'सेनापती', 'सुभेदार', 'बाजी'; सह्याद्रीतील वाघांचे झाले नामकरण

    25-Sep-2025
Total Views |
sahyadri tiger reserve, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, वाघ, सह्याद्री, छत्रपती शिवाजी महाराज


मुंबई (अक्षय मांडवकर) -
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात अधिवास करणाऱ्या वाघांचे नामकरण करण्यात आले आहे (sahyadri tiger reserve). यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात सरदारांना दिलेल्या विविध पदव्यांचा आधार घेण्यात आला आहे (sahyadri tiger reserve). शासकीय कागदपत्रांमध्ये व्याघ्र प्रकल्पातील वाघांना सांकेतिक क्रमांक देण्यात आले आहेत (sahyadri tiger reserve). मात्र, पर्यटकांमध्ये वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी स्थानिक निसर्गप्रेमी, गाईड आणि वनमजूरांकडून या वाघांसाठी वापरण्यात येणाऱ्या नावांना वन विभागाने स्वीकारले आहे (sahyadri tiger reserve).

सद्यपरिस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तीन नर वाघ आहेत. २०१८ सालानंतर २०२३ साली १७ डिसेंबर रोजी पाच वर्षांनंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वाघाची नोंद झाली होती. या वाघाची ओळख न पटल्याने त्याचा सांकेतिक क्रमांक ‘एसटीआर- टी१’ असा ठेवण्यात आला. कोल्हापूरच्या राधानगरी वन्यजीव अभयारण्यामध्ये २३ एप्रिल, २०२२ रोजी पहिल्यांदाच टिपलेला आणि १३ एप्रिल, २०२४ रोजी पर्यंत त्याठिकाणीच राहिलेला नर वाघ हा १०० किलोमीटर दूरवर असलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात २८ आॅक्टोबर, २०२४ रोजी टिपला गेला. त्याच्या सांकेतिक क्रमांक ‘एसटीआर- टी२’ असा ठेवण्यात आला. त्यानंतर २०२३ साली कोल्हापूरच्या कडगाव वनपरिक्षेत्रात टिपलेला नर वाघ २०२५ रोजी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात दिसल्यामुळे त्याला ‘एसटीआर- टी३’ असा सांकेतिक क्रमांक देण्यात आला. हाच वाघ कोकणातील चिपळूण वनपरिक्षेत्रात देखील जाऊन आला होता. सध्या एसटीआर-टी१ आणि एसटीआर टी२ हे दोन वाघ चांदोली वन्यजीव अभयारण्यात असून एसटीआर-टी३ हा वाघ कोयना वन्यजीव अभयारण्यात आहे.

शासकीय कागदपत्रांमध्ये या वाघांची ओळख सांकेतिक क्रमांकानुसार नोंदविण्यात आली आहे. मात्र, स्थानिक पातळीवर पर्यटकांमध्ये या वाघांविषयी आकर्षण निर्माण करण्यासाठी त्यांना नावे देण्यात आली आहेत. एसटीआर-टी१ या वाघाला सेनापती आणि एसटीआर टी२ या वाघाला सुभेदार आणि एसटीआर-टी३ या वाघाला बाजी असे नाव देण्यात आले आहे. सह्याद्रीच्या खोऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार लढले. त्यामुळे या खोऱ्यात नांदणाऱ्या वाघांची नावे स्वराज्यातील सरदारांना असलेल्या पदव्यांच्या नावे ठेवण्यात आली आहे. एसटीआर-टी१ हा सर्वप्रथम व्याघ्र प्रकल्पात आल्याने लढाईत ज्याप्रमाणे सेनापती सर्वप्रथम येतो, त्यावरुनच या वाघाला सेनापती हे नाव देण्यात आले आहे.

नव्या वाघिणीसाठी 'आॅपरेशन तारा'
केंद्र सरकाराने नुकतेच ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पामधून आठ वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्याची अंतिम परवानगी दिली आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पात स्थिरावलेल्या तीन नर वाघांचा विचार करता सर्वप्रथम ताडोबामधून वाघिणीचे स्थानांतरण करुन घेण्यात येणार आहे. स्थानांतरणाच्या या प्रक्रियेचे नामकरण 'आॅपरेशन तारा', असे करण्यात आले आहे. ताडोबातून येणाऱ्या वाघिणीचे नावही तारा असे ठेवले जाणार आहे. यासाठी देखील छत्रपती शिवाजी महाराज्यांचाच स्वराजातील नावाचा आधार घेण्यात आला आहे.


तीन वाघ स्थिरावले
आपल्या सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये सध्यस्थितीत तीन नर वाघ स्थिरावले असून त्यापैकी वनपरिक्षेत्र चांदोली मध्ये STR T1(सेनापती),वनपरिक्षेत्र आंबामध्ये STR T2(सुभेदार) आणि वनपरिक्षेत्र कोयनामध्ये STR T3 (बाजी) यांचा वावर असल्याचे आढळून येत आहे. - तुषार चव्हाण, क्षेत्रसंचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प



पर्यटनाच्या दृष्टीने फायदा
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आम्ही वाघांची माहिती सांकेतिक क्रमांक उच्चारुन देत असलो तरी, पर्यटकांना समजण्यास सोपे जावे म्हणून आम्ही त्यांना काही नावांनी उच्चारतो. या नावांचा विचार व्याघ्र प्रकल्पाने वाघांच्या नामकरणासाठी केलेला दिसत आहे. या नामकरणामुळे विदर्भातील वाघांप्रमाणे पर्यटकांमध्ये सह्याद्रीतील वाघांविषयी आकर्षण निर्माण होण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. - अमित माने, वन्यजीव निरीक्षक, चांदोली