येणाऱ्या काळात महागणेशोत्सव विश्वव्यापी होणार! : ॲड आशिष शेलार

25 Sep 2025 20:03:11

मुंबई : "गणेश भक्तांच्या, सेवकांच्या कार्यामुळेच आपला महाराष्ट्र राज्याचा उत्सव, गणेशोत्सव सर्वदूर पसरला. येणाऱ्या काळात आपला हाच महागणेशोत्सव विश्वव्यापी होणार याचा मला विश्वास आहे" असे प्रतिपादन राज्य सांस्कृतिक कार्यमंत्री एडवोकेट आशिष शेलार यांनी केले. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा २०२५ च्या पारितोषिक वितरण समारंभाच्या वेळी ते बोलत होते. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की " सार्वजनिक गणेशोत्सवाचा उपक्रम आपल्या समाजाला सांस्कृतिक दृष्ट्या बळ देणारा उत्सव आहे. लोककला, लोकनृत्य, या माध्यमातून आपल्या भव्य संस्कृतीचे दर्शन या निमित्ताने आपल्याला घडतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना ज्या प्रकारे युनेस्कोचे मानांकन मिळाले, त्याच प्रकारे येणाऱ्या काळात गणेशोत्सवाला सुद्धा आपल्याला जागतिक स्तरावर सन्मान मिळवून द्यायचा आहे. "

सांस्कृतिक कार्य विभाग, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या माध्यमातून दि. २५ सप्टेंबर रोजी, महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२५ या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री ॲड मांं प्रभात लोढा, विधानसभेचे सदस्य महेश सावंत, सांस्कृतिक कार्यालयाच्या उपसचिव नंदा राऊत, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर उपस्थित होते. या प्रसंगी ‘जल्लोष महा उत्सवाचा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या संचालिका मीनल जोगळेकर म्हणाल्या की “ महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेमध्ये दीड हजारहून अधिक मंडळांनी आपला सहभाग नोंदवला. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वामध्ये आपण हा उत्सव अधिक सर्वसमावेशी करु शकलो.” , कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मंत्री ॲड मंगल प्रभात लोढा आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले “ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्राचा महागणेशोत्सव अत्यंत दिमाखात संपन्न झाला. आता आपल्याला हा उत्सव विश्वस्तरावर साजरा करायाचा आहे.” सदर कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्या राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय सार्वजनिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२५ च्या स्पर्धेत राज्यभरात सांगलीच्या तिरंगा गणेशोत्सव मंडळाने प्रथम क्रमांक पटकवला. लातूरच्या वसुंधरा वृक्षरुपी गणेशोत्सव मंडळाने द्वितीय पुरस्कार पटकवले. अहमदनगरच्या पार्थर्डी तालुक्यातील सुवर्णयुग तरुण मंडळाने तृतीय पारितोषिक पटकवले. या व्यतिरीक्त जिल्हास्तरीय ९२ मंडळांचा सन्मान यावेळी करण्यात यावा.

महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा करायाचा आहे.

मराठवाड्यातील पूरपरिस्थीतीवर भाष्य करताना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार म्हणाले की “ आज आपला महाराष्ट्र, आपला मराठवाडा पावसामुळे अनेक संकटांनी ग्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या समोर आव्हान उभं ठाकलं आहे. परंतु, या सगळ्या संकटांवर मात करत आपल्याला महाराष्ट्र उभा करायाचा आहे.” राज्याच्या शेतकऱ्यांसमोरील हे संकट लक्ष्यात घेता अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आपल्या पारितोषिकातील रकमेतील काही भाग हा शेतकऱ्यांना देण्याचे घोषित केले.

Powered By Sangraha 9.0