भारतातील सर्वात मोठ्या कंटेनर पोर्टवर ई-ट्रक्सची सुरूवात

25 Sep 2025 15:25:49


मुंबई : भारतातील सर्वात मोठे कंटेनर पोर्ट असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए ) शाश्वततेकडे पाऊले टाकत कायमच वेगवेगळ्या उपाययोजना करताना दिसते. त्याच दिशेने होत असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरण (JNPA) येथे आज इलेक्ट्रिक ट्रक्सच्या फ्लॅग ऑफ समारंभाचे आयोजन करण्यात आले. "रूटेड इन ब्लू, ग्रोइंग ग्रीन" या घोषवाक्यासह पर्यावरणपूरक उपक्रमाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे केंद्रीय मंत्री, पोर्ट्स, शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालय सर्बानंद सोनोवाल हे आहेत.


जेएनपीएचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात जेएनपीएचे वरिष्ठ अधिकारी ही उपस्थित असतील. यावेळी जे.एम.बक्षी ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक ध्रुव कृष्ण कोटक यांचे उद्घाटनपर भाषण होईल. याचबरोबर एनर्जी इन मोशनचे एमडी व सीईओ नरेंद्र मुरकुंबी हे देखील मान्यवरांना संबोधित करतील. यावेळी जेएनपीए सस्टेनेबिलिटी फिल्मचे प्रदर्शनही करण्यात येईल. जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ आणि केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्या भाषणानंतर केंद्रीय मंत्री व जेएनपीए अध्यक्षांच्या हस्ते इलेक्ट्रिक ट्रॅक्टर ट्रेलर्सचे फ्लॅग ऑफ करण्यात येईल.


हरित भविष्याची वाटचाल


या उपक्रमामुळे जेएनपीएने पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेचा स्वीकार करून कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. देशातील सर्वात मोठ्या कंटेनर पोर्टाने इलेक्ट्रिक ट्रक्सचा स्वीकार केल्यामुळे शाश्वत विकासाला चालना मिळणार आहे.



Powered By Sangraha 9.0