मुंबई, राज्य शासनाने मुंबई शहरातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या दोनभुयारी मार्ग प्रकल्पांसाठी एकूण ३०० कोटी रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज मंजूर केले आहे. यात ठाणे ते बोरीवली मार्गासाठी २१० कोटी आणि ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह मार्गासाठी ९० कोटी रुपये निधी समाविष्ट आहे. या निधीचा वापर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाद्वारे प्रकल्पाच्या बांधकामासाठी केला जाईल.
ठाणे ते बोरीवली भुयारी मार्ग प्रकल्पामुळे या मार्गावरील वाहतूक प्रवाह सुरळीत होईल, तेसच वाहतूक कोंडी कमी होईल आणि शहरातील वाहतुकीची गती वाढेल. ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह प्रकल्पात ३+३ पदरी दुहेरी बोगदा समाविष्ट आहे, ज्यामुळे शहरातील दैनंदिन वाहतुकीचे व्यवस्थापन अधिक सक्षम होईल. हा निधी सन २०२५-२६ मधील मंजूर अर्थसंकल्पीय तरतुदीतून खर्च केला जाईल.
ठाणे ते बोरीवली भुयारी मार्गठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्प हा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए)मार्फत राबविला जात आहे. या प्रकल्पात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या खाली दुहेरी बोगद्यांचे बांधकाम तसेच बोरिवलीकडील पश्चिम द्रुतगती महामार्ग व ठाणेकडील घोडबंदर रोड यांना जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांचा समावेश आहे.सध्या, ठाणे ते बोरिवली दरम्यान २३किमीचा प्रवास करताना १ ते १.५ तास लागतो. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हाच प्रवास फक्त १५ मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे.
प्रकल्पाचे तपशीलएकूण लांबी: ११.८४ किमी
बोगद्याची लांबी: १०.२५ किमी
जोड रस्ते: १.५९ किमी
लांबीचे विभागणी:
बोरिवली बाजूने: ५.७५ किमी
ठाणे बाजूने: ६.०९ किमी
ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह दुहेरी बोगदाया प्रकल्पात ९.२ किलोमीटरचा दुहेरी मार्ग असणार आहे. ज्यात ६.५२ किलोमीटरचे जुळे बोगदे असतील. प्रत्येक बोगदा हा ११ मीटर रुंद असणार आहे. यात दोन लेन वाहतुकीसाठी असतील आणि तिसरी लेन आपत्कालीन वापरासाठी सुरक्षित राखलेली असेल. मानखुर्दला चेंबूर जंक्शन आणि ऑरेंज गेटशी जोडणाऱ्या ईस्टर्न फ्रीवेमुळे दक्षिण मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहतुकीत सुधारणा झाली असली तरी ऑरेंज गेटवरील वाढत्या वाहतुकी कोडींमुळे हा ऑरेंज गेट ते मरिन ड्राईव्ह हा दुहेरी बोगदा मार्ग आवश्यक आहे.
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये:- ९.२ किमी लांबीचा भूमिगत मार्ग ऑरेंज गेट (ईस्टर्न फ्रीवे) ते मरीन ड्राइव्ह कोस्टल रोडला सलग जोडला जाणार
- ६.५२ किमी दुहेरी-बोगदा प्रणाली विशेष आपत्कालीन लेनसह सुरक्षित
- पूर्व-पश्चिम कनेक्टिव्हिटी मजबूत होणार आणि दक्षिण मुंबईसाठी रिंग रूट तयार होईल