वाफेचे इंजिन ते आजच्या सुपरफास्ट ‘वंदे भारत’ एक्सप्रेसचे सारथ्य करणाऱ्या, भारतीय रेल्वेच्या सुवर्णकाळाच्या साक्षीदार, आशियातील पहिल्या महिला रेल्वे लोकोपायलट सुरेखा यादव-भोसले नुकत्याच ३६ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाल्या. शेवटची राजधानी एक्सप्रेस घेऊन मुंबईत दाखल झालेल्या सुरेखा यादव यांचा मुंबई विभागातील ७० ते ८० महिला कर्मचाऱ्यांतर्फे स्वागत सोहळाही दिमाखात संपन्न झाला. तेव्हा, स्त्रीशक्तीचा जागर करणाऱ्या नवरात्रोत्सवाच्या पर्वानिमित्ताने, भारतीय रेल्वेतून प्रदीर्घ सेवा बजावल्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या सुरेखा यादव-भोसले यांच्या जीवनाची ही प्रेरणादायी गाथा...
भारतीय रेल्वे सेवेच्या माध्यमातून दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. अगदी गरिबांपासून ते उच्चभ्रू नागरिक जलद प्रवासासाठी आजही रेल्वेलाच प्रथम प्राधान्य देतात. हे पाहता, रेल्वेतून एकावेळी प्रवास करणाऱ्या त्या दोन हजार नागरिकांना विनाविलंब सुरक्षित त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचविण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी लोकोपायलटच्या हातात असते. आज वाफेच्या इंजिनापासून प्रगती करत भारताने स्वनिर्मित सेमी हायस्पीड ‘वंदे भारत’ संचलनात आणली. हा भारतीय रेल्वेचा सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवत भारताची मान गौरवाने उंचविणाऱ्या आशियातील पहिल्या महिला रेल्वे लोकोपायलट ठरल्या सुरेखा यादव! यादव म्हणजेच आपल्या महाराष्ट्राच्या लेकीने पहिल्यांदा रेल्वेचे सारथ्य करत इतिहासात सुवर्णाक्षरात आपले नाव नोंदविले.
मुंबईत वास्तव्यास असणाऱ्या सुरेखा शंकर यादव या मूळच्या साताऱ्याच्या. दि. २ सप्टेंबर,१९६५ रोजी सुरेखा यादव यांचा जन्म झाला. त्यांचे संपूर्ण बालपण साताऱ्यातच गेले. घरी शेती असल्याने बालपणापासूनच त्यांना शेतीतील कष्टाचे काम करण्याची आवड होतीच. मात्र, वडील रामचंद्र भोसले यांचा कल हा मुलींनी उच्च शिक्षण घ्यावे, याकडे असल्याने त्यांनी प्रथम प्राधान्य शिक्षणाला दिले. सुरेखा यांचे पहिली ते दहावी पर्यंतचे शिक्षण सेंट पॉल शाळेत झाले. अकरावी आणि बारावीचे शिक्षण त्यांनी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातून घेतले. तेथेही मुलींना ‘व्होकेशनल कोर्सेस’ना प्रवेश दिला जात नसे. त्यामुळे सुरेखा यादव या प्रवेश घेणाऱ्या पहिल्याच ठरल्या. त्यामुळे सुरेखा यांना डिप्लोमा द्वितीय वर्षाला प्रवेश मिळाला. १९८६ मध्ये सुरेखा यांनी ‘डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’ पूर्ण केले. १९८६ मध्ये ‘एम्पलॉयमेंट न्यूज’मध्ये सुरेखा यांची नजर ‘साहाय्यक लोकोपायलट’ भरतीसाठी आलेल्या जाहिरातीवर पडली. त्यामध्ये १८ वर्षे वयाची अट आणि डिप्लोमा आवश्यक होता. हे पाहता, सुरेखा यांनी या पदासाठी अर्ज केला. सगळे टप्पे पार करत अखेर त्यांची निवडही झाली. यापूव त्यांच्या घरात कोणत्याही महिलेने काम केलेले नव्हते. तरीही त्यांचे वडील ठाम भूमिका घेत मुलीच्या पाठीशी उभे राहिले. कारण, सुरेखा यांचा सांभाळही त्यांनी एखाद्या मुलाप्रमाणेच केला होता. सुरेखा या स्वतः खेळाडूही आहेत. हे पाहता, त्यावेळी सुरेखा यांच्या वडिलांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे सुरेखा यांनी आज इतके भरीव यश संपादन करत, केवळ पुरुषी वर्चस्व असणारं एक क्षेत्र महिलांसाठी खुलं केलं.
१९८९ मध्ये सुरेखा यादव यांची ‘साहाय्यक लोकोपायलट’ पदी नियुक्ती झाली. त्यानंतर कल्याण येथील ट्रेनिंग स्कुलमध्ये त्यांनी आपल्या प्रशिक्षणाला प्रारंभ केला. यामध्ये ‘लोकोपायलट गुड्स’, ‘लोकोपायलट घाट’ आणि त्यानंतर ‘लोकोपायलट मेल एक्सप्रेस’ अशी त्यांना पदोन्नती मिळत गेली. नियुक्तीच्या वेळी त्यांना कल्पना नव्हती की, आपण जे काम आता करणार आहोत, त्याची ऐतिहासिक नोंद होणार आहे. कारण, सुरेख यादव यांच्यासोबत त्यावेळी अनेक मुलांनीही या परीक्षा दिल्या होत्या. मात्र, त्या सगळ्यातून त्या सक्षम असल्यानेच त्यांची निवड झाली होती. त्यावेळी आपण पहिल्या महिला लोकोपायलट आहोत, हे कळल्यानंतरही कदापि न घाबरता आलेली संधी सोडायची नाही, ही जिद्द बाळगून सुरेखा यादव यांनी हे आव्हान स्वीकारले.
सुरेखा यांना प्रारंभी जसे हे काम आव्हानात्मक वाटले, तसे ते इतरांनाही आव्हानात्मक वाटले. मात्र, अत्यंत विश्वासाने भारतीय रेल्वेने सुरेखा यादव यांची निवड केली. यामध्ये भारतीय रेल्वेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, सहकारी यांनीही त्यावेळी सुरेखा यादव यांना खूप प्रेरणा दिली. सगळ्यांचे साहाय्य्य लाभल्यामुळेच मी आज इतकी पदोन्नती घेत यशस्वी झाले, हे सुरेखा यादव आवर्जून सांगतात. यामध्ये त्यांच्या कुटुंबीयांची साथही तितकीच महत्त्वाची ठरली. वडिलांनी मुलीला पायावर तर उभे केलेच. मात्र, लग्नानंतर पतीनेही सुरेखा यांना उत्तम साथ दिली. “आपली बायको कुठल्याही वेळी कामाला जाते आणि कुठल्याही वेळी घरी येते, हे सांभाळून घेण्याचे दिव्य माझ्या पतीने पार पाडले,” असे त्या अभिमानाने सांगतात. कौटुंबिक जबाबदारी घेत असताना दोन मुलांचीही काळजी सुरेखा यांच्या अनुपस्थितीत पती घेत होते. त्यामुळेच सुरेखा या निश्चिंत होऊन हजारो प्रवाशांची सुरक्षितपणे ने-आण करत होत्या. त्यांची मुलंही उच्च शिक्षण घेऊन नोकरीत व आयुष्यात चांगली स्थिरावली आहेत.
१९८९ ते १९९३ या काळात मालगाडीवर साहाय्यक चालक म्हणून सुरेखा यांनी काम केले. कल्याण मुख्यालयातून मुंबईतील सर्व यार्ड्समध्ये जावं लागत होते. त्यानंतर १९९६-९९ मध्ये पदोन्नती मिळवत सुरेखा यादव यांनी ‘लोकपायलट गुड्स’ म्हणून काम केले. या पदावर काम करणे सर्वाधिक आव्हानात्मक असल्याचे सुरेखा यादव सांगतात. कारण, २४ तासांत कोणत्याही वेळी कोणत्याही यार्डला जावे लागत होते. मात्र, सुरेखा यादव यांनी याकडे आव्हान म्हणून न पाहता, पूर्ण लक्ष केंद्रीत करून काम केले. सुरेखा यांनी कधीही आपल्या ‘लोकोपायलट’ या भूमिकेडे काम म्हणून पाहिले नाही, तर त्यांच्यासाठी हे पद म्हणजे जिद्द आणि आवड होती. हे सर्व काम करत असताना कोणत्याही अधिकाऱ्यांनी पदोन्नती देताना सुरेखा यांना महिला म्हणून नाकारले नाही. याकाळात सुरेखा यांना संपूर्ण भारतीय रेल्वेच्या इतर सहकाऱ्यांचीही उत्तम साथ मिळाली.
भारतीय रेल्वेमध्ये मालगाडी असो, किंवा मोटरमन असो किंवा इतर मेल-एक्सप्रेस गाड्या चालविण्याचे ट्रेनिंग हे चालू गाड्यांवरच होते. त्यामुळे साहाय्यक चालक म्हणून काम करत असतानाच हे ट्रेनिंग होते. यादरम्यान एक मानसिक चाचणी ही होते. ज्यामध्ये प्रसंगावधान दाखवत, म्हणजेच अचानक समोर आलेल्या आपत्ती किंवा आणीबाणीप्रसंगी तुम्ही काय प्रतिक्रिया देतात, याची चाचणी घेतली जाते. ही चाचणी भारतीय रेल्वेच्या संपूर्ण ट्रेनिंगमध्ये सर्वाधिक महत्त्वाची चाचणी आहे. या सर्व चाचण्या पार करून सुरेखा यादव यांनी ‘लोकोपायलट’ म्हणून आपले स्थान निश्चित केले. सुरेखा यादव यांनी केवळ गाडी चालवलीच नाही, तर त्यांनी नव्याने येणाऱ्या तरुणांना प्रशिक्षितही केले. नव्याने येणाऱ्या तरुणांना प्रशिक्षित करता आले, याचा सार्थ अभिमान असल्याचे सुरेखा यादव सांगतात.
मुंबई विभागात घाट सेक्शन आहे. इगतपुरी- कसारा, कसारा-इगतपुरी, कर्जत-लोणावळा, लोणावळा-कर्जत या दोन्ही घाट विभागातही सुरेखा यांनी ‘घाट लोकोपायलट’ म्हणून सेवा बजावली. उपनगरीय रेल्वे सेवेवरही त्या पहिल्या महिला उपनगरीय रेल्वे लोकोपायलट ठरल्या. प्रत्येक वेळी त्यांचे प्रत्येक पदावर अत्यंत आदराने आणि कौतुकाने स्वागत झाले, ज्यामुळे प्रेरणा घेऊन त्या काम करू शकत होत्या. २०२३ मध्ये सुरेखा यादव यांनी ‘मेड इन इंडिया’ अशी ’सोलापूर-मुंबई’ ही पहिली वंदे भारत ट्रेन चालविली. तब्बल साडेसहा तास प्रवास करून सुरेखा यादव यांनी ती ट्रेन मुंबईपर्यंत आणली. हा क्षण अत्यंत अविस्मरणीय असल्याचे सुरेखा यादव सांगतात.
सुरेखा सांगतात की, “त्यावेळी मुलींना त्यांचे पालक इंजिनिअरिंगसाठी पाठवत नव्हते, तेव्हा माझ्या वडिलांनी मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेऊन दिले. माझा पाया खूप पक्का आहे. कोणत्या गोष्टीला घाबरायचं आणि कोणत्या गोष्टीला सामोरं जायचं, याचं बाळकडू घरातूनच मिळालं. आपल्या ताकदीप्रमाणे आपण वागायचे असतं. शेतकऱ्याची मुलगी असल्याने कष्ट करण्याची ताकद असतेच. इंजिनवर एकदा चढलं आणि उतरलं की आपल्याला लक्षात येतं की, ताकद आपल्यात शिल्लक आहे.”
सुरेखा यादव यांचा असा हा मागील ३६ वर्षांचा प्रवास पाहिल्यास, त्या जेव्हा सेवेत रुजू झाल्या, तेव्हा नुकतेच वाफेचे इंजिन मागे सारून भारतीय रेल्वे डिझेल इंजिनकडे वळली होती. सुरेखा यादव यांनी डिझेल इंजिन आणि नंतर इलेक्ट्रिकल इंजिनच्या माध्यमातूनही रेल्वेगाडी चालविली. एवढेच काय तर राजधानी एक्सप्रेसचेही सारथ्य केले. आता शेवटी ‘वंदे भारत’ देखील चालविण्याचा बहुमान त्यांना मिळाला. त्याचवेळी त्यांनी उपनगरीय सेवेतील सर्वप्रकारच्या रेल्वे गाड्या हाताळल्या आहेत.
अशा या सुरेखा यादव यांनी भारतीय रेल्वेच्या बदलांचे आणि प्रगतीच्या युगाच्या त्या साक्षीदार आहेत. आज मध्य रेल्वेत ११५ महिला लोकोपायलट, मोटरमन, ट्रेन ड्रायव्हर या पदावर कार्यरत आहेत. हेच पाहता, सुरेखा यादव जेव्हा त्यांच्या कार्यकाळातील शेवटची राजधानी एक्सप्रेस घेऊन मुंबईत आल्या, तेव्हा मुंबई विभागातील ७० ते ८० महिला कर्मचारी त्यांच्या स्वागतासाठी स्थानकावर उपस्थित होत्या. सुरेखा यादव या केवळ रेल्वेतील महिला कर्मचाऱ्यांसाठीच नाही, तर आज प्रत्येकच क्षेत्रात प्रगती करू इच्छिणाऱ्या महिलांसाठी प्रेरणादायी आहेत.