
कल्याण : कल्याण-मुरबाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात रायते पुलाजवळून अंबरनाथकडे जाणाऱ्या वाहनांसाठीचा रस्ता बंद करण्याच्या `एनएएचआय'च्या निर्णयामुळे होणारी हजारो प्रवाशांची गैरसोय अखेर टळली आहे. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मागणीनंतर रायते पुलाजवळून हलक्या वाहनांसाठी स्वतंत्र रस्ता तयार करण्यास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएएचआय) मंजुरी दिली आहे.
रायते ते अंबरनाथ दरम्यानच्या रस्त्यावर आणे, भिसोळ, नालिंबी, वसत, जांभूळ गावे आहेत. कल्याणहून अंबरनाथकडे जाणाऱ्या या पर्यायी मार्गावर मोठी वाहतूक सुरू असते. मात्र, सध्याचा रस्ता बंद करून `एनएचआय'ने त्याऐवजी रायते येथील नवा पुल ओलांडून वळण घेऊन पुन्हा जुन्या पुलावरुन अंबरनाथकडे जाण्यासाठी पर्याय ठेवला होता. त्याला नागरिकांचा विरोध होता. सध्या मुसळधार पावसात जुन्या पुलावरुन पाणी वाहून जाते. त्यामुळे पावसाळ्यात नागरिकांचा संपर्क तुटणार होता. तर भविष्यात जुन्या पुलाची दुरुस्तीकडे दुर्लक्ष होण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत होती. याबाबत त्यांनी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे तक्रार केली होती.
या पार्श्वभूमीवर कपिल पाटील यांनी `एनएएचआय'च्या अधीक्षक अभियंता तृप्ती नाग व कंत्राटदाराच्या प्रतिनिधींसमवेत आज प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. रस्ते व पुलाचा मंजूर आराखडा आणि नागरिकांची मते घेऊन, रायते-पांजरापोळ येथून अंबरनाथकडे जाणाऱ्या छोट्या वाहनांसाठी स्वतंत्र रस्ता तयार करण्याची आग्रही मागणी केली. ती अधिकाऱ्यांकडून मंजूर करण्यात आल्यामुळे हजारो नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या वेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष मधुकर मोहपे, चंदू बोस्टे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.