मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील ओंकार नामक टस्कर वगळता इतर कोणत्याही हत्तीला पकडण्याची परवानगी वन विभागाने दिलेली नाही (sindhudurg elephant). त्यामुळे सर्व हत्ती पकडून नेणार असल्याचा केवळ वावड्या उठवण्यात आलेल्या आहेत (sindhudurg elephant). अशातच ओंकारने आपले बस्तान गोव्यात जाऊन बसवले असताना 'वनतारा'चा चमू मात्र दोडामार्गात ठिय्या मांडून बसल्याचे स्थानिक वन्यजीव निरीक्षकांचे म्हणणे आहे. (sindhudurg elephant)
सध्या सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरात आठ रानटी हत्तींचा वावर आहे. यामधील दोडामार्ग तालुक्यात गणेश नावाचा टस्कर त्याच्यासोबत माई नावाची मोठी मादी, लहान मादी आणि दोन पिल्ले अशा एकूण पाच हत्तींचा वावर आहे. हत्तींचा हा कळप तालुक्यातील प्रामुख्याने तिलारीच्या खोऱ्यातील शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करत आहे. याच पार्श्वभूमीवर हत्तींना पकडून नेण्याच्या मागणीने जोर धरला आहे. अशातच स्थानिक लोकप्रतिनिधींकडून सिंधुदुर्गातील सर्व हत्ती पकडून वनतारामध्ये पाठवणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या केवळ वावड्याच असल्याचे लक्षात येत आहे. कारण, ओंकार वगळता इतर हत्तींना पकडण्याची परवानगी वन विभागाने दिलेली नाही.
ओंकार नामक निमवस्यक हत्ती हा कळपापासून वेगळा झाला असून तो स्वतंत्रपणे वावरत आहे. सध्या तो गोव्यात आहे. या हत्तींमुळे होणारे पिकनुकसानही मोठ्या प्रमाणावर आहे. या हत्तीने ९ एप्रिल रोजी दोडामार्ग जिल्ह्यातील मोर्ले गावातील ६५ वर्षीय शेतकरी यशवंत गवस यांना ठार केले होते. गवस काजू बागेत फेरफटका मारण्यासाठी गेला असता, त्याठिकाणी ओमकारने त्यांच्यावर हल्ला करुन जागीच त्यांना ठार केले होते. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनंतर वन विभागाने या हत्तीला पकडण्याचे आदेश होते. मात्र, आता हा हत्ती गोव्यात असल्याने त्याला पकडणे महाराष्ट्र वन विभागाच्या अखत्यारीच्या बाहेर आहे. शिवाय हा हत्ती आजारी नसून तो माणसाळलेला आहे.
केवळ 'ओंकार'साठी परवानगी
सिंधुदुर्गातील केवळ ओंकार हत्तीला डिसेंबरपर्यंत पकडण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्व हत्तींना पकडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. - एम. श्रीनिवासा राव, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
परवानगी नाही, तर मग का ?
वन विभागाने ओंकार वगळता इतर हत्तींना पकडण्याची परवानगी दिलेली नाही. ज्या ओंकार हत्तीला पकडण्याची परवानगी दिली आहे, तो गोव्यात आहे. अशा परिस्थितीत 'वनतारा'चा चमू लवाजम्यासह दोडामार्गात ठिय्या मांडून का बसून आहे, अशी चर्चा दोडामार्गात आहे. गोवा सरकारची भूमिका ही हत्तीला कर्नाटकात नैसर्गिक अधिवासात पाठवण्याची असताना आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना 'वनतारा'चे कौतुक का आहे ? - संजय सावंत, वन्यजीव निरीक्षक, दोडामार्ग