मानवी आयुष्यामध्ये भावनांचे महत्त्व कालातीत आहे. मानवी आयुष्याचे वेगळेपण हेच आहे की, त्याला स्वतःप्रमाणे इतरांच्या भावनांचाही विचार करता येतो. पण, आजघडीला मानवी आयुष्यात भावनांचा विकास होणे थोडे जिकिरीचे झाले आहे. आयुष्यासाठी तारेवरची कसरत करताना मानवाच्या नैसर्गिक भावनांचा संकोच सातत्याने होतो. त्यामुळे लहानपणापासूनच मानवाच्या भावनिक विकासाकडे लक्ष देणे आवश्यक झाले आहे. या सगळ्यामध्ये बालनाट्य कशी मोलाची भूमिका बजावते आणि त्याचा बालकलाकारांवर परिणाम होतो त्याचा घेतलेला आढावा...
तालमींना नाट्यप्रयोगाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. एखादा बालकलाकार रंगमंचावर आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे आणि सहजतेने दिलेल्या भूमिकेचं सादरीकरण करतो कारण, प्रेक्षकांसमोर सादरीकरण करण्याआधी त्या व्यक्तिरेखेत अनेकदा जगलेला असतो. तालीम केवळ प्रयत्न करण्याची संधी देत नाही, तर चुका करण्याची, प्रयोग करण्याची, शिकण्याची आणि सुधारण्याचीही संधी देते. यातून कलाकाराला स्वतःच्या व्यक्तिरेखेचं, नाटकातील परिस्थितीचं, इतर पात्रांचं आणि संपूर्ण कथानकाचं आकलन करायला वेळ मिळतो.
नाट्यकलेचे विद्यार्थी समजून घेतात की, रंगभूमी म्हणजे संहिता, कथानक नाटकाच्या रूपात सांगणं होय. नाटक हे संवाद, देहबोली, वेशभूषा आणि भावनांच्या अभिव्यक्तीद्वारे रंगमंचावर सादर केलं जातं. भावनांद्वारे अभिव्यक्ती करणे, हे नाटकाचं सर्वांत महत्त्वाचं अंग आहे. आज आपण तालमींदरम्यान बालकलाकारांच्या भावनांच्या अभिव्यक्तीवर काय परिणाम होतो, हे पाहत आहोत.
नाटक ही एक जिवंत कला आहे, जिथे कथा विविध पात्रांद्वारे प्रेक्षकांसमोर घडत असल्यासारखी सादर केली जाते. प्रत्येक पात्र वेगळ्या शारीरिक, मानसिक, भावनिक व मानसशास्त्रीय स्थितीत असतं; वय, लिंग व संस्कृतीही भिन्न असते. त्यामुळे त्यांच्या भावना परिस्थितीनुसार, मनःस्थितीनुसार, काळ-वेळेनुसार बदलत राहतात. भावनांची अभिव्यक्ती ही नाटकात अत्यंत महत्त्वाची असते आणि तालीम विद्यार्थ्यांना ती समजून घेण्यास मदत करते. व्यक्तिरेखा वेगवेगळ्या भावनांमध्ये किंवा रसांमध्ये वावरतात. महाकवी भरतमुनी यांनी, भावनांचं वर्गीकरण करून नवरस दिले आहेत. रस म्हणजे मनाची भावस्थिती. हे नऊ रस असे आहेत, शृंगार (प्रेम/सौंदर्य), हास्य (हास्य), करुण (दुःख), रौद्र (क्रोध), वीर (शौर्य/पराक्रम), भयानक (भीती), बीभत्स (वितृष्णा/किळस), अद्भुत (आश्चर्य/विस्मय), शांत (शांती/समाधान).
नाट्यनिर्मिती करत असतानाचा पहिला अंक मागच्या आठवड्यात संपला. त्यामध्ये आपण विविध नाट्यखेळांद्वारे इमारतीचा पाया कसा रचला जातो, हे बघितलं. पुढे दुसर्या अंकात बर्याच प्रक्रियेतून मुलांना जावं लागणार आहे. पुढे बांधले जाणार इमारतीचे मजले, असं समजा हवं तर. आपण वेगवेगळे नाट्यखेळ खेळत, नाट्य अभिवाचनापर्यंत पोहोचलो. आतापर्यंत मुलांची संहितेतील नवरस ओळखायला सुरुवात झाली असते. विद्यार्थ्यांना विचारलं गेलं की, कोणत्या प्रसंगात कोणता रस प्रामुख्याने दिसतो. नाटकातील प्रसंग उदाहरणार्थ रामाचं सीतेशी लग्न यात शृंगार रस, कुंभकर्णाला उठवायचा प्रयत्न करतात तिथे हास्य, जटायू जखमी होऊन रामाच्या मांडीवर प्राण सोडतो तेव्हा करुण रस इत्यादी. पुढील टप्पा म्हणजे भूमिकानिर्मिती आणि सराव! विद्यार्थ्यांनी पसंतीचं पात्र निवडल्यावर, त्यांना संवाद मोठ्याने वाचण्याची मुभा देण्यात येते. मी फक्त त्यांच्या इच्छेनुसार, शरीरयष्टी व क्षमतेनुसार भूमिकांचे वाटप करते. यानंतर खरी सरावप्रक्रिया सुरू होते.
मुलं प्रसंग नीट समजू लागतात, नवे प्रयोग करू लागतात. वारंवार प्रयत्न करून वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होऊ लागतात. हळूहळू मुलांचा संवाद व अभिनय पक्का होतो. सरावाच्या वेळी हे मुले इतर मित्रांच्याही अभिनयाचे निरीक्षण करतात आणि त्यातून शिकतातही. अनेकदा चुकत असले, तरी त्यावर काम करुन चुका दुरुस्तही करतात.
नवरसांचा अनुभव व अभिव्यक्ती
मी मुलांना शिकवत असताना विद्यार्थ्यांना नवरसांचा अनुभव कसा येतो आणि ते त्यावर कसं व्यक्त होतात, हे बघणे महत्त्वाचं होतं. यासाठी मी प्रथम नवरसांची व्याख्या त्यांना सांगितली, नंतर त्यांच्या दैनंदिन अनुभवांतील उदाहरणं द्यायला सांगितली. तेव्हा लक्षात आले की, लहान मुलं रोजच्या आयुष्यातील घटनांमधून सहजपणे भावना ओळखतात. त्या भावनांना कथन, कृती, आवाज आणि चेहर्यावरील भाव यांच्या साहाय्याने व्यक्तही करतात. पण, नाट्यरूपात भावना व्यक्त करताना त्यांना अधिक कल्पकता आणि सरावाची गरज भासते. नवरस ओळखण्याची क्षमता तपासताना असे लक्षात आले की, संहिता वाचनानंतर विद्यार्थ्यांनी पटकथेतले विविध प्रसंग नवरसांशी जोडले. त्यांची भावनिक समजही लक्षणीयरित्या वाढली होती.
भूमिका व अभिनयजेव्हा मुलांनी स्वतः भूमिका साकारल्या, तेव्हा त्यांनी संवादांचे अर्थपूर्ण उच्चार, हावभाव व कायिक अभिनय, भावनांची तीव्रता यात अधिक स्पष्टता दाखवली. काही विद्यार्थी सुरुवातीला संकोचले पण, गटातील इतर मुलांचे अभिनय पाहून, त्यांनाही आत्मविश्वास आला. नवरसांचा वापर केल्याने विद्यार्थ्यांना भावनांची ओळख झाली आणि समजही वाढली. त्यांनी स्वतःच्या व इतरांच्या भावनांना ओळखायला व समजायला सुरुवात केली. त्यांचे संवाद कौशल्य सुधारले, सहानुभूती वाढली. मी पाहिले की, मुलं केवळ नाटकातील पात्रांसाठीच नव्हे, तर एकमेकांशी संवाद साधतानादेखील या भावनांचा उल्लेख करू लागली. याप्रकारे नवरसांच्या संकल्पनेचा वापर करून, लहान विद्यार्थ्यांना त्यांच्या भावनांची जाणीव करून देता येते. मुलं स्वतःच्या अनुभवांतून उदाहरणं सांगतात, इतरांचे अनुभव ऐकतात आणि चर्चाही करतात. त्यामुळे त्यांची भावनिक समज वाढली, त्यांचा आत्मविश्वास, संवादकौशल्य आणि सर्जनशीलताही विकसित झाली. नवरसांचा उपयोग हा केवळ नाट्यकलेपुरता मर्यादित न राहता, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयुक्त ठरतो.
विद्यार्थ्यांना भावना समजावून सांगताना, शिक्षकांनी त्यांना थेट रसांशी जोडू नये. प्रथम विद्यार्थ्यांनी ती भावना अनुभवावी आणि नंतर तिला कोणता ‘रस’ म्हणतात, हे सांगावं. नाट्यकलेच्या माध्यमातून आपल्या अंतरंगात दडलेल्या भावना जागृत होतात. शिक्षकाचं काम म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत आधीपासून असलेल्या पण, अजून न उलगडलेल्या भावना त्यांना अनुभवायला लावणं. विविध भावना अनुभवण्यामुळे माणसाचं जीवन अधिक समृद्ध आणि परिपूर्ण होतं.
मुलांचं मन कोऱ्या पाटीसारखं असतं. म्हणूनच काय शिकवलं जातं हे जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच ते कसं शिकवलं जातं हेही महत्त्वाचं ठरतं. कारण, मुलं ही आपल्या देशाचं भविष्य आहेत, जी आपल्या समाजाला आणि राष्ट्राला घडवतात. भावनांच्या अभिव्यक्तीचं महत्त्व हे असं जीवनकौशल्य आहे, जे नाट्यप्रयोगांद्वारे जोपासलं, विकसित केलं आणि सरावलं जाऊ शकतं.
शृंगार- हास्य-करुणा रौद्र-वीर-भयानकाः|
बीभत्स-अद्भुत-संज्ञौ च एत्यष्टौ नाट्ये रसाः स्मृताः॥हे अष्ट रस म्हणजे, नाट्यकला आणि नृत्य यांच्यामाध्यमातून, प्रेक्षकांच्या मनात जागृत होणारे भावावस्थांचे प्रकार आहेत. प्रत्येक रस एखाद्या स्थायी भावातून (शाश्वत भाव) उत्पन्न होतो आणि त्याला विभाव (प्रेरक कारणे), अनुभाव (हावभाव, अभिव्यक्ती) आणि व्यभिचारी भाव (क्षणिक भावना) यांचा आधार असतो. भारतीय शास्त्रीय नाट्य, नृत्य, काव्य आणि चित्रकलेत या रसांना मूलभूत स्थान आहे. नाट्य कार्यशाळा, तालमी आणि सादरीकरण ही अॅट, क्रिएट आणि परफॉर्म या तत्त्वज्ञानावर आधारित असतात. अॅट या भागाचा संबंध पाच इंद्रियांचा (दृष्टी, श्रवण, गंध, स्पर्श आणि स्वाद) वापर करून, नाट्य सादर करण्याशी आहे. क्रिएट म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने आपली सर्जनशीलता, इच्छाशक्ती, कल्पनाशक्ती, देहबोली (कायिक अभिव्यक्ती) आणि भावना यांचा वापर करून, नाट्यप्रयोगातील अपेक्षित उद्दिष्टे साध्य करणे. परफॉर्म हा मागील दोन घटकांच्या एकत्रित परिणामाचा अंतिम टप्पा आहे.
आजच्या या धकाधकीच्या आणि वेगानं पुढे जाणाऱ्या तांत्रिक युगात, भावभावनांचा अभाव किंवा असं म्हणू या की, भावभावनांचा स्पर्श कमी जाणवतो. पण, नाटक यशस्वीरित्या भावनिक विकास घडवून आणतं. परस्परांमधील संबंध, नातीगोती आणि विचारांमधील स्पष्टता भावनिकरित्या मांडण्यामध्ये बालनाट्य यशस्वी ठरतं.
रानी राधिका देशपांडे
[email protected]