शिवसेनेकडून पूरग्रस्तांना मदत; जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे ट्रक धाराशीवकडे रवाना

25 Sep 2025 15:43:33

मुंबई : मराठवाड्यात पावसाने थैमान घातले असून अतिवृष्टीमुळे तेथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच शिवसेना पक्षाच्या वतीने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी बुधवार, २४ सप्टेंबर रोजी तातडीने मदत पाठवण्यात आली.

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने विविध साहित्य असलेले कीट तयार करण्यात आले. हे मदत साहित्य घेऊन अनेक ट्रक बुधवारी धाराशिव जिल्ह्याकडे रवाना झाले. यात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाकडून पाठवण्यात येणारे डॉक्टरांचे पथक, जीवनावश्यक वस्तूंच्या किट्स, घरात लागणाऱ्या वस्तू आणि औषधांचा समावेश आहे. असे ५० ते ६० ट्रक अतिवृष्टीग्रस्त भागात पाठवण्यात आले आहेत.

मदतीच्या कीटमध्ये काय?

पीठ, पोहे, मूगडाळ, शेंगदाणे, तेल, २ ब्लँकेट, साखर, चहा पावडर, मसाला, तांदूळ, हळद, मीठ इत्यादी दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा या कीटमध्ये समावेश आहे. पूरग्रस्तांसाठी तयार करण्यात आलेल्या या किटमध्ये साधारण १२ दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. ही सर्व सामग्री पूरग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत मिळावी यासाठी देण्यात येत आहे.

फोटोवर लक्ष देणाऱ्यांना राजकारण करायचे आहे

या मदतीच्या किटवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो लावण्यात आला आल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. या टीकेला उत्तर देताना ते म्हणाले की, “कार्यकर्त्याने त्या ठिकाणी मदत वाटप केली, तर त्या बॅगेत काय मदत साहित्य आहे, यावर लक्ष दिले पाहिजे. जे फोटोवर लक्ष देतात त्यांना राजकारण करायचे आहे." त्यानंतर ज्यांनी आरोप केले, त्यांनी एक किलो धान्य कधी शेतकऱ्याच्या बांधावर नेऊन दिले का? असा प्रश्न मध्येच तानाजी सावंत यांनी विचारला.


Powered By Sangraha 9.0