निखळ मूल्य आणि सत्यनिष्ठ साहित्यिक

27 Sep 2025 22:10:39

अत्यंत प्रगल्भ जीवनदृष्टी, उत्तुंग प्रतिभा, निखळ मूल्यनिष्ठा, निर्भीड आणि सत्यान्वेशी अभिव्यक्ती, अशा अत्यंत दुर्मीळ म्हणून संगमाचे धनी सांतेशिवारा लिंगणय्या भैरप्पा यांचा देह दि. २४ सप्टेंबर २०२५ रोजी वयाच्या ९४ वर्षांची वाटचाल पूर्ण करून शांत झाला.

सामान्यपणे निसर्गतः प्राप्त झालेल्या गुणसंपदेला पैलू पाडणाऱ्या संस्कारांचे वातावरण, बालपणीच्या संगोपन विश्वात (कुटुंब, परिसर, शाळा इत्यादी) लाभले की, कोंदणातल्या हिर्यासारखी ती गुणसंपदा चमकू लागते. भैरप्पांना मात्र असे कोंदण लाभले नाही. अगदी लहानपणी वाट्याला आलेले खडतर जगणे आणि पुढे त्यांनी आकाराला आणलेली जीवनाची अभिव्यक्ती यांचा एकत्र विचार केला, तर आश्चर्याने थक्क होण्याची पाळी येते. त्यांच्या नावातच दाक्षिणात्य परंपरेनुसार समाविष्ट असलेल्या ‘सांतीशिवारा’ नावाच्या गावी (तालुका चन्नरायपट्टण, जिल्हा हासन, कर्नाटक) एका अत्यंत गरीब कुटुंबात भैरप्पांचा जन्म झाला. आठ भावंडांचा विशाल परिवार आणि कुटुंब प्रमुख बनविणारा कमावता पुरुष पूर्णतः नाकर्ता! अशा स्थितीत भैरप्पांची कर्तबगार आई गौरम्मा हिने अत्यंत धैर्याने आणि कष्टपूर्वक परिवार चरितार्थ सांभाळला. पण, भैरप्पांचे वय जेमतेम १२-१३ वर्षांचे असतानाच भयानक प्लेगच्या साथीमध्ये गौरम्मा आणि भैरप्पांचे भाऊ बळी पडले. अक्षरशः दुर्दैवाचे दशावतार भैरप्पा आणि त्यांच्या भावंडांच्या नशिबी आले. मात्र, विलक्षण बाब अशी की, आईने आखून दिलेल्या मार्गावर निष्ठापूर्वक चालत राहण्याचा वारसा भैरप्पांनी सोडला नाही.

तत्कालीन ग्रामीण संस्कृतीत प्रचलित असलेल्या प्रथेनुसार गावाने या असाहाय्य भावंडांच्या उदरभरणाची व्यवस्था केली. ‘वारान्न’ (वार लावून जेवणे) पद्धतीच्या साहाय्याने भैरप्पा शिक्षण घेत राहिले. परंतु, त्यांच्या गावात शिक्षणाची व्यवस्था अगदीच मर्यादित असल्याने शालेय शिक्षणाच्या काळातच त्यांना गावोगावी स्थलांतरित व्हावे लागले. चन्नरायपटन या तालुयाच्या गावी शारदा विकास विद्यालय, नवोदय विद्यालय अशा विविध शाळांमध्ये ते शिक्षण घेत राहिले. या दिवसात पोट भरण्यासाठी मात्र प्रसंगी भिक्षा मागण्याचीही वेळ त्यांच्यावर आली. छोटी-छोटी मजुरीसदृश कामे, घरोघरी फिरून अगरबत्ती विक्री यांच्या साहाय्याने कसाबसा चरितार्थ चालवीत असतानाही कष्टपूर्वक साठवलेली २५ रुपयांची पुंजी दुराचारी बापाने हिसकावल्याचा दाहक अनुभव भैरप्पांना त्या काळात घ्यावा लागला.

याच शालेय वयाच्या अवस्थेत त्यांच्या मानसिकतेला आणि व्यावहारिक जीवनाला अलौकिक वळणे खुणावू लागली. अगदी लहान वयातच अभ्यासू वृत्तीने वाचलेल्या गुरुर रामस्वामी अय्यंगार या संवेदनशील स्वातंत्र्यसैनिक लेखकाच्या वाङ्मयाने ते प्रभावित झाले, तर एका गूढ आध्यात्मिक ओढीच्या परिणामी माध्यमिक शिक्षण मध्येच थांबवून ते, जणू जीवनाच्या शोधार्थ, भटकंतीच्या मार्गाने गेले. याच क्रमात काही दिवसांत मुंबईत रेल्वे स्थानकावर त्यांनी हमालीही केली. तिथेच भेटलेल्या एका साधूंच्या जथ्थ्याबरोबर काही महिने त्यांनी भ्रमंती केली. त्यानंतर पुन्हा परतून म्हैसूर येथे त्यांनी शिक्षणसाधना सुरू केली. म्हैसूर येथेच ‘तत्त्वज्ञान’ विषयातील पदवी (बीए) प्राप्त केल्यानंतर म्हैसूर विद्यापीठात ‘एमए’ तत्त्वज्ञान ही उच्च पदवी सुवर्णपदकासह उत्तीर्ण केली. तेवढ्यावरही समाधान न मानता, बडोदा येथील महाराजा सयाजीराव विद्यापीठातून त्यांनी ‘पीएच.डी.’ही संपादित केली. त्यांच्या संशोधन प्रबंधाचा विषयही आगळाच होता. ‘सत्य आणि सौंदर्य’ या विषयावरील शोधप्रबंधाच्या आधारे त्यांनी ‘पीएच.डी.’ प्राप्त केली. याच सुमारास एकीकडे अध्यापन करीत असतानाच त्यांच्या लेखनसाधनेलाही सुरुवात झाली. १९९१ साली निवृत्त होईपर्यंत त्यांनी हुबळी येथील श्री काडसिद्धेश्वर महाविद्यालय, गुजरातमधील सरदार पटेल विद्यापीठ, एनसीईआरटी, नवी दिल्ली आणि शेवटी म्हैसूर येथील रिजनल कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र आणि मनोविज्ञान या विषयात अध्यापन केले.

‘भीमकाया’ ही त्यांची पहिली साहित्यकृती १९५८ साली प्रकाशित झाली. त्यानंतर सलग ६० वर्षांपर्यंत आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनाने ते साहित्यविश्व समृद्ध करीत राहिले. ‘वंशवृक्ष’ ही १९६२ साली प्रकाशित झालेली त्यांची पहिली कादंबरी. या कादंबरीपासून पुढे सुमारे २२ कादंबर्यांचे त्यांनी लेखन केले आणि त्यांची सारी पुस्तके विक्रमी खपाची मानकरी ठरली. ‘आवरण’ या त्यांच्या बहुचर्चित कादंबरीच्या तर आतापर्यंत तब्बल ३४ आवृत्या प्रकाशित झाल्या. साहित्य जगातील हा उच्चांकच आहे. ‘वंशवृक्ष’, ‘तंतू’, ‘काठ’, ‘पर्व’, ‘उत्तरकांड’, ‘मंद्र’, ‘साक्षी’, ‘सार्थ’, ‘परिशोध’, ‘पारखा’, ‘जा ओलांडूनी’ ही त्यांच्या मराठीत अनुवादित झालेल्या काही कादंबर्यांची नावे. या सर्व कादंबर्यांनी चढत्या- वाढत्या श्रेणी वाचकांच्या मनाचा ठाव घेतला. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, त्यांच्या लिखाणामागे केवळ लोकरंजक ललित साहित्याचीच प्रेरणा नाही. प्रत्येक कादंबरीच्या लेखनाचा बाज ललित लेखनाचाच असला, तरीही त्याला सखोल चिंतनाचा आणि संशोधक वृत्तीने केलेल्या मांडणीचा मूलाधार आहे. भारतीय संस्कृतीतील प्रगल्भ आणि उदात्त परंपरेबाबतची निष्ठा आणि मानवी जीवनाच्या व्यामिश्रतेचा घेतलेला मनोवेधक वेध यांचे भक्कम अधिष्ठान आपल्या लेखनात त्यांनी कसोशीने जपले आहे.

‘पर्व’ या कादंबरीतून महाभारतातील व्यक्तिरेखा आणि घटना यांचे विचारप्रवृत्त करणारे परिशीलन करणारा कल्पनाविस्तार वाचकाला अंतर्मुख करीत, एका वेगळ्याच उदात्त भावविश्वात पोहोचविणारा आहे. ‘उत्तरकांड’ या कादंबरीत परिपक्त अवस्थेतील सीता मातेच्या मनोव्यापारांचे, लक्ष्मणाच्या भावाकुल मनोवस्थेचे आणि खुद्द श्रीरामाच्या मानसिक तगमगीचे त्यांनी केलेले चित्रण विस्मित करून टाकणारे आहे. रामायण आणि महाभारतासारख्या अजरामर ऐतिहासिक घटनामधून व्यक्त झालेल्या उदात्त भारतीय जीवन मूल्यांविषयीचा कमालीचा आदर आणि त्याच घटनांमधून निर्माण होणारे अस्वस्थ करून सोडणारे जटील प्रश्न यांच्यातील अद्भुत समतोल उत्तरकांडातील सीतेच्या मनोविश्वाच्या भैरप्पांनी केलेल्या या चित्रणातून प्रत्ययाला येतो. ज्येष्ठ बंधू आणि राजा राम यांचे आज्ञापालन करण्याची कर्तव्यनिष्ठा एका बाजूला आणि त्याच आज्ञेद्वारे मातास्वरूप सीतेला वनात नेऊन सोडण्याच्या, अन्याय्य निर्णयाच्या कार्यवाहीतून वाट्याला आलेल्या अनवस्थेचे संकट दुसर्या बाजूला अशा कोंडीत सापडलेल्या लक्ष्मणाच्या मनातील तगमग अत्यंत प्रत्ययकारी शब्दांत भैरप्पांनी मांडली आहे अन् तितयाच मर्म ग्राही स्वरूपात सीतेच्या मनातला मूक आक्रोशही त्यांनी व्यक्त केला आहे.

‘आवरण’ या भैरप्पांच्या कादंबरीने तर अक्षरशः इतिहास रचला. केवळ खपाच्या आणि आवृत्तीच्या संख्येच्या विक्रमी आकड्यांमध्येच हा इतिहास साकार झालेला नाही. या कादंबरीतून त्यांनी डाव्या पुरोगामी विमर्षावर (प्रचलित भाषेत ‘नॅरेटिव्ह’वर) अत्यंत परखड भाष्य केले आहे. त्यावरून कन्नड साहित्याच्या वर्तुळात आणि विशेषतः वामपंथी विमर्शाचे समर्थन करणार्या साहित्यिकांच्या मांदियाळीत खळबळ उडवून दिली. त्याबद्दलचा वाद-प्रतिवाद करणारे लेख म्हैसूरच्या वृत्तपत्रांमधून प्रचंड प्रमाणात गाजले. भैरप्पांचे आपल्या मांडणीचे ठाम समर्थन करणारे तर्कशुद्ध लेख, तर विस्तारित (एन्लार्ज) आकारात छापून पोस्टरसारखे भिंतीवरून प्रसिद्ध केले गेले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, वादग्रस्त बनविल्या गेलेल्या त्यांच्या लिखाणातील प्रतिपादनाचे अत्यंत स्पष्ट प्रमाण देणारे आधार यांनी कादंबरीच्या अखेरच्या भागात एका लांबलचक सूचीद्वारे प्रदर्शित केले आहे. एखाद्या कादंबरीत, तथाकथित काल्पनिक कथास्वरूपात केलेल्या विवेचनाचे ऐतिहासिक आणि वाङ्मयीन प्रमाणांचे संदर्भ प्रसिद्ध करणारी ही साहित्यविश्वातील एकमेव ललित कलाकृती असावी. त्याच संदर्भसूचीतील आधारभूत वाङ्मयाचा अभ्यास करण्याचे आवाहन वादकर्त्या महाभागांना करून भैरप्पांनी त्या वादावर पडदा टाकला.

भैरप्पा यांच्या ‘दातू’ या साहित्यकृतीला ५० वर्षांपूर्वी, १९७५ साली ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याआधी ‘कन्नड साहित्य अकादमी’ने १९६६ सालीच त्यांना पुरस्काराने गौरवान्वित केले होते. २०१० साली त्यांच्या ‘मंद्र’ या कादंबरीला विसाव्या ‘सरस्वती’ सन्मानाने गौरवान्वित करण्यात आले. २०१६ यावर्षी भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ प्रदान केली, तर २०२३ साली त्यांना ‘पद्मविभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. २००७ साली गुलबर्गा विद्यापीठाने भैरप्पा यांना मानद ‘डॉटरेट’ प्रदान केली.

डॉटर भैरप्पा यांच्या कार्यकर्तृत्वाचा तुलनेने कमी प्रकाशात आलेला पैलू म्हणजे, त्यांचे समाजाविषयी कृतज्ञता व्यक्त करणारे उपक्रम. अगदी लहानपणीच्या खडतर आणि लेशदायक अनुभवांविषयीची कटूता बाळगणे तर दूरच; उलट त्या काळात निष्ठेने आपले कर्तव्य बजावणार्या आईविषयीची तसेच त्या कष्टकारक परिस्थितीत साहाय्यक करण्यासाठी सरसावलेल्या गावकर्यांविषयीची कृतज्ञता भैरप्पांनी आपल्या कृतीतून व्यक्त केली. शांतेशिवारा गावातील आपले घर त्यांनी माता गौरम्माच्या नावाने निर्माण केलेल्या विश्वस्त संस्थेच्या नावावर केले. आता या वास्तूमध्ये एक ग्रंथालय आणि साहित्यिक उपक्रमांसाठी सभागृह निर्माण करण्यात आले आहे. गावातील पाणीटंचाईच्या समस्येची दखल घेत, त्यांनी गाव तलावांचे पुनरुज्जीवन आणि भूजलस्तर उंचावण्याच्या योजनेचा सरकार दरबारी अत्यंत नेटाने पाठपुरावा केला. तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी या प्रकल्पाला मंजुरी दिली. गावापासून काही अंतरावर असलेल्या कालव्याशी जल उदंचन पद्धतीने सांतेशिवार तसेच, काही शेजारी गावांमधील तलाव या प्रकल्पांतर्गत जोडले गेले. परिणामी, भूजल पातळीत लक्षणीय प्रमाणात वाढ होऊन परिसरातील सुमारे १ हजार, २०० एकर जमीन लाभान्वित झाली आहे.

निसर्गक्रमाने वयाच्या ९४व्या वर्षी अत्यंत कृतार्थतेने ते मृत्यूला सामोरे गेले. त्यांनी केवळ साहित्यच नव्हे, तर समस्त सृष्टी जीवनाला प्रदान केलेल्या समृद्धीच्या रूपाने भैरप्पा सदैव स्मरणात राहतील. त्यांच्या पवित्र आणि प्रेरक स्मृतींना विनम्र अभिवादन!

अरुण करमरकर
Powered By Sangraha 9.0