मुंबई : नेटफ्लिक्सची नुकतीच प्रदर्शित झालेली वेबसिरीज 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' चांगलीच चर्चेत आहे. पण या सीरिजमुळे आयआरएस अधिकारी समीर वानखेडे सुद्धा पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. विशेष म्हणजे ही सीरिज बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याने दिग्दर्शित केली आहे. या सीरिजच्या माध्यमातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. मात्र, ही सीरिज प्रदर्शित होताच शाहरुख खान आणि IRS अधिकारी समीर वानखेडे यांच्यामध्ये वाद सुरु झाला आहे. आता या वादाला कायदेशीर वळण आले आहे. समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात मानहानिचा दावा केला आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने प्रतिक्रिया देत धक्कादायक खुलासा केला आहे.
क्रांती रेडकरने एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना पती, समीर वानखेडे यांच्या बाजूने ठाम भूमिका मांडली. क्रांती रेडकर म्हणाली की, ‘गेल्या काही दिवसांपासून समीर वानखेडे अनेक घडामोडी आणि आरोपांचा सामना करत आहेत. मात्र, ते छत्रपती शिवाजी महाराज यांना आपले आदर्श मानतात. त्यामुळे स्वाभिमानाला ठेच पोहोचली तर त्यांना ते सहनच होणार नाही. आत्मसन्मासाठी त्यांनी हा लढा पुकारला आहे. त्यांचे हे पाऊल अजिबात चुकीचे नाही. मी बायको म्हणून त्यांच्या कायम सोबत आहे.
पुढे क्रांती रेडकर म्हणाली की, आम्हाला धमक्या येत आहेत. यामध्ये पाकिस्तानातूनही मेसेज येत आहेत. आम्ही हे सर्व याचिकेमध्ये नमूद केले आहे. आम्हाला सतत ट्रोल केले जात आहे. पण जनता मूर्ख नाही. ज्या लोकांनी समीरचे काम पाहिले आहे आणि ज्या लोकांना कायदा कळतो ते नेहमीच आमच्या बाजूने उभे आहेत. आम्ही सत्याची बाजू मांडत राहणार. आमच्याकडे तेवढच आहे. आमच्याकडे काही कोट्यवधी रुपये पडलेले आहेत असे नाही. आमच्याकडे केवळ सत्याची बाजू आहे. ती आम्ही मांडत राहणार.’’ असे क्रांती म्हणाली.
क्रांतीने पुढे खंत व्यक्त करत म्हटले की, “सध्याच्या प्रकारानंतर मला इंडस्ट्रीमध्ये काम मिळणे कठीण झाले आहे. पण मला याची खंत वाटत नाही. कारण लढाई लढताना काही तरी गमवावे लागतेच. मला मराठी इंडस्ट्रीने पूर्ण पाठिंबा दिला आहे. मात्र, हिंदीमध्ये काम मिळवणे कठीण झाले आहे.”
दरम्यान नेमका वाद काय आहे?
‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’ या आर्यन खान दिग्दर्शित सीरिजमध्ये समीर वानखेडेंसारखी हुबेहुब दिसणारी एक व्यक्ती दाखवण्यात आली आहे. तसेच ही व्यक्तीसुद्धा अधिकारी असून ड्रग्सविरोधात कारवाई करते. याशिवाय फक्त बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्या लोकांनाच पकडलं जातं असंही दृश्य या सीरिजमध्ये आहे.
दरम्यान समीर वानखेडे यांनी कॉर्डेलिया क्रूझवरुन आर्यन खानला ड्रग्जप्रकरणात अटक केली होती. जवळपास महिनाभर आर्यन खान तुरुंगात होता. त्यानंतर त्याला क्लीन चिट देण्यात आली होती. आता ‘बॅड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये दाखवलेली नक्कल पाहून समीर वानखेडेंनी थेट कोर्टात धाव घेतली होती. त्यांनी याचिकेत आरोप केला की एका विशिष्ट दृश्यातून त्यांची खिल्ली उडवण्यात आली आहे. मात्र हाय कोर्टाने ही याचिका फेटाळली आहे.