
पालघर, दहिसर टोल नाका स्थलांतरित करण्याच्या मागणीला आता निर्णायक वळण मिळालं असून, हा विषय थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निर्णयावर अवलंबून राहिला आहे. राज्य सरकारने केंद्र सरकारकडे औपचारिक प्रस्ताव पाठवला असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) ने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ला यासंदर्भात अधिकृत पत्रही दिलं आहे.
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या प्रकरणात सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली. सरनाईक यांच्या म्हणण्यानुसार, गडकरींनी सकारात्मक उत्तर दिलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मीरा-भाईंदर आणि मुंबई उपनगरातील नागरिक दहिसर टोल हटवण्याची मागणी करत होते. यासाठी ९ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत टोल स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर ११ सप्टेंबर रोजी सरनाईक यांनी प्रस्तावित ठिकाणी पाहणी केली होती. तर १७ सप्टेंबरला MBVV पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेतली होती.
प्राथमिक प्रस्तावानुसार, टोल नाका वर्सोवा ब्रिजच्या आधी आणि वेस्टर्न हॉटेलच्या पुढे मीरा-भाईंदर महापालिकेच्या हद्दीत हलविण्याचा विचार होता. मात्र, वन मंत्री गणेश नाईक यांनी या ठिकाणी टोल हलविण्याला कडाडून विरोध केला.
स्थानिक नागरिकांचाही एक गट टोल स्थलांतराला विरोध करत असून, घोडबंदर परिसरात वाहतूक व प्रदूषण वाढेल, असा युक्तिवाद त्यांनी केला आहे.
तरीही शहरातील बहुतांश नागरिकांचा आग्रह आहे की मौजूदा दहिसर टोल हटवावा, कारण त्यामुळं त्यांचा वेळ व पैसे वाचतात. हा विषय आता शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय संघर्षात अडकला आहे. एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचा टोल स्थलांतरासाठी सक्रिय पाठपुरावा सुरू असतानाच, भाजपचे वन मंत्री गणेश नाईक व स्थानिक नेते या निर्णयाला विरोध करत आहेत.
याच पार्श्वभूमीवर सरनाईक-गडकरी भेटीनंतर नवीन राजकीय समीकरणे उभी राहिली असून, अखेरीस निर्णय NHAI आणि केंद्र सरकारच्या हाती आहे.
ठाणे जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांना भरावा लागणार टोल
जर टोल नाका वसई-विरार महापालिका हद्दीत वर्सोवा ब्रिजजवळ हलवला गेला, तर वसई, विरार आणि पालघरहून ठाण्याला जाणाऱ्या व्यावसायिक वाहनांनाही टोल भरावा लागेल. सध्या या मार्गांवर त्यांना टोल लागत नाही. मात्र, टोलचं नवीन स्थान या हद्दीत आल्यास, हे वाहन चालकही टोलच्या कक्षेत येतील. अर्थात, या वाहनांना नायगाव, बृजेश्वरी व मनोर मार्ग हे पर्यायी मार्ग म्हणून उपलब्ध असतील.