वा वा...आमचा बाप किती धाडसी, किती महान आणि तोच खरा जंगलाचा राजा आहे, असे त्या पिलावळींना वाटावे, म्हणून एका पळपुट्या उंदराने पिलावळींसमोर जाहीर केले, “मी जंगलाच्या राजाला सिंहाला हरवले. मला तो घाबरतो.” पण, हे सत्य नसते, सत्य एकच असते की, पळपुटा उंदीर खोटारडा आणि लबाड आहे. उंदराची गोष्ट आठवली. कारण, नुकतेच पाकिस्तानने त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात धडा समाविष्ट केला. त्याचा सारांश आहे दि. ७ मे २०२५ रोजी भारताने कारण नसताना पाकिस्तानवर हल्ला केला. पण, पाकिस्तानने भारताला चांगलाच धडा शिकवला. शेवटी भारत नमला आणि घाबरून त्याने अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना ट्रम्प यांना सातत्याने विनंती केली की, कृपया पाकिस्तानला शस्त्रबंदी करायला सांगा. मग ट्रम्प यांनी पाकिस्तानची अनेकवेळा मनधरणी केली, तेव्हा कुठे पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचे थांबवले. पाकिस्तानचा हा खोटारडेपणाचा कळस आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रगीतात म्हटले आहे की, “हे पाकिस्तान, तू एका महान शपथेची निशाणी आहेस.” पण, १९४७ सालापासूनचे पाकिस्तानचे उपद्व्याप आणि कटकारस्थान पाहिले की वाटते, एका महान शपथेची निशाणी नाही, तर पाकिस्तान एक भयंकर खोटारडेपणाची निशाणी आहे. १९४७ साली मुस्लिमांसाठी स्वतंत्र देश निर्माण व्हावा, म्हणून पाकिस्तानची निर्मिती झाली. पण, वेगळ्या झालेल्या पाकिस्तानात त्याच दिवसापासून खोटारडेपणाचा कळस करत हिंसा पसरवली गेली.
भारताबद्दल प्रचंड द्वेष आणि असुया त्यातून खोटा इतिहास, इतिहासातील घटनांची तोडमोड करणे, यातूनच पाकिस्तानची पिढी घडत आहे. उदाहरणार्थ, पाकिस्तानच्या अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाते की, मोहम्मद-इ-गजनी, अलाउद्दीन खिलजी आणि औरंगजेब हे शूरवीर-धर्मयोद्धा होते. त्यांनी भारतावर आक्रमण केले ते योग्यच होते. गजनीबाबत पाकिस्तानमध्ये शिकवले जाते की, तो मूर्तिपूजेचे पाखंड मोडणारा योद्धा होता. त्याच्या हल्ल्याने हिंदू राजे शरण आले. त्यांनी गजनीला राज्य देऊ केले. पण, गजनी थांबला नाही. त्याने मंदिरे तोडली. कारण, तो खरा मुसलमान होता. तसेच, खिलजी आणि औरंगजेबाबाबत पाकिस्तानमध्ये सांगितले जाते की, हे दोघेही शूरवीर होते. त्यांनी अत्याचार केले नव्हते. उलट ते धार्मिक होते. इस्लामिक कायदा अंमलबजावणी करणारे धर्मयोद्धा होते. मात्र, भारतीय हिंदूंनी आणि इंग्रजांनी कपटाने या दोन योद्धांचे चित्रण वाईट पद्धतीने केले. हे असे आशय पाकिस्तानच्या शैक्षणिक अभ्यासक्रमात आहेत.
काय म्हणावे? पाकिस्तान भारताला युद्धभूमीत आणि नैतिकतेतही हरवू शकत नाही, म्हणून समाजमाध्यमांवर पाकिस्तान तशी खोटी स्वप्न रंगवत असतो. याचवष ब्रिटिनच्या प्रसिद्ध ‘द टेलीग्राफ’ वर्तमानपत्राचे मुखपृष्ठ पाकिस्तानी समाजमाध्यमांवर झळकत होते. त्या मुखपृष्ठाचे शीर्षक होते, “पाकिस्तान एअर फोर्स : द अण्डिस्प्यूटेड किंग ऑफ द स्काईज” या मुखपृष्ठामध्ये ब्रिटनने जणू मान्य केले होते की, पाकिस्तान हा जगामध्ये ‘एअर फोर्स’चा राजा आहे. हे पाहून अवघा पाकिस्तान उत्साहित झाला. पण, लगेचच ‘द टेलीग्राफ’ने स्पष्ट केले की, “हे मुखपृष्ठ आमचे नाही ते बनावट आहे. ते बनवणाऱ्यांची आम्ही निंदा करतो.” पण, आजही पाकिस्तानी मोठ्या गर्वाने ते मुखपृष्ठ मिरवतात. अशीच एक बातमी पसरवली गेली की, ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान भारतीय सैन्याने कराचीवर हल्ला केला. मात्र, कराचीतल्या शूर कौमने सैनिकांना शरण आणले. सत्य काय होते, तर यावेळी भारताने पाकिस्तानचे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते आणि ते पुराव्यासहित जगासमोर मांडलेही होते.
याच काळात पाकिस्तानमध्ये एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला. त्यामध्ये पाकिस्तानने भारताचे ‘राफेल’ विमान पाडलेले चित्रित केले होते. पण, तेही खोटेच होते. कारण, संबंधित व्हिडिओ २०२४ साली महाराष्ट्रात झालेल्या ‘सुखोई-३० एमकेआय’ विमानाच्या अपघाताचा होता. पाकिस्तानला माहिती आहे की, भारतावर विजय मिळवणे स्वप्नात शक्य नाही. मात्र, आभासी जगात खोट्या अफवा पसरवून, भारतावर खोटा खोटा विजय मिळवून, पाकिस्तान किती शक्तिशाली आहे, असा भ्रम पाकिस्तानात पसरवायचा, हेच काम सध्या पाकिस्तान करत आहे. बाकी खोटारड्या उंदराच्या गोष्टीतला उंदीरही असाच आहे, नाही का?