उद्धव ठाकरेंचे शेतकऱ्यांप्रती पुतणा मावशीचे प्रेम ; भाजपा गटनेते प्रविण दरेकरांचे जोरदार प्रत्युत्तर

27 Sep 2025 20:06:58

मुंबई, उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या विधानावर भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शेतकऱ्यांना ताकद आणि दिलासा देण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार निश्चितपणे करतेय. शेतकऱ्यांना मदतीचे काम गतीने सुरु आहे. हे संवेदनशील आणि बळीराजाचे सरकार आहे. शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या मोठ्या गोष्टी केल्याशिवाय हे सरकार राहणार नाही. मुख्यमंत्री शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधताहेत. उद्धव ठाकरेंनी काय केले? सहलीसारखा एकदिवसाचा दौरा केला. ठाकरे बाहेर बोलत असताना संजय राऊत आत बसून काजू, बदाम आणि पिस्ता खात होते. शेतकऱ्यांविषयीचे ठाकरेंचे पुतणा मावशीचे प्रेम संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, अशी सणसणीत टीकाही दरेकर यांनी केली.

पत्रकारांशी बोलताना दरेकर म्हणाले कि, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना कशा पद्धतीने घरात बसून कारभार केला हे महाराष्ट्राने पाहिले आहे. कोरोना काळातही व्हिडीओ कॉन्फरसिंग करत होते. घरातून बाहेर पडले नाहीत. मुख्यमंत्री सहाय्यता निधी लोकांनी दिलेला वापरु शकले नाहीत ही निष्क्रियता त्यांनी सिद्ध केलीय. शेतकऱ्यांना शंभर टक्के मदत मिळाली पाहिजे. शेतकऱ्यांचे एवढे नुकसान झालेय त्याचे गांभीर्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहे. राज्य सरकारचे प्रमुख नेते आज मैदानात आहेत. स्वतः मुख्यमंत्री शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधताहेत. उपमुख्यमंत्री अजीत पवारही शेताच्या बांधावर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर स्वतः मदत घेऊन शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे दुःख दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचेही दरेकर म्हणाले.

दरेकर पुढे म्हणाले कि, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भेटले. त्यावरही ते थांबले नाही. शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी दस्तूरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही त्यांनी भेट घेतली. शेतकऱ्यांना ताकद आणि दिलासा देण्याचा प्रयत्न फडणवीस सरकार निश्चितपणे करतेय. उद्धव ठाकरे यांना पत्रकार परिषद, लाईव्ह करणे या पलीकडे शेतकऱ्यांप्रती कुठलीही कणव नाही. केवळ राणाभीमदेवी थाटात यायचे, दोन-चार वक्तव्ये करायची, घोषणा-मागण्या करायच्या या पलीकडे ठाकरे काही करू शकत नाहीत, असा खरमरीत टोलाही दरेकरांनी ठाकरेंना लगावला.

ठाकरेंनी प्रशासन कधीच समजून घेतले नाही

दरेकर म्हणाले कि, उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते. मात्र त्यांनी कधीच प्रशासन समजून घेतले नाही. मदतीचे काही निकष असतात. त्यापलीकडे जाऊन निकष डावलून शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले आहे. ठाकरेंनी डोळ्यावर झापड बांधलीय. बेमालुमपणे तोंड चालवायला काही अक्कल लागत नाही. एक दुसऱ्याला वैयक्तिक आव्हाने देण्यापेक्षा शेतकरी अडचणीत आहे. तुम्ही मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसताय. बाळासाहेबांची ८० टक्के समाजसेवा उद्धव ठाकरेंनी बासनात गुंडाळून ठेवलीय, अशी टिकाही दरेकरांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तम प्रशासक


उद्धव ठाकरे यांच्या प्रश्नाला प्रत्युत्तर देत दरेकर म्हणाले कि, सलग तिसरी वेळ देशाचे प्रशासन पंतप्रधान नरेंद्र मोदी कसे चालवताहेत हे जनता पाहतेय. उद्धव ठाकरेंनी डोळ्यावर पट्टी बांधलेली दिसतेय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनात कशी गतिमानता आणलीय, पारदर्शक कारभार होतोय हे महाराष्ट्र पाहतोय. ज्यांनी अडीच वर्ष हातात पेन घेऊन सही केली नाही, मंत्रालयात गेले नाहीत त्यांनी प्रशासनाच्या गोष्टी करू नयेत, असे ठाकरेंना खडेबोल सुनवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले प्रशासक आहेत हे महाराष्ट्राने पाहिले असल्याचे दरेकरांनी म्हटले.


Powered By Sangraha 9.0