रामेश्वरांची समाजसेवा...

27 Sep 2025 12:23:14

सरळमाग आयुष्य जगत आपल्यासोबत इतरांच्याही आयुष्याला वळणदार करणाऱ्या रामेश्वर मालाणी यांच्याविषयी...

आयुष्यभर मान, प्रतिष्ठा आणि पैसा खूप कमावला, आता समाजाची सेवा करायची आहे, या भावनेने श्री गुरुजी रुग्णालयाच्या बांधकामातून मिळालेला सर्व नफा पुन्हा व्यवस्थापनाच्या हवाली केला. येथूनच श्री गुरुजी रुग्णालयासोबत जोडला गेलो, ते कायमचाच.” असे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात विश्वासाने नाव कमावलेले रामेश्वर मालाणी अगदी अभिमानाने सांगतात. या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या ‌‘सेवा संकल्प समिती‌’चे त्र्यंबकेश्वर आणि पेठ तालुक्यातील १०० पाड्यांवर काम चालते. तिचे तीन वर्षे अध्यक्ष आणि सध्या सदस्य म्हणून, मागील आठ वर्षांपासून मालाणी काम करीत आहेत. समितीच्या माध्यमातून वनवासी भागात आरोग्य, शिक्षण, पाणी, महिलांच्या कल्याणासाठी काम केले जाते. वंचित घटकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने होळीसाठी लागणाऱ्या गोवऱ्या बनवून घेत, त्यांच्या विक्रीतून आलेले सर्व पैसे वनवासी लोकांना दिले. समितीच्या माध्यमातून ७० ते ८० घरे उभी केली. सिंचनाची व्यवस्था केल्याने, येथे वर्षाला तीन पिके घेतली जातात. सध्या मालाणी नाशिकरोड माहेश्वरी समाजाचे अध्यक्ष आहेत. आयुष्यात अनेक चढ-उतार बघितलेले रामेश्वर मालाणी म्हणतात की, “आयुष्य असो की संकट, कुटुंबाची साथ असेल, तर कोणत्याही कठीण प्रसंगातून माणूस सहीसलामत बाहेर निघतो.” आईवडिलांचे आशीर्वाद व भाऊ सुरेश, विजय, नंदकिशोर, राजेंद्र, बहीण इंदिरा आणि बांधकाम व्यावसायिक मदन देवी यांच्यामुळेच, रामेश्वर मालाणी यांचे नाशिकच्या बांधकाम क्षेत्रात एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणून नाव झाले आहे.

१९८१ साली त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केला. मधल्या काळात व्यवसायाची भरभराट, तर दुसरीकडे कुटुंबाचे विभाजन झाले. यात त्यांच्या वडिलांच्या वाट्याला कर्ज आल्याने, घरची घडी विस्कटली. खचलेल्या वडिलांना धीर देत, त्यांच्या दोन्ही मोठ्या भावांनी पुन्हा व्यवसाय वाढवला. रामेश्वर यांना ठाण्याच्या जलसिंचन विभागात नोकरी मिळाली. पण, व्यवसायाची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आल्याने, नोकरी करणे त्यांना जड गेले. त्यामुळे सहा महिन्यांतच नोकरीचा राजीनामा देत रामेश्वर घरी आले, ते कायमचेच. या निर्णयाने वडील चांगलेच नाराज झाले, पण त्यांच्या बहिणीच्या यजमानांनी वडिलांची समजूत घातल्यानंतर, व्यवसाय करण्याची परवानगी मिळाली. त्यावेळी नाशिकच्या त्र्यंबकरोडवरील स्वातंत्र्यवीर सावरकर जलतरण तलावाचे काम, ‌‘ट्रायो बिल्डर्स‌’ नावाच्या कंपनीकडे होते. या कंपनीचे मालक मदन देवी यांच्यासोबत रामेश्वर यांची ओळख झाल्यानंतर त्यांनी तेथेच छोटीशी मुलाखत घेत, दुसऱ्याच दिवशी रुजू होण्यास सांगितले. हा निर्णय रामेश्वर यांच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरला.

मदन देवी यांनी व्यवसाय कसा करावा, हे शिकवले. पुढच्या दोनच वर्षांत देवी यांच्या बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी पाहणी करण्यास त्यांना सांगण्यात आले. पुढे १९९१ साली सामेश्वर यांनी, देवी यांच्यासोबतच भागीदारीत व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला २० टक्के भागीदारी मिळाल्यानंतर, हळूहळू आज ते पूर्ण भागीदार झाले आहेत. १९८१पासून मदन देवी यांच्यासोबत सुरू झालेला कामाचा सिलसिला आज ४५ वर्षे झाली, तरी सुरूच आहे. दरम्यान, रामेश्वर यांचा एक मुलगा सिव्हिल इंजिनिअर, तर दुसरा आर्किटेक्ट आहे. दोघेही रामेश्वर यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. आपल्यावर भावांचे ऋण आहेत असे समजून त्यांनी, आपल्या मोठ्या भावाच्या मुलालाही सिव्हिल इंजिनिअर करत, त्यालाही आपल्या सोबत घेतले. रामेश्वर यांची ‌‘श्रीनाथ कन्स्ट्रक्शन‌’ या नावाची कंपनी असून, सचोटी आणि प्रामाणिकपणा असलेली कंपनी असा तिचा नावलौकिक आहे. त्यामुळे रामेश्वर यांच्याकडे कधीच कामाची वानवा पडली नाही, तसेच कधीही कोणाकडेही काम मागण्यासाठी हात पसरावे लागले नाही.

दरम्यान, १९९१ मध्ये वसंतराव पवार मेडिकल कॉलेजचे बांधकाम, रामेश्वर यांच्या ‌‘श्रीनाथ कन्स्ट्रक्शन‌’ने केले. त्यानंतर मायको बॉशमध्ये २० वर्षे काम केले. दरवष तेथे दहा ते २० कोटींची कामे त्यांनी केली. ‌‘क्रॉम्प्टन‌’, ‌‘महिंद्रा‌’, ‌‘केबल कार्पोरेशन‌’, ‌‘अमेरिकन ड्रायफ्रूट‌’, ‌‘राईट टायट फास्टनर्स‌’ अशा मोठ्या कंपन्यांसोबतही त्यांनी काम केले आहे. नाशिकमध्ये जेवढी मोठी महाविद्यालये आहेत, त्यांचे बांधकामही रामेश्वर यांचेच. यामध्ये ‌’मेट कॉलेज‌’ आणि ‌‘संदीप फाऊंडेशन‌’चे ४० टक्के, ‌’सपकाळ नॉलेज हब‌’ आणि ‌’ऑर्किड इंटरनॅशनल‌’चे संपूर्ण, तर ‌’महावीर एज्युकेशन पॉलिटेक्निक‌’ व ‌’गुरुगोविंद सिंग महाविद्यालया‌’चे २५ ते ३० टक्के काम त्यांनी केले आहे. नाशकातील ‌‘हुंदाई‌’चे दोन, तर ‌‘मारुती‌’ सेवाचे एक शोरुम त्यांनी बांधले. पुढे रामेश्वर यांनी नाशिक बाहेरच्या जिल्ह्यातही कामे घेण्यास सुरुवात केली. पहिले काम नागपूर, तर दुसरे शिड येथील मालपाणी ग्रुपचे काम केले. तसेच ‌‘मालपाणी ग्रुप‌’ची पुण्यातील ‌‘ध्रुव ॲकेडमी‌’देखील रामेश्वर यांनीच उभारली. मित्र गोळा करण्याचा छंद असल्याने, मित्र आणि समाजाच्या अडचणी सोडविण्यासाठी ते कायम पुढे असतात. रामेश्वर यांच्या पाठीमागे प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नी नंदा यांची भरभक्कम साथ आहे. त्यांच्या पायगुणामुळेच आपली भरभराट झाल्याचे सांगण्यास, रामेश्वर विसरत नाहीत. अशा या सचोटीने काम करणाऱ्या व्यावसायिकास दै. ‌‘मुंबई तरुण भारत‌’कडून शुभेच्छा.

- विराम गांगुर्डे
Powered By Sangraha 9.0