शहराची नक्षी जपताना...

27 Sep 2025 12:00:00

काल मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात 'City As Archive' या विशेष परिसंवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत मुंबईच्या वारसास्थळांच्या डिजिटल दस्ताऐवजीकरणाच्या प्रकल्पावर अनेक मान्यवरांनी भाष्य केले. छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून हाती घेतलेल्या या प्रकल्पांतर्गत मुंबईच्या वारशाची आता ‌‘डिजिटल‌’ नोंद होणार आहेच. परंतु, यापलीकडे शहरांच्या दस्ताऐवजीकरणाचा महत्त्वपूर्ण विचार यानिमित्ताने समोर आला, त्याचाच या निमित्ताने घेतलेला आढावा.

इतिहास हा आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग. आपण ज्या स्थल-कालात वावरतो, त्यात आपल्यावर तथा आपल्या समाजावर इतिहासाची सावली असतेच. परंतु, इतिहास म्हणजे केवळ घटनांचा विशिष्ट क्रम, युद्धनोंदी, राज्यकर्ते एवढ्यापुरतेच मर्यादित नसतो. समाजमनाची जडणघडण, भौगोलिकदृष्ट्या परिसराची झालेली उत्क्रांती या साऱ्यावर इतिहासाचा, ऐतिहासिक घटनांचा प्रभाव असतो. २०व्या शतकाच्या उत्तरार्धात म्हणून स्थानिक इतिहासाला एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आणि सामान्य माणसांच्या जीवनाचा अंतर्भाव इतिहास या विद्याशाखेमध्ये हळूहळू होऊ लागला.

मुंबईसारखं शहर म्हणजे अशा ऐतिहासिक नोंदींची खाणच म्हणावे लागेल. भारतावर जेव्हा इंग्रजांनी आपली सत्ता प्रस्थापित केली, त्या काळापासून वेगवेगळ्या टप्प्यांवर मुंबईचा विकास होत गेला. व्यापारामुळे, येथील स्थानिकांमुळे आणि इंग्रजांच्या शासनामुळे मुंबईची जडणघडण ही इतर शहरांपेक्षा वेगळी ठरली. माणसांनी गजबजणाऱ्या या शहरामध्ये जसे एका बाजूला आर्थिक व्यवहारांची नांदी होती, तिथेच दुसऱ्या बाजूला चित्रकलेचा, शिल्पकलेचा सुवर्ण वारसा काही जणं आपुलकीने जपत होते. काळाच्या ओघात मुंबईदेखील बरीच बदलली. परंतु, मुंबईचे हे व्यामिश्र रूपडे काही बदलले नाही. उलट २१व्या शतकात मुंबईचा वेग आणखीनच वाढला. परंतु, या वेगामध्ये मुंबईचा वारसा मागे पडला तर? परिवर्तनाच्या लाटेमध्ये आपण आपल्या भोवतालाची नोंदणी करणेच विसरलो तर? हाच विचार मनात ठेवून मुंबई शहराच्या डिजिटल दस्ताऐवजीकरणाच्या एका महत्त्वाकांक्षी आणि महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाने केली आहे. आताच्या घडीला दर दहा वर्षांनी मुंबईचे रुप आमूलाग्र बदलताना आपल्याला दिसून येते. पायाभूत सुविधांची निर्मिती होत असताना, दुसऱ्या बाजूला व्यावसायिकदृष्ट्या आपले महानगर सर्वार्थाने बदलत आहे.

बदलणाऱ्या या मुंबईचा अक्षय वारसा जतन करण्यासाठी, या वारशाची ओळख पुढच्या पिढीला व्हावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या माध्यमातून ‌‘डिजिटल लायब्ररी‌’चा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याअंतर्गत मुंबईतील जुन्या इमारती, वारसा स्थळं, शिलालेख, नकाशे, चित्रं, छायाचित्रं, इथंपासून ते अगदी मौखिक इतिहासाच्या नोंदीसुद्धा एका डिजिटल संकेतस्थळावर एकत्रित आणल्या जाणार आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना, अभ्यासकांना, एकाच जागेवर मुंबईसंबंधित माहिती उपलब्ध होणार आहे. त्याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मुंबईची समग्र माहिती या संकेतस्थळावर वाचता येणार आहे.

‌‘अर्बन डिझाईन रिसर्च इन्स्टिट्यूट‌’सारख्या संस्थांनी १९९०च्या दशकापासूनच मुंबई शहराच्या दस्ताऐवजीकरणाचा विचार मांडला. त्याचबरोबर या दस्ताऐवजीकरणाच्या प्रक्रियेमध्ये स्थानिक पातळीवर लोकांना जोडण्याचा विचारदेखील त्यांनी केला. दस्ताऐवजीकरणाची ही प्रक्रिया येत्या काही महिन्यांमध्ये सुरु होईल, जेव्हा वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण होईल. एका बाजूला कागदोपत्री व्यवहारांपासून ते दुसरीकडे दुमळ चित्रसंपदांपर्यंत अनेक गोष्टींचा यामध्ये समावेश आहे.

‌’City As Archive' या परिसंवादामध्ये या डिजिटल नोंदीच्या संदर्भातील वेगवेगळ्या कंगोऱ्यांना वक्त्यांनी स्पर्श केला. अनुराधा परमर यांनी या डिजिटल लायब्ररीच्या प्रकल्पातील बहुस्तरीय घटकांवर भाष्य केले, तर राहाब अल्लाना यांच्यासारख्या कला अभ्यासकांनी चित्ररुपातील दस्ताऐवजीकरणावर भर दिला. दस्ताऐवजीकरणाची ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ही डिजिटल लायब्ररी सर्वांसाठी विनामूल्य असेल, हे सुद्धा प्रकल्पाची आखणी करणाऱ्या संयोजकांनी सांगितले. सुरुवातीला विभागनिहाय १००वारसा स्थळातील इमारतींची नोंदणी येत्या काही महिन्यांत डिजिटल स्वरुपात पार पडणार आहे. याअंतर्गत दर्शकांना त्या त्या ऐतिहासिक स्थळाची संपूर्ण माहिती एका टचवर उपल्बध होणार आहे.

आगामी काळात मुंबई शहरामध्ये मोठे परिवर्तन होऊ घातले आहे. मुंबईच्या परिवर्तनाची ही प्रक्रिया जितकी नैसर्गिक असेल तितकीच मानवनिर्मित सुद्धा. परंतु, यादरम्यान, मुंबईचा इतिहास, वारसा, हा इतिहासाच्या पानांमध्ये लुप्त होताना, त्याची माहिती, वारशाचे संकलन पुढच्या पिढीपर्यंत डिजिटल स्वरुपात पोहोचायला हवे, हा विचार मुंबईप्रमाणेच इतर शहरांनी करणे देखील गरजेचे आहे.

काळाच्या ओघामध्ये प्रत्येक संस्कृतीमध्ये आपल्याला स्थित्यंतराचे काही टप्पे दिसतात. या स्थित्यंतराच्या माध्यमातून तिथल्या समाजातील एकूण सामाजिक, सांस्कृतिक गोष्टींचे आकलन आपल्याला होते. मुंबईसारख्या शहरामध्ये सातत्याने बदल होत आहेत. अशातच या सगळ्या परिवर्तनामध्ये मुंबईला जो सांस्कृतिक वारसा लाभाला आहे, त्यांना डिजिटल स्वरुपात जपणे गरजेचे आहे. ऐतिहासिक इमारतींपासून अनेक प्रेक्षणीय स्थळांचा वारसा आपल्या मुंबईला लाभला आहे. या सगळ्याचे दस्ताऐवजीकरण होणे गरजेचे आहे आणि यासाठी आम्ही डिजिटल लायब्ररीचा प्रकल्प हाती घेतला आहे
- डॉ. सव्यसाची मुखज,
महासंचालक आणि सचिव, विश्वस्त मंडळ (CSMVS)


मुंबई शहर खूप झपाट्याने बदलते आहे. रोजच्या रोज आपल्याला उंच इमारती उभ्या राहताना बघायला मिळतात. पायाभूत सुविधांची वाढही झपाट्याने होत आहे. मुंबईचा इतिहास जर आपण लक्षात घेतला, तर हे बदल नैसर्गिक आहेत, असेच आपल्या लक्षात येईल. मुंबई हे असं शहर आहे, ज्या शहराला एक समृद्ध वारसा लाभला आहे. मुंबई हे भारतातलं पहिलं शहर आहे, जिथे वारसा कायदा पारित करण्यात आला. मात्र, या वारशाचा जर कुणाला अभ्यास करायचा असेल, तर त्यासाठी पूरक साधनं उपलब्ध नाहीत, असेच नजरेस पडते. याच कारणामुळे डिजिटल लायब्ररीची निर्मिती करण्याचा विचार आम्ही केला. या डिजिटल लायब्ररीचे वैशिष्ट्य म्हणजे, ही सर्वांसाठी खुली असेल, मोफत असेल. केवळ भारतच नव्हे तर, जगाच्या पाठीवर असलेल्या अभ्यासकांना या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमातून मुंबईचा इतिहास जाणून घेणे सोपे होईल.
- डॉ. मंजिरी कामत,
प्राध्यापक, इतिहास विभाग, मुंबई विद्यापीठ

Powered By Sangraha 9.0