डाेंबिवली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी काँग्रेसचे पदाधिकारी मामा पगारे यांच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात पोस्ट करुन दोन समाजात, प्रादेशिक गटात द्वेषाची भावना निर्माण करुन महिलांविषयी बदनामी केल्याच्या आरोपाखाली पगारे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी भाजपचे जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात पगारे यांच्या विरोधात दिलेल्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक के. आर. पाटील करीत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीचा शोध घेऊन पुढील कारवाई केली जाईल असे म्हटले आहे. मात्र पगारे यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पगारे यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी ही पोस्ट सोशल मिडियावर केली नव्हती. त्यांना आलेली पोस्ट त्यांनी केवळ फाॅरवर्ड केली होती. या गोष्टीवरुन भाजप जिल्हाध्यक्ष परब आणि पदाधिकारी संदीप माळी यांनी पगारे यांना रस्त्यात गाठून त्यांना साडी नेसवली होती. या प्रकरणात ही पगारे यांच्या तक्रारीच्या आधारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी सांगितले की, पगारे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी भाजपने पगारे यांना साडी नेसवून अपमानित केले. त्यांना जातीवाचक शब्द वापरुन अपमानित केले असल्याने भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला नाही तर न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा ही पोटे यांनी दिला आहे.