाने एका हातात अक्षमाला, तर पार्वतीने हातात आरसा पकडलेला आहे. दोघांच्या पाठीमागे, डोकावून बघणारा नंदीदेखील आपल्याला दिसतो.

महिषासुरमर्दिनी या मंदिराच्या बाह्यांगावर, देवकोष्ठात महिषासुरमर्दिनीचे अप्रतिम शिल्पं कोरलेले आहे. दुर्गा अष्टभुजा असून, हातामध्ये बाण, वज्र, त्रिशूळ आणि खङग घेतलेले आहे, तर दुसर्या बाजूला ढाल, धनुष्य आणि नाग अशी आयुधे आहेत. पाठीवर लावलेला बाणांचा भातादेखील स्पष्ट दिसतो. मनुष्याचे शरीर आणि महिषाचा चेहरा असलेल्या असुराला देवीने पूर्ण खाली दाबले आहे. त्याच्या खांद्यात त्रिशूळ खुपसले असून, दुसर्या हाताने त्याची मन पूर्ण वाकडी केली आहे. या शिल्पातल्या बघायच्या दोन महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे, देवीच्या हातात असलेल्या नागाने पकडलेली महिषाची जीभ आणि देवीचे वाहन असलेला सिंह एका बाजूने असुरावर हल्ला करत आहे. कलाकाराने आपले सर्व सामर्थ्य वापरून, ही कलाकृती घडवली आहे.

मंदिराच्या गर्भगृहात अनेक शिल्पं आहेत, त्यात सप्तमातृकादेखील आहेत. या सात देवतांच्या सात शक्ती असतात. त्यापैकी या फोटोमध्ये आपल्याला दोन दिसत आहेत. एक आहे ती ब्रह्माणी आणि दुसरी आहे ती माहेश्वरी, या अनुक्रमे ब्रह्मदेव आणि शिव यांच्या शक्ती होय. या देवतांकडे असणारी आयुधे आणि वाहन, या देवींकडे असतात. सृष्टीच्या उत्पत्तीनंतर ती सृष्टी सांभाळण्याचे काम या मातृकांच्या माध्यमातून होत असते. दक्षिणेतल्या चालुय राजांची ही देवता होय.

असे हे बैताल मंदिर गावातील रहदारीच्या रस्त्यावर, एका बाजूला उभे आहे. लिंगराज मंदिराकडे जाणारा रस्ता या मंदिरावरूनच जातो; पण फारशी लोकं इथं थांबत नाहीत. देवीच्या एका उग्र तत्त्वाला अर्पण केलेले हे मंदिर खूप विशेष आहे. शारदीय नवरात्रीच्यानिमित्ताने, महाकाली तुमचा आत्मवृद्धीचा मार्ग मोकळा करू देत, महालक्ष्मी सर्वप्रकारची संपन्नता तुम्हाला देऊ देत आणि महासरस्वती ज्ञानामृत तुमच्यावर शिंपडू देत अशी प्रार्थना करतो.

सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके |
शरण्ये त्र्यम्बके गौरि नारायणि नमोस्तुते॥


इंद्रनील बंकापुरे
७८४१९३४७७४