
मुंबई : मुंबईत सध्या चार मेट्रो मार्गिका वाहतूक सेवेत दाखल असून या मार्गिकांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा प्रवास आता आणखी सोपा झाला आहे. आता एकाच तिकीटावरून चारही मट्रो मार्गिकांमधून प्रवास करता येणार आहे. घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १चे संचलन करणाऱ्या मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘वन तिकीट’ ॲप कार्यान्वित केले आहे.
सध्या, मुंबई मेट्रो नेटवर्कची कार्यरत लांबी सुमारे ७० किमी आहे आणि येत्या काही महिन्यांत आणि वर्षांत सुमारे २७० किमी वाढेल, ज्यामुळे एकूण लांबी ३४० किमी होईल. प्रवाशांना एका वेळी दोन वा त्यापेक्षा अधिक मार्गिकांवरून प्रवास करायचा असल्यास त्यांना आता या ॲपवरून एकच तिकीट खरेदी करता येणार आहे. येत्या काळात आणखी काही मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होणार असून या मार्गिकांवरून प्रवास करण्यासाठी या ॲपवर तिकीट उपलब्ध होणार आहे.
मुंबई मेट्रो नेटवर्कचा विस्तार आणि विविध मार्गांचे व्यवस्थापन करणारे अनेक ऑपरेटर, तिकीट बुकिंगसाठी एकात्मिक प्लॅटफॉर्मची स्पष्ट आवश्यकता होती. ओएनडीसी (ओपन नेटवर्क फाॅर डिजिटल काॅमर्स) या नेटवर्कवर हे ॲप कार्यान्वित करण्यात आले आहे. जून २०२५ मध्ये मुंबई मेट्रो-३ साठी हे अॅप सादर करण्यात आले. त्याला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाच्या आधारे सर्व मार्गांवर एकच बुकिंग सक्षम करण्यासाठी एक सुधारित आवृत्ती सादर केली जात आहे. वन तिकीट अॅप अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी प्ले स्टोअरमध्ये उपलब्ध आहे आणि iOS वापरकर्त्यांसाठी अॅप स्टोअरमध्ये 'वन तिकीट इंडिया' असे नाव देण्यात आले आहे.
"मुंबई मेट्रो नेटवर्कचा विस्तार आणि वेगवेगळ्या मार्गांचे व्यवस्थापन करणाऱ्या अनेक ऑपरेटर्समुळे मुंबईकरांना तिकीट काढण्यासाठी एकात्मिक प्लॅटफॉर्मची आवश्यकता निर्माण झाली. वन तिकीट अॅप प्रवाशांना एकाच वेळी वेगवेगळ्या मेट्रो मार्गांसाठी तिकिटे खरेदी करण्याची परवानगी देते, ज्यामुळे प्रत्येक प्रवास सोपा आणि स्मार्ट होतो. नेटवर्कवर 'वन तिकीट कंझ्युमर अॅप' लाइव्ह असल्याने, मुंबईकर एकाच तिकिटावर एंड-टू-एंड प्रवासाचे तिकीट खरेदी करून दैनंदिन प्रवासाचे नियोजन करू शकतात. उदाहरणार्थ, दहिसर ते बीकेसी प्रवास करणारा प्रवासी आता एकाच अॅप्लिकेशनद्वारे संपूर्ण प्रवास एकाच वेळी बुक करू शकतो."