मुंबई : सहकार चळवळ अडचणीत असून तिला ताकद देण्याची आवश्यकता आहे. सहकाराला पुन्हा गतवैभव आणून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे, असे प्रतिपादन भाजप गटनेते आणि महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष आमदार प्रविण दरेकर यांनी केले. मुंबई पूर्व उपनगर जिल्हा मजूर सहकारी संस्थेच्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
आ. प्रविण दरेकर म्हणाले की, "कधीकाळी ग्रामीण अर्थव्यवस्थेवर सहकाराचा पगडा होता. बँका, सहकारी संस्था अडचणीत आहेत. ज्याप्रकारे स्वयं पुनर्विकासासाठी दरेकर समिती नेमून त्याचा अहवाल मी शासनाला सादर केला, तशाच पद्धतीने राज्यातील सहकारावरील अडचणीचा अहवाल सरकारला देणार आहे. सहकाराला पुन्हा गतवैभव आणून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. या मजूर चळवळीतूनच आपण मोठे झालो. राज्याच्या राजकारणात मी एका टप्प्यावर येऊन पोहोचलो असेन, तरी माझे मूळ हे मजूर चळवळच आहे याचे भान मला सातत्याने असते. मुंबईतील मजूर संस्थांना चांगल्यापैकी कामे मिळत आहे हे नाकारण्यासारखे नाही. मजूर चळवळीच्या ज्या अडचणी होत्या त्या सोडविण्याचे काम आपण केले. प्रसंगी टिकाही सहन केली मात्र चळवळीपासून कधीच पळ काढला नाही. प्रत्येक संकट अंगावर घेऊन मजूर संस्थेला सुरक्षित ठेवण्याचे काम केले."
वर्षभरात राज्य सहकारी संघाचे चित्र बदलणार
"तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने राज्य सहकारी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली. निवडणूक लढवून २१ पैकी २० जागा जिंकलो. १०६ वर्षांपूर्वी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी या संघाची स्थापना केली. वसंतदादा पाटील, विलासराव देशमुख यांसारख्या अनेक नेत्यांनी संघाला मार्गदर्शन केले. सहकार चळवळीला दिशा देण्याचे काम संघाने केले. परंतू, अलिकडच्या काळात संघाची स्थिती बिकट झाली. वर्षभराच्या काळात राज्याच्या संघाचे चित्र बदलणार. संघाच्या माध्यमातून राज्यभर शिक्षण प्रशिक्षण देण्याचे काम करणार. केंद्र आणि राज्य सरकारने शिक्षणाला खूप महत्व दिले असून येणाऱ्या सहा महिन्यात नीट शिक्षणाचा ढाचा उभा राहिलेला दिसेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "मुंबई जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक योजना आणल्या. बाराशे कोटींची बँक आपण १५ हजार ७०० कोटींवर नेली. मुंबई बँकेच्या माध्यमातून शिक्षण संस्था, गिरणी कामगार, माथाडी कामगार यांना आर्थिक मदत केली. लाडक्या बहिणींसाठी शून्य शिल्लक खाते सुरु केले. महिलांना बिनव्याजी कर्ज योजना सुरु केली," असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील सहकार चळवळ ताकदवान व्हावी
"सहकारातील पैसा सहकारात राहिला पाहिजे. आपल्या बँका मजबूत झाल्या तर मुंबईच्या अर्थव्यवस्थेवर सहकाराचा पगडा राहील. तंत्रज्ञानानुसार बदलावे लागेल. स्पर्धेप्रमाणे, लोकांच्या गरजेप्रमाणे बदलावे लागेल. येणाऱ्या स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी एक-एक पाऊल ताकदीने पुढे टाकले पाहिजे. येणारा काळ आपला आहे. प्रत्येक संस्था, मुंबईतील सहकार चळवळ ताकदवान झाली पाहिजे. राज्याच्या सहकाराला दिशा देण्याचे काम मुंबई शहर करेल," असा विश्वासही प्रविण दरेकर यांनी व्यक्त केला.