ऑस्कर एन्ट्री ‘होमबाऊंड‌’मधून दिसणार कोरोनापेक्षा भयानक लॉकडाऊनचं वास्तव

    27-Sep-2025
Total Views |


एक काळ होता, जेव्हा समाजात जातीचे प्रस्थ होते. पण, आजघडीला हे समीकरण ‌‘प्रवर्गा‌’त बदललेलं दिसते. म्हणजे एखाद्याला थेट कोणत्या जातीतून येतो असं न विचारता, ती व्यक्ती कोणत्या प्रवर्गातून येतो, अशी बरेचदा विचारणा करण्यात येते. हे प्रवर्ग कुठले तर - जनरल, ओबीसी, एससी-एसटी आणि इतर. यांसारख्या सामाजिक वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‌‘होमबाऊंड‌’ या चित्रपटाची नुकतीच ‌‘ऑस्कर‌’साठी (2026) भारताकडून अधिकृत निवड झाली आहे. नोकरी मिळवताना किंवा शिक्षणासाठी प्रवेश घेताना ‌‘कॅटगरी‌’ अर्थात ‌‘प्रवर्ग‌’ हा ठरलेला. त्या आधारावरच शैक्षणिक, सरकारी नोकरीत प्रवेशाचे गणित ठरत असते. म्हणूनच मग आरक्षणाने खरंच जातीय भेदभाव संपला की नव्या रूपात पुन्हा उभा राहिला, यावर ‌‘होमबाऊंड‌’ हा चित्रपट विचार करायला भाग पाडतो.

तसेच ‌‘कोरोना‌’ काळातल्या परिस्थितीचा विचार केला, तर अनेकांसाठी हा काळ संपूर्ण आयुष्याची घडीच बदलणारा ठरला होता. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, कोणाचे व्यवसाय बुडाले, तर तळहातावर पोट असणाऱ्यांचे अतोनात हाल झाले. ‌‘लॉकडाऊन‌’च्या काळात खासगी, सार्वजनिक वाहतुकीवरील निर्बंधांमुळे कित्येकांनी हजारो किमी पायी प्रवास करुन आपलं गाव गाठलं, तर काहींच्या जवळची माणसं त्यांना कायमची सोडून गेली. या सामाजिक वास्तवावरही ‌‘होमबाऊंड‌’ चित्रपट भाष्य करतो. हा चित्रपट पत्रकार आणि लेखक बशरत पीर यांच्या ‌‘अ फ्रेण्डशिप, अ पॅन्डेमिक ॲण्ड अ डेथ बिसाईड द हायवे‌’ या पुस्तकावर आधारित आहे आणि हे पुस्तकही एका सत्यघटनेवर आधारित आहे.

या चित्रपटाची कथा उत्तर भारतातल्या एका लहानशा गावात सुरू होते, जिथे आजही मजुरी करणारे, राबणारे हजारो हात आहेत आणि साधी नोकरी जरी मिळवायची असेल, तरी त्यासाठी शेकडो किमी दूर वणवण भटकावं लागतं. याच गावातील चंदन कुमार आणि शोएब अली हे दोन मित्र. दोघेही आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने रंगवित असतात. दोघांच्याही घरची परिस्थिती अत्यंत बेताची. त्यामुळे लवकरात लवकर नोकरी मिळून त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवायचा आहे. दोघांनीही पोलीस-शिपाईपदासाठी परीक्षा दिलेली. पण, या परीक्षेचा निकालच न लागल्यामुळे, त्यांचे सरकारी नोकरीचे भविष्यही असेच टांगणीला लागलेले.

चित्रपटात चंदन ‌‘एससी‌’ प्रवर्गातील असल्याने, त्याला कशी अनेकदा हेटाळणी सहन करावी लागते. मोठ्या अधिकाऱ्यांशी बोलताना त्याला त्याचा प्रवर्ग विचारला जातो, तर दुसरीकडे शोएबलासुद्धा मुस्लीम असल्याने समाजात विशेषतः खेडेगावात वावरताना धार्मिक भेदभावाचा सामना करावा लागतो. पण, असे असले तरी शोएब आणि चंदन दोघांनाही वास्तवाचं भान आहे आणि त्यामुळेच त्यांची मैत्री घट्ट आणि नोकरी मिळवण्याची जिद्दही कायम असते.

याचबरोबर दुसरीकडे सुधा भारती (जान्हवी कपूर) बरोबर चंदनची ओळख होते. दोघेही पदवी शिक्षणासाठी एकाच महाविद्यालयात प्रवेश घेतात आणि नंतर एकमेकांच्या प्रेमात पडतात.
सुधादेखील एससी प्रवर्गातील विद्यार्थिनी, पण तिच्या घरची आर्थिक परिस्थिती चंदनपेक्षा बरीच चांगली. त्यामुळे चंदनने पोलीस शिपायाची परीक्षा न देता, आणखी मोठं काहीतरी काम करावं, असं सुधाला वाटतं. चित्रपटाच्या पूर्वार्धातील हा सामाजिक आणि आर्थिक संघर्ष उत्तरार्धात मात्र अतिशय वेगळं वळण घेतो. पुढे ‌‘कोरोना‌’ काळातल्या भयानक वास्तवाचा चित्रपटातील ही सगळी पात्रे कसा सामना करतात, ते पाहून मन हेलावून जाते. शिवाय कथानक असे वळण घेते की, प्रेक्षकही हळहळल्याशिवाय राहत नाही.

या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज घायवान यांनी केले आहे, तर निर्मिती ‌‘धर्मा प्रोडक्शन्स‌’ची (करण जोहर, आदर पूनावाला) आहे. याशिवाय पटकथासुद्धा नीरज घायवान यांनीच शब्दबद्ध केलेली. 2015 साली असेच सामाजिक वास्तव मांडणाऱ्या ‌‘मसान‌’ चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील नीरज यांनीच केले होते आणि ‌‘मसान‌’ आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्याचप्रमाणे ‌‘होमबाऊंड‌’ची कथासुद्धा नीरज यांनी अगदी बारकाईने गुंफली आहे. वास्तवातलं गाव, गावातली माणसं आणि त्यांचं राहणीमान कोणत्याही अतिशयोक्तीशिवाय चित्रपटात दिसून येतं आणि हीच या वास्तवदश चित्रपटाची सगळ्यात जमेची बाजू ठरते. ‌‘कोरोना‌’ काळातील परिस्थिती तर अगदी डोळ्यांत अंजन घातल्यासारखी असून, प्रेक्षकांच्या ‌‘त्या‌’ कटु आठवणींच्या जखमांची खपली अलगद पुन्हा काढून जाते. तसेच चित्रपटातील प्रत्येक भूमिकेसाठी कलाकारांची निवडसुद्धा यथायोग्यच म्हणायला हवी.

अभिनेता इशान खट्टर (चित्रपटातला शोएब अली), विशाल जेठवा (चंदन कुमार), जान्हवी कपूर (सुधा भारती) या तिन्ही मुख्य कलाकारांनी आपापल्या भूमिकांना पुरेपूर न्याय दिला आहे. इशान खट्टर आणि विशाल जेठवा यांची बरीचशी दृश्ये पाहायला मिळतात. इशानने आतापर्यंत केलेल्या चित्रपटांपैकी त्याची ही उत्कृष्ट कामगिरी नक्कीच म्हणता येईल. विशाल जेठवा चित्रपटाच्या उत्तरार्धात नक्कीच प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणतो. जान्हवी कपूरच्या वाट्याला फार दृश्ये आली नसली, तरी तिनेही सुधाची भूमिका चांगली वठवली आहे.

चित्रपट फारसा रेंगाळत नाही. बॉलीवूडच्या मनोरंजनात्मक पठडीतला चित्रपट नसून, सामाजिक वास्तव मांडण्याचा प्रयत्न दिग्दर्शकाने केला आहे. त्यामुळे दिग्दर्शक नीरज घायवान ‌‘मसान‌’प्रमाणेच पुन्हा एकदा ‌‘होमबाऊंड‌’च्या दिग्दर्शनातही यशस्वी ठरले आहेत. चित्रपटात गाणी नसली तरी काही ठिकाणी समर्पक संगीत कानावर पडतं. एकंदरीत आजच्या काळातील सामाजिक भेदभाव, देशातील नोकऱ्यांचं वास्तव, ‘कोरोना‌’चा कठीण काळ आणि जीवलग मैत्री अशा विविध मानवी भावभावनांवर प्रकाश टाकणारा असा हा चित्रपट...

‘होमबाऊंड‌’ला यंदाच्या ‌‘कान्स चित्रपट महोत्सव‌’ आणि ‌‘टोरोंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा‌’तदेखील स्थान मिळाले होते. त्यामुळे प्रेमकथा, विनोदीपट आणि हाणामारीचे बॉलीवूड मसाला चित्रपट सोडून काही वेगळं पाहायचं असेल, तर ‌‘होमबाऊंड‌’ हा चित्रपट नक्की पाहता येईल.


चित्रपट : होमबाऊंड
निर्मिती : करण जोहर,
आदर पूनावाला
दिग्दर्शक, पटकथा : नीरज घायवान
संवाद : नीरज घायवान,
वरुण ग्रोवर, श्रीधर दुबे
कथा : बशरत पीर,
नीरज घायवान, सुमित रॉय
कलाकार : इशान खट्टर, विशाल जेठवा, जान्हवी कपूर
छायांकन : प्रतीक शाह
संकलन : नितीन बैद
रेटिंग :३.८/५