मुंबई : संघाची प्रार्थना भारतमातेप्रती भक्ती, प्रेम आणि समर्पणाची अभिव्यक्ती आहे. ही प्रार्थना म्हणजे आपण देशाला काय देऊ शकतो याचा संकल्प आणि त्यानंतर ईश्वराकडे देशसेवेसाठी बळ मागण्याची विनंती आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
संघ शताब्दी वर्षपूर्तीच्या निमित्ताने शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग येथील महर्षी व्यास सभागृहात सुप्रसिद्ध गायक पद्मश्री शंकर महादेवन यांनी गायलेल्या संघ प्रार्थनेचा ऑडिओ-व्हिडिओ प्रकाशित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, ऑडिओच्या माध्यमातून ही प्रार्थना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल. ही प्रार्थना स्वयंसेवकांना भारतमातेप्रती भक्ती, प्रेम आणि समर्पणाच्या सामूहिक संकल्पात आधार देते. संघाची 'प्रार्थना' ही देश आणि ईश्वर यांच्याविषयी स्वयंसेवकांचा सामूहिक संकल्प आहे.
शंकर महादेवन यांनी गायलेल्या प्रार्थनेचे ध्वनिमुद्रण लंडनमध्ये करण्यात आले आहे. शंकर महादेवन यांनी आपल्या सुरेल आवाजात प्रार्थनेला नव्या स्वरूपात रंग दिल्याने ते ऐकून कार्यक्रमादरम्यान उपस्थित सर्वजण मंत्रमुग्ध झाले. संघ प्रार्थनेचा हा नवीन आविष्कार स्वयंसेवकांना नवीन ऊर्जा प्रदान करेल, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत. सदर ध्वनि चित्रफीतीमध्ये संघाची प्रार्थना ही अर्थासहित घेण्यात आली असून हिंदीतील भावार्थ प्रसिद्ध निवेदक हरीश भिमानी व मराठीतील भावार्थ अभिनेते सचिन खेडेकर यांच्या वाणीतून मांडण्यात आला आहे. या ध्वनिफितीचे संगीत संयोजन कमलेश भडकमकर यांनी केले आहे. संगीतकार राहुल रानडे यांचे संगीत प्रार्थनेला लाभल्यामुळे प्रभाव अधिक वाढला आहे.
-------------------------------
संघ प्रार्थनेला कुठलाही धक्का न लावता सिमफोनिक संगीताचे कोंदण देण्याचा प्रयत्न नवीन ध्वनिफितीतून केला आहे. वास्तविक ब्रिटिशांचे आपल्यावर राज्य असताना संघ प्रार्थना लिहिली गेली; आज ८५ वर्षांनी ब्रिटिश वादकांकडूनच भारत मातेची प्रार्थना वाजवून घेतली, जो निश्चितच काव्यगत न्याय ठरेल, असे म्हणता येईल. या प्रवासात मला संघाची विचारशैली जवळून बघता - शिकता आली. सातत्य, चिकाटी, मेहनत या गोष्टींमुळेच राष्ट्र घडू शकेल, हा संघविचार घेऊन मी चालत होतो. गेली अडीच वर्ष या प्रार्थनेवर काम करत असल्याने ती मी जगलो आहे.
- राहुल रानडे, संगीतकार
=======
चौकट १
ही संघ प्रार्थना नरहरी नारायण भिडे यांनी लिहिली होती. १९३९ मध्ये झालेल्या एका बैठकीत तिचे प्रारूप तयार झाले. त्यानंतर २३ एप्रिल १९४० रोजी पुण्यात झालेल्या संघ शिक्षण वर्गात स्वयंसेवक यादव राव जोशी यांनी ती प्रथमच गाऊन दाखवली. तेव्हापासून ही प्रार्थना एक महत्त्वाचा भाग राहिली आहे. आता संघाच्या शताब्दी महोत्सवानिमित्त या प्रार्थनेला नव्या आविष्कारात सादर करण्यात आले.
======
चौकट २
दैनिक मुंबई तरुण भारताची बोलताना विश्व विभाग संयोजक सौमित्र गोखले म्हणाले की, जी प्रार्थना संघाचे स्वयंसेवक एकत्रितपणे म्हणतात आणि त्यातून राष्ट्रसेवेचा ध्यास घेतात अशी प्रार्थना एका दर्जेदार रेकॉर्डिंगच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे, याचा मनस्वी आनंद आहे. संघ शताब्दीच्या काळात ही प्रार्थना नक्कीच सर्वांपर्यंत सहजपणे पोहोचेल. विश्व विभागाची प्रार्थना देखील अशा स्वरूपात येईल यासाठी तयारी सुरू आहे.