नवरात्री म्हणजे आदिशक्तीचा जागर. या उत्सव काळात आदिशक्तीच्या वेगवेगळ्या रूपांना वंदन करत, आपण शक्तीची उपासना करतो. वेदकाळापासूनच आपल्याकडे विविध पद्धतीने देवीची उपासना करण्यात आली आहे. देवी स्तुतीबाबत वेदांमधील उल्लेख, रचना, अभंग, आरत्या या प्रवासाचा घेतलेला मागोवा...
दुर्गे दुर्गट भारी तुजविण संसारी |
अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी |
वारी वारी जन्ममरणांते वारी |
हारी पडलो आता संकटनिवारी ॥ही नित्योपासनेतील म्हटली जाणारी देवीची लोकप्रिय आरती, नरहरी महाराजांनी रचलेली आहे. या आरतीतून प्रगट होणारा भक्तिभाव इतका उत्कट आहे की, भक्तांच्या अंतःकरणातील देवीविषयीची अनन्य श्रद्धा व्यक्त होते आणि दुर्गा अनाथ भक्तांना सनाथ करते. देवीविना असलेला हा संसार दुर्घट आहे, कठीण आहे, कारण देवी म्हणजेच आत्मशक्ती किंवा सार्या विश्वाची चैतन्यदायी, ज्ञानदायी, शौर्यदायी देवता आहे. अशा या देवीला भक्त आवाहन करतो की, या जन्ममरणाच्या फेर्यातून म्हणजे, या संसार बंधनातून तू माझी सुटका कर. या देवीचे स्वरूप निश्चित करण्यासाठी चारही वेदांनी, सहा शास्त्रांनी अतिशय पराकाष्ठा केली पण, त्यात त्यांना यश आले नाही. या सर्वांना दुलर्भ असणारी जगदंबा अनन्यभावाने शरण आलेल्या भक्ताच्या हाकेसरशी धावून जाते, अशी त्यांची श्रद्धा या आरतीतून व्यक्त होते.
भक्तांनी देवीची अनेक रूपे मानलेली आहेत. त्यातील मुख्य रूपे म्हणजे महालक्ष्मी, महासरस्वती आणि महाकाली ही होय. या देवीची म्हणजे शक्तीची उपासना ‘शाक्तपंथा’त केली जाते. यामध्ये परमेश्वराची किंवा परमतत्त्वाची कल्पना स्त्रीरूपात केली जाते. परमतत्त्व ज्याप्रमाणे सर्वव्यापी आहे, त्याप्रमाणे शक्तीही सर्वव्यापी आहे. शक्ती ही विश्वजननी आहे. सत्त्व, रज, तम अशी त्रिगुणात्मक शक्ती जेव्हा व्यक्त होते, तेव्हा ती श्रीमहासरस्वती, श्रीमहालक्ष्मी आणि श्रीमहाकाली अशी रूपे धारण करते. कोणकोणत्या लोकांत आपला निवास आहे, हे दुर्गादेवीने शंकरांना सांगितले. ’वैकुंठात श्रीमहालक्ष्मी, गोलोकात राधिका, शिवलोकात शिवा आणि ब्रह्मलोकात सरस्वती या रूपात मी राहते. वेदमाता सावित्री मीच आहे, जनककन्या सीताही मीच आहे, भीमककन्या रुमिणी आणि वृषभानुसुता राधादेखील मीच आहे.’ असे जगदंबा सांगते.
दुर्गेचे सर्वप्रथम वर्णन आणि स्तोत्र महाभारतात आढळते. महाभारतातही ही देवी भक्तांची विघ्नं, अरिष्ट दूर करणारी होती. महाभारत युद्धात जय मिळावा, म्हणून श्रीकृष्णाने युद्ध प्रसंगी अर्जुनाला तिची स्तुतीगान करण्यास सांगितले. अर्जुनाने रथावरून खाली उतरून तसे केले असता, त्याक्षणीच दुर्गादेवी अंतरिक्षात प्रगट झाली आणि तिने अर्जुनाला तू युद्धात अजिंय ठरशील असा वर दिला.
देवी माहात्म्यातही दुर्गेच्या महापराक्रमाचे वर्णन केलेले आहे. तिने महिषासूर, चंडमुंड आणि शुंभनिशुंभ या बलाढ्य असुरांचा वध केला. त्यामुळे दुर्गादेवी महाशक्ती ठरली.
दुर्गा म्हणजे शक्ती! दुर्गेचा उगम ऋग्वेदातच झाल्याचे आढळून येते. ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलात आंभृणी वाक् हिचे एक सूक्त आहे. ती वाक् म्हणते, मी संपूर्ण जगताची स्वामिनी आहे. पूजनीय देवतांमध्ये मी प्रधान आहे. संपूर्ण भूतांच्या ठिकाणी माझा प्रवेश आहे. मी उपासकांना वैभव व सामर्थ्य प्राप्त करून देते.
दुर्गेच्या रूपविस्तारात तिची रौद्र आणि सौम्य अशी दोन रूपे आढळतात. आदिशक्तीची दुर्गा, त्रिपुरसुंदरी, ललिता, महाभैरवी, आनंदभैरवी अशी अनेक नावे आहेत. शाक्तपंथाचे देवीपुराण, कालिकापुरण, देवीभागवत, सप्तशती इत्यादी अनेक ग्रंथ आहेत. ‘देवीभागवत’ हे उपपुराण असून, आदिशक्ती असलेल्या दुर्गेचे माहात्म्य वर्णन करणे आणि तिच्या उपासनेच्या विधीविधानांचे सांगोपांग निरूपण करणे, हा या पुराणांचा प्रमुख विषय आहे.
शाक्तसंप्रदायाप्रमाणेच विविध आचार्य, संतश्रेष्ठ यांच्या वाङ्मयातही देवीस्तवने आढळतात. वेदवाङ्मयातही देवीचे स्तवन फारच अप्रतिम केलेले दिसते. त्यात सर्वांत लोकप्रिय म्हणजे ‘श्रीसूक्त’ होय. हे २५ ऋचांचे लक्ष्मीप्रद सूक्त आहे. अक्षय टिकणार्या लक्ष्मीचा महिमा त्यात वर्णिला असून, यात पुत्र, पौत्र, धनधान्य, संपन्नतेसाठी लक्ष्मीची प्रार्थना केली आहे. त्याचप्रमाणे क्रोध, मत्सर, लोभ, अशुभमती निर्माण न व्हावी, यासाठीही लक्ष्मीला प्रार्थिले आहे.
न क्रोधो नच मात्सर्यमन लोभो नाशुभामतिः ॥
भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तम् जपेत ॥श्रेष्ठ आचार्य आद्यशंकराचार्य यांच्या भक्तिस्तोत्रातही जगत्जननीच्या भक्तीचा गंध दरवळला आहे. ‘देवीभुजंगस्तोत्रम’मध्ये त्यांनी, आई भवानीला भक्तियुक्त अंतकरणाने त्रिवार वंदन केले आहे. शिवाशी, भवाशी सर्वस्वी अभिन्न आणि एकरूप असलेली शक्ती म्हणजे भवानी होय. ही भवानी माता म्हणजे, साक्षात कुण्डलिनीच आहे, असे ते म्हणतात. ‘त्रिपुरसुंदरीस्तोत्रम’मध्ये त्रिपुरसुंदरी ही जगत्जननीचे एक महन्मंगलरूप असून, ही देवी या स्तोत्राची आराध्यदेवता आहे. तिच्या वैभवाचे वर्णन करून तिच्या चरणी ते अत्यंत विनम्रपणे, भक्तियुक्त अंतःकरणाने लीन होतात. तसेच, याच त्रिपुरसुंदरीच्या स्तुतीपर ‘ललितापंचरत्नस्तोत्रम’ हे स्तोत्र रचलेले आहे. शंकराचार्यांचे ‘सौंदर्यलहरीस्तोत्र’ हे भक्तियुक्त असे अद्वितीय काव्य आहे. यामध्ये त्यांनी जगत्जननीचे माहात्म्य वर्णिले आहे.
ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या ‘अमृतानुभव’ या ग्रंथात प्रारंभी ‘देवो देवी नमन’ म्हणून, शिवशक्तीला वंदन केले आहे. संतश्रेष्ठ एकनाथ यांच्या स्फुटरचनांमध्ये त्यांनी महालक्ष्मी, अंबा यांचे रुपकात्मक स्तवन केले आहे आणि अंबामातेचा गोंधळ मांडला आहे.
अनादि अंबिका भगवती | बोध परडी घेऊनी हाती|
पोत ज्ञानाचा पाजळती | उदो उदो भक्त नाचती|
गोंधळ येई वो जगदंबे मूळ पीठ तू जगदंबे ॥अनादि निर्गुण आई भवानी महिषासूरमर्दिनी पुढे ते जन्ममरणाचा फेरा चुकविण्याचा जोगवा मागतात.
‘नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा| करूनी पोटी मागे ज्ञानपुत्रा|’ अशी शब्दरचना करतात.
महालक्ष्मीच्या विविध रूपांना ते आवाहन करतात.
अलक्षपूर भवानी दार उघड बया|
माहुरलक्ष्मी दार उघड बया|
कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बया|
तुळजापूर लक्ष्मी दार उघड बया॥असा महालक्ष्मीचा जागर केला आहे आणि ‘दार उघड बया’ असे म्हटल्याने, आपली आत्मशक्ती जागृत होवो असे ते विनविता. तर मायेने निर्माण झालेल्या जगत् भासाचे दार बंद करून अंतर्मुख करण्याचे अंबामातेला साकडेही घालतात.
आषाढी कार्तिकी गोंधळ मांडिला| उदो उदो ऐसा शब्द झाला|
कामत्रेधादिकां पळ सुटला| उदो शब्द ऐकोनी बया दार लाव|असे इंद्रियांना अंतर्मुखतेकडे वळवून, ईश्वरचिंतन करण्यासाठी सिद्ध कर असे मागणे मागतात. मरीआई, सटवाई, यलम्मा या देवींना आळवून त्यांचे गुणस्तवनही एकनाथांनी केले आहे.
नमो अनादि माया भगवती| मूळपीठ निवासिनी|
स्वये ज्योति अविनाशिनी| जगदंबे माये उभी राहे॥१॥अनादि माया हिच भवानी रूपात प्रकट झाली आहे, असे कल्पून त्यांनी भक्तांच्यावतीने तिला साकडे घातले आहे.
सत्वर पाव गे मला| भवानी आई रोडगा वाहिन तुला|
या प्रसिद्ध रोडगा रूपकात सासरा, सासू, जाऊ, नणंदेचं पोर अशी रूपके योजून भवानीपुढे मुक्तीची याचना केली आहे. ‘भावार्थरामायण’ या त्यांच्या ग्रंथात त्यांनी या तुळजा भवानीला ‘रामवरदायिनी’ असे नाव दिले आहे. रामाने सीतेच्या सुटकेसाठी आणि रावणाला शासन करण्यासाठी जेव्हा लंकेवर स्वारी केली, तेव्हा भवानीने प्रभू रामचंद्रांना विजयाचा आशीर्वाद दिला होता. म्हणूनच तिला ‘रामवरदायिनी’ अर्थात रामाला वर देणारी असे नाव त्यांनी दिले आहे.
रामदासांनी या रामदायिनीचा मनोभावे जयजयकार केला. पूर्वी देवीने चंड, मुंड, महिषासुर इत्यादी अनेक दैत्यांचा संहार केल्याच्या कथा पुराणात सांगितल्या आहेत. त्याप्रमाणेच रामदासांच्या काळात जे दैत्य धिंगाणा घालीत होते, त्यांचा संहार करण्यासाठी समर्थ रामदास देवीपुढे मागणे मांडताना दिसतात.
दुष्ट संहारिले मागे| ऐसे उदंड ऐकतो|
परंतु रोकडे काही| मूळ सामर्थ्य दाखवी॥असे ते भवानीला सांगतात. ‘तुळजामाता’ ही समग्र महाराष्ट्राची कुलदेवता. समर्थांचे आराध्य दैवत श्रीरामाच्या देवबंधविमोचनाच्या कार्यात तिने वर दिला होता, म्हणून समर्थांनीही तिला रामवरदायिनी असे म्हटले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना या भवानी देवीनेच तलवार दिली होती. ती भवानी देवी सर्व जगाचे संचलन, संरक्षण, संवर्धन करणारी शक्ती आहे. ‘आनंदवनभुवनी वरद जाली’ असे रामदास एका पदात म्हणतात. ‘करुणाकल्लोळ’, ‘जीवीची जीवनकला’, ‘नादबिंदूकला’, ‘निजात्मसुखसोहळा’, ‘अनादिकुलस्वामिनी’ अशा अनेक संस्कृतप्रचूर विशेषणांनी समर्थांनी स्तोत्रात तुळजाभवानीला गौरविले आहे.
या सर्वरूपी, सर्वात्मक, मायेपलीकडच्या अद्वैतरूप इंद्रियांना अगोचर असणार्या आदिमायेचे हे स्तोत्र आहे. ही आदिशक्ती सर्व देहात, वस्तूमात्रांमध्ये विस्तारलेली सर्वव्यापी शक्ती आहे. ती ब्रह्मादिकांची जननी म्हणून समर्थ तिला गौरवतात.
सर्वाघटी विस्तारलेली| शक्ती सर्वांसी व्यापिली|
सृष्टी घुमेचि लागली॥ ब्रह्मादिकांची जननी|
माता रामवरदायिनी| रामदास ध्यातो मनी॥रामाला वर देणारी आदिमाता, तुळजाभवानी यांचं रूप माझ्या मनात साकार झाले आहे. ती विश्वव्यापी असून, ती भक्ताच्या हृदयात वास करते आहे, असा विश्वास, समर्थ रामदास त्यांच्या पदांतून व्यक्त करतात. जगन्माता अष्टभुजा, तुळजाभवानी आपल्यावर प्रसन्न झाल्यावर आपल्याला काय उणे आहे. उलट देव आणि देवी या दोघांचे अद्वैत आपणांस प्रत्ययास येते, असा विश्वास ते व्यक्त करतात आणि जीवन सार्थक झाले, असे त्यांना वाटते.
राम आणि वरदायिनी दोन्ही एकचि पाहाता|नाथपंचकापैकी एक संत कवी ‘विठारेणुकानंदन’, देवीचे थोर उपासक म्हणून मान्यता पावले आहे. त्यांना छत्रपती संभाजीनगरजवळच्या गोलटेगावात रेणुकादेवीचा साक्षात्कार झाला. तेथेच राहून त्यांनी रेणुकादेवीचे मंदिर बांधले. शिवशक्ती अद्वैतावर त्यांची श्रद्धा होती. अशी ही आदिशक्ती त्यांनीही उपास्य दैवत म्हणून गौरविलेली आहे. हिंदूसंस्कृतीने, आचार्यांनी, संतश्रेष्ठांनी गौरविलेली ही आदिशक्ती, सर्व विश्वासाठी मंगलदायक, शुभदायक आहे. आदिशक्तीच्या महामंत्राचा उच्चार केल्याने त्याची वलये उच्चारसामर्थ्य निर्माण करणारी असतात. या महामंत्रातून महन्मंगल देवीजवळ विश्वातील सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना व्यक्त झाली आहे.
सर्व मंगल मांगल्ये शिव सर्वार्थसाधिके |
शरण्येत्र्यंबके गौरीनारायणी नमोऽस्तुते॥डॉ. धनश्री साने
९८३३५७३९२७