मुंबई : विरोधकांनी टोमणे मारण्यापेक्षा सूचना द्याव्या. त्यांनी दिलेल्या प्रत्येक सुचनेवर सरकार विचार करणार. कुणीही राजकारण न करता शेतकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असे मत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवार, २४ सप्टेंबर रोजी व्यक्त केले.
राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर सर्व मंत्री दौऱ्यावर होते. याच पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्या त्या जिल्ह्यांमध्ये पूरस्थितीची पाहणी करत आहेत. मराठवाड्यात मागच्या ५० वर्षात जेवढा पाऊस झाला नाही त्यापेक्षाही जास्त पाऊस यावेळी झाला. त्यामुळे जमिनी खरडून निघाल्या, पीक उध्वस्त झाले, शेतकरी टाहो फोडत आहेत, घरांचे, मालमत्तांचे आणि जनावरांचेही नुकसान झाले आहे. मागच्या पाच दिवसांपासून आमचे प्रशासन काम करत आहेत. काल मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना फील्डवर राहण्याच्या सूचना दिल्या असून नुकसानग्रस्त भागांचे तातडीने पंचनामे व्हावे, ही महसूलमंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे. पंचनामे झाल्याशिवाय शेतकऱ्यांना मदत मिळत नाही. त्यामुळे जे जे पंचनामे येत आहेत त्यावर तातडीने जीआर काढून मदत पोहोचवण्याचे काम सुरु आहे. शेतकऱ्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आम्ही पूर्ण मदत करणार आहोत."
"पंचनाम्यात चूक झाली तर शेतकऱ्याचे नुकसान भरून निघत नाही. त्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांकडून पंचनाम्यामध्ये कुठलीही चूक होऊ नये, याची काळजी महसूलमंत्री म्हणून मी घेणार आहे. खरडून गेलेल्या जमिनी आणि शेतीचे नुकसान यासाठी वेगवेगळे जीआर निघत आहेत. शेतकऱ्यांसाठी पैसे आमच्याकडे कमी असून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढले पाहिजे ही आमची भावना आहे. राज्यातील गुंतवणूकदार, बिल्डर, विविध कंपन्या या सर्वांनी समोर येऊन शेतकऱ्यांना मदत करावी," असे आवाहनही त्यांनी केले.
ही राजकारण करण्याची वेळ नाही
"हे आरोप प्रत्यारोपाचे दिवस नाहीत. सर्व पक्षांच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी राजकारण न करता त्यांच्याकडे असलेली अधिकची माहिती सरकारला पुरवावी. ज्या शेतकऱ्याला पैसे पोहोचले नाही तिथे आम्ही पोहोचवू. हा राजकारणाचा आखाडा नाही. काँग्रेसचे सरकार असताना अशा प्रकारची परिस्थिती उद्भवल्यावर आम्ही सरकारच्या सोबत उभे होतो. सरकारवर टीका करून राजकारण करण्याची ही वेळ नाही. त्यांनीही शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन सूचना कराव्या. विरोधकांच्या दौऱ्यातून ज्या सूचना येतील त्या आम्ही पूर्ण करू," असेही ते म्हणाले.
मदतीत जाहिरातबाजी येऊ नये
"एकनाथ शिंदे यांच्या मदत वाटप कार्यक्रमात त्यांनी कुठली जाहिरात छापली याबद्दल मला माहिती नाही. एकनाथ शिंदे हे अत्यंत भावनिक कार्यकर्ते आहेत. यापूर्वीसुद्धा अशा प्रकारची मदत वाटप करताना विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी आपले फोटो लावले आहेत. कुणी कोणते फोटो लावून काय मदत केली, हे सर्वांना माहिती आहे. पण मी त्यात जात नाही. विरोधकांनी स्वत:ला तपासून मग आमच्यावर आरोप करावेत. पण कुठल्याही परिस्थितीत मदतीत जाहिरातबाजी येऊ नये. मदत ही अदृष्य सढळ हाताने करावी. लोकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. एकदा घरात पाणी शिरले तर किमान दोन-तीन महिने घर पूर्ववत व्हायला वेळ लागतो. काय खातील आणि कसे जगतील हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे जीवन मरणाचा प्रश्न तयार झाल्यावर त्यांचा संताप होतो. त्यामध्ये काही गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. आम्ही त्या ऐकून घेत मदत करण्याच्या भूमिकेत आहोत," असेही मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.