देशातील ‘जेन-झी’ यांना लोकशाही वाचवण्याच्या नावाखाली देशात हिंसाचार घडवण्याची स्वप्ने पाहणाऱ्या राहुल गांधींच्या स्वप्नांना देशातील युवा पिढीने नाकारले आहे. याचा ठोस पुरावा म्हणजेच या ‘जेन-झी’ने ‘अभाविप’च्या उमेदवारांना चार विद्यापीठांच्या निवडणुकांमध्ये केलेले भरघोस मतदान! ‘अभाविप’ने या निवडणुकांमध्ये मिळवलेल्या विजयांचा घेतलेला आढावा...
अलीकडेच देशातील प्रमुख विद्यापीठांमध्ये पार पडलेल्या विद्याथ संघाच्या निवडणुकांमध्ये, ‘अखिल भारतीय विद्याथ परिषद’ (अभाविप)ने अभूतपूर्व यश मिळवले आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या दिल्ली विद्यापीठाच्या विद्याथ संघ (डूसू) निवडणुकीत आणि शनिवारी उशिरा आलेल्या हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणूक निकालांमध्ये विद्याथ परिषदेने ऐतिहासिक विजय मिळवत, आपली संघटनात्मक ताकद पुन्हा सिद्ध केली आहे. हे यश केवळ निवडणूक विजयापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण देशातील विद्याथ वर्गाच्या बदलत्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे. विद्याथ निवडणुका या केवळ उमेदवारांच्या पराभव-विजयापुरत्या मर्यादित राहत नाहीत, तर त्या समाजातील बदलणाऱ्या राजकीय व सामाजिक प्रवाहाचे आरसे असतात. त्यामुळे दिल्ली विद्यापीठ आणि हैदराबाद विद्यापीठातील ‘अभाविप’च्या विजयाने, भारतीय युवा पिढीच्या विचारसरणीचा नवा चेहराच देशासमोर आणला आहे.
दिल्ली विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये अध्यक्षपदासाठी ‘अभाविप’चे उमेदवार आर्यन मान यांनी, १६ हजार, १९६ मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला. हे विद्यापीठाच्या ५० वर्षांहून अधिक काळाच्या निवडणूक इतिहासातील, दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक मतांच्या फरकाने जिंकले गेलेले अध्यक्षपद आहे. सर्वांत मोठ्या मतांच्या फरकाचे (१९ हजार, ३९) विक्रमदेखील ‘अभाविप’च्याच अक्षित दहिया यांच्या नावावर आहे. या प्रकारचे विजय हे केवळ आकड्यांपुरते मर्यादित नसून, ते संघटनेने मिळवलेल्या जनाधाराचे निदर्शक आहेत. दिल्ली विद्यापीठ संपूर्ण आशियातील एक प्रतिष्ठित शिक्षणसंस्थान मानले जाते. इथल्या निवडणुकांना मीडिया, राजकीय पक्ष आणि समाजातील विविध घटक नेहमीच बारकाईने पाहतात. त्यामुळे ‘अभाविप’ने इथे मिळवलेले यश केवळ स्थानिक नसून, त्याचे महत्त्व राष्ट्रीय पातळीवरही आहे.
अध्यक्षपदाव्यतिरिक्त, ‘अभाविप’ने सचिव आणि सहसचिवपदांवरही लक्षणीय आघाडी घेत, विजय मिळवला आहे. या सर्व पदांवर मिळालेले जनसमर्थन, परिषदेच्या कार्यपद्धती आणि स्पष्ट विचारसरणीबाबत विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या विश्वासाचे द्योतक मानले जाते. सचिव आणि सहसचिवपदे ही विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, शैक्षणिक अडचणी, प्रवेशप्रक्रिया, निवास व वसतिगृह व्यवस्था अशा विषयांशी थेट जोडलेली असतात. त्या पदांवर ‘अभाविप’च्या उमेदवारांचा विजय म्हणजे, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवातून संघटनेवर ठेवलेला विश्वासच अधोरेखित होतो.दुसरीकडे, हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकांमध्ये ‘अभाविप’ने सर्वच प्रमुख पदांवर ‘क्लीन स्वीप’ करत, निर्विवाद विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे, राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत असतानाही त्यांची विद्याथ आघाडी ‘एनएसयूआय’ला ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळाली. यामुळे इतर विद्याथ संघटनांची वास्तविकता अधोरेखित झाली आहे. ‘नोटा’पेक्षा कमी मते मिळणे हा केवळ पराभव नव्हे, तर विश्वासार्हतेचा संपूर्ण ऱ्हास आहे.
हैदराबाद विद्यापीठ हे संशोधन, विज्ञान-तंत्रज्ञान आणि मानवशास्त्र या क्षेत्रांत देशात अग्रगण्य मानले जाते. इथल्या निवडणुकांमध्ये मिळालेला विजय म्हणजे ‘अभाविप’ने, उच्च शिक्षण क्षेत्रातील गंभीर व जटिल मुद्द्यांवरही आपली पकड निर्माण केली असल्याचेे ठोस उदाहरण आहे.
हैदराबाद विद्यापीठात ‘अभाविप’ने अध्यक्ष, उपाध्यक्ष, महासचिव, सहसचिव, सांस्कृतिक सचिव आणि क्रीडा सचिव अशी सर्व पदे जिंकून,एकतर्फी विजय मिळवला. हैदराबाद, पंजाब आणि गुहावटी विद्यापीठे ही पारंपरिकतः ‘अभाविप’साठी आव्हानात्मक मानली जात होती, त्यामुळे या विजयांचे महत्त्व अधिकच. अशा ठिकाणी विजय मिळवणे, म्हणजे ‘अभाविप’चे कार्य केवळ एकाच प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये मर्यादित नसून, विविध सामाजिक, भौगोलिक व शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांपर्यंतही पोहोचले असल्याचे स्पष्ट होते.
आजच्या काळात विद्याथ संघटना एखाद्या विशिष्ट वर्गापुरत्या सीमित राहात नाहीत. त्या किती व्यापक स्तरावर विद्यार्थ्यांना एकत्र करतात, यावर त्यांचा यशाचा पाया असतो. हैदराबादमधील विजयाने ‘अभाविप’ने हे निर्विवाद सिद्ध केले आहे. देशातील सर्वांत मोठी विद्याथ संघटना म्हणून ७५ वर्षे पूर्ण करणाऱ्या ‘अभाविप’ने, यावष सातत्याने अनेक विद्यापीठांमध्ये विजय मिळवला आहे. अलीकडील काळात पंजाब विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, हैदराबाद विद्यापीठ, तसेच पटना विद्यापीठ, उत्तराखंडमधील विद्यापीठे, गुहावटी विद्यापीठ, आसाम विद्यापीठ आणि देशभरातील अनेक संस्थांमध्ये परिषदेने आपली ताकद दाखवून दिली आहे. अशा सततच्या विजयांमुळे ‘अभाविप’चे नेतृत्व आणि धोरणशैली, देशभरात विद्यार्थ्यांसाठी आकर्षणाचे केंद्र बनली आहे.
‘अभाविप’चे सातत्यपूर्ण विजय हे केवळ निवडणूक लढाई नसून, देशातील बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीचेही प्रतीक आहेत. पंजाबसारख्या ठिकाणी जिथे डाव्या विचारसरणीचा दीर्घ काळ प्रभाव होता, तिथे ‘अभाविप’चे यश मिळवणे ही एक मोठीच विचारसरणीतील पिढीगत बदलाची खूण आहे. ही सातत्यपूर्ण यशस्विता ही केवळ योगायोग नाही, तर ‘अभाविप’च्या ‘अखिल भारतीय संघटने’च्या रचनेचा, विद्याथहितासाठीच्या सकारात्मक हस्तक्षेपांचा आणि विचारधारेशी निष्ठावान कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नांचा परिणाम आहे. विद्याथ हे समाजाच्या विकासाचा मुख्य घटक आहेत आणि त्यांच्या गरजा, समस्या समजून घेत त्यावर काम करणं ही संघटनेची प्राथमिकता राहिली आहे. विद्यार्थ्यांच्या वास्तविक समस्या आणि शिक्षणाशी संबंधित प्रश्नांना घेऊन, परिषदेने जी राजकीय दिशा दिली आहे त्याचे फलित म्हणजच हे अभूतपूर्व यश होय!
यात विशेष लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, ‘अभाविप’चे कार्य केवळ निवडणुकीपुरतं मर्यादित राहात नाही. अभ्यासक्रमातील सुधारणा, परवडणारे शुल्क, विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सुविधा, महिला सुरक्षेचे प्रश्न, रोजगाराभिमुख शिक्षण आणि नव्या तंत्रज्ञानाशी निगडित मागण्या यांवरही ‘अभाविप’ सातत्याने काम करत असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ही संघटना आपली समस्या प्रत्यक्ष सोडवणारी, त्यांच्यासोबत खंबीरपणे उभी असलेली वाटते.
देशभरातील विद्यापीठांमध्ये मिळालेल्या या जनादेशाला, ‘जेन-झी’ पिढीच्या राष्ट्रनिर्माणाच्या सकारात्मक आणि रचनात्मक भूमिकेच्या समर्थनाचे चिन्ह मानले जात आहे. अलीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ‘जेन-झी’समोर ‘संविधान वाचवा’ असे एक वाक्य उच्चारले होते, पण त्यामागून जी नकारात्मकता उमटली ती काहीशी नेपाळ व बांगलादेशमधील अस्थिरतेसारखी वाटली. मात्र, देशातील विविध विद्यापीठांमध्ये भारतीय विचारांनी प्रेरित ‘अभाविप’च्या विजयांनी असे दाखवून दिले आहे की, ‘जेन-झी’ ही पिढी नकारात्मकता, हिंसा आणि घराणेशाहीपासून दूर आहे. या नव्या पिढीचा कल अधिक जबाबदार, राष्ट्रवादी आणि सकारात्मक विचारांकडे झुकलेला दिसतो आहे. ‘जेन-झी’ पिढी ही इंटरनेट, जागतिकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात वाढलेली आहे. त्यांना पारदर्शकता, जबाबदारी आणि परिणामकारक कार्य महत्त्वाचे वाटते. ‘अभाविप’च्या विजयामधून हे स्पष्ट होते की, नव्या तरुणांना फक्त घोषणाबाजी नको तर त्यांना ठोस कृती आणि राष्ट्रहिताशी बांधिलकी असलेले नेतृत्वही हवे आहे.
भाजपचे राष्ट्रीय संघटनमंत्री बी. एल. संतोष यांनी दिल्ली विद्यापीठातील ‘अभाविप’च्या विजयाला, ‘जेन-झी’चा निवडणुकीत शानदार विजय’ असे म्हटले, तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ‘अभाविप’च्या विजयाला ‘राष्ट्र प्रथम’ या विचारधारेवरील तरुणांचा विश्वास मानले आहे. हे विधान एका अर्थाने ‘जेन-झी’ने निवडलेल्या विचारधारेचा ठोस पुरावा म्हणून समोर येत आहे. या विधानांमधून हे दिसतं की, ‘अभाविप’चे विजय केवळ विद्याथ संघटनांच्या निवडणुकांमध्ये मर्यादित नाहीत, तर त्यांचा परिणाम व्यापक राष्ट्रीय राजकारणावरही होऊ शकतो. आजचा विद्याथ उद्याचा मतदार आहे आणि त्याच्या विचारसरणीतील बदल, हा थेट देशाच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरतो. काँग्रेसची विद्याथ आघाडी ‘एनएसयूआय’, डाव्या पक्षांच्या विद्याथ संघटना आणि प्रादेशिक विद्याथ पक्ष यांच्यावरील जातीयता, घराणेशाही आणि अभारतीय दृष्टिकोन यांना देशातील तरुणांनी नकारले आहे. नव्या पिढीला पारदर्शक, लोकाभिमुख आणि राष्ट्रीय मूल्यांशी एकरूप असलेली विचारसरणी भावते, हेच यातून अधोरेखित होते.
भूतकाळात अनेकदा विद्याथ संघटनांवर स्थानिक राजकारण, जातीय समीकरणे आणि हिंसात्मक पद्धतींचा प्रभाव होता. पण आता नव्या पिढीनं त्या सर्व गोष्टींना नाकारून, संघटनांकडून स्पष्ट दिशा, शैक्षणिक प्रश्नांवर लक्ष आणि राष्ट्रहिताशी निगडित कार्यक्रमांची मागणी सुरू केली आहे. ‘अभाविप’ने ही मागणी पूर्ण करण्याचे काम केल्यामुळे, विद्यार्थ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला.
‘एनएसयूआय’ने ‘डूसू’ निवडणुकीत मतांची चोरी आणि ‘ईव्हीएम’मध्ये गडबड असे आधारहीन आरोप करून, निवडणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अपयशी ठरले. दीड लाखांहून अधिक विद्याथ मतदार असलेल्या ‘डूसू’ निवडणुकीत, देशाच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या युवकांची मानसिकता समजून घेता येते. त्यांच्या निवडीच्या मागे केवळ संघटनेचे नाव नव्हे, तर कार्यशैली, उद्दिष्टे आणि दीर्घकालीन दृष्टिकोनही असतो. विद्यार्थ्यांनी आपला मताधिकार वापरताना केलेली निवड, ही भावनांवर आधारित नसते. ती त्यांच्या रोजच्या शैक्षणिक जीवनातील प्रश्न, भविष्यातील संधी, रोजगार, सामाजिक न्याय आणि वैयक्तिक सुरक्षेच्या भावनेवर आधारित असते. त्यामुळेच ‘अभाविप’ला मिळालेला प्रचंड पाठिंबा, हा वास्तवाशी जोडलेला आहे. विद्याथ संघटनेच्या निवडणुका या युवा मानसिकतेची ‘लिटमस टेस्ट’ मानल्या जातात. ‘अभाविप’च्या संदर्भात हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे की, गेल्या काही वर्षांत संघटनेच्या सदस्यसंख्येत लक्षणीय वाढ झाली असून, ५० लाखांहून अधिक सदस्य झाले आहेत. देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘अभाविप’चे काम सक्रिय आहे. जिथे विद्याथ संघ निवडणुका होत नाहीत, तिथेही शिक्षण आणि समाजाच्या विविध मुद्द्यांवर तरुणांना जोडून परिषदेने दाखवून दिले आहे की, ती केवळ निवडणुकीपुरती संघटना नाही, तर राष्ट्रपुननिर्माणाच्या ध्येयाने प्रेरित होऊन, तरुणांना सजग आणि जबाबदार नागरिक घडवणारी चळवळ आहे. या दृष्टिकोनातून ‘अभाविप’चे कार्य केवळ शिक्षण क्षेत्रापुरते सीमित राहात नाही, तर सामाजिक बांधिलकीची जाणीवही निर्माण करते. ग्रामीण भागातील शाळांपासून ते महानगरातील विद्यापीठांपर्यंत ‘अभाविप’चे कार्यकर्ते सक्रिय आहेत. पर्यावरण संरक्षण, स्वच्छता मोहीम, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक मदत आणि तांत्रिक कौशल्य विकास यांसारख्या उपक्रमांमुळे संघटनेने केवळ निवडणुकीतच नव्हे, तर समाजातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
७५ वर्षांहून अधिक काळ पूर्ण करत ‘अभाविप’ने निवडणुकीतील यश, सामाजिक प्रश्नांवरील सक्रिय सहभाग आणि आधुनिक नेतृत्व घडवण्यात आपली परिपक्वता सिद्ध केली आहे. विद्याथ परिषद आज देशातील सर्वाधिक परिपक्व आणि अद्ययावत विद्याथ संघटना आहे, जी भारतीय संस्कृती व परंपरा यांच्याशी विद्यार्थ्यांना जोडत, आधुनिकता व सकारात्मकता यांच्या दिशेने नेतृत्व करत आहे. यामुळे ‘अभाविप’ केवळ एक संघटना न राहता, देशाच्या भविष्याच्या घडामोडींमध्ये सक्रिय योगदान देणारा युवा मंच ठरत आहे. आजच्या बदलत्या जागतिक परिप्रेक्षात, भारतीय तरुणांना आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून आधुनिक विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योजकतेकडे वाटचाल करावी लागते. या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणारी एकमेव संघटना म्हणून, ‘अभाविप’चे नाव घेतले जाते. त्यामुळे विद्याथ परिषद ही केवळ भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही भारतीय युवा विचारांचा प्रतिनिधी मंच ठरत आहे.
आशुतोष सिंह - लेखक दिल्ली विद्यापीठात हिंदी विभागात शोधाथ असून, विद्याथ परिषदेचे अखिल भारतीय मीडिया संयोजक राहिले आहेत.
दिगंबर पवार - लेखक नागपूर विद्यापीठात समाजकार्य विभागात शोधाथ असून, अखिल भारतीय विद्याथ परिषदेचे केंद्रीय कार्यालयमंत्री राहिले आहेत.