टेक्सासमधल्या आयसीई डिटेन्शन सेंटरमध्ये झालेल्या गोळीबारात २ कैद्यांचा मृत्यू; हल्लेखोरानं स्वतः लाही संपवलं!

25 Sep 2025 19:53:16

मुंबई : अमेरिकेतील टेक्सास राज्यातील डॅलस येथील 'यूएस इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (आयसीई) डिटेन्शन सेंटर'मध्ये बुधवारी दि. २४ सप्टेंबर रोजी झालेल्या गोळीबारात दोन कैद्यांचा मृत्यू झाला असून इतर दोघे जखमी झाले आहेत, शिवाय संशयित आरोपीने देखील आत्महत्या केल्याची माहिती माध्यामांतून समोर आली आहे.
ही घटना ८१०१ नॉर्थ स्टेमन्स फ्रीवे येथील आयसीई फील्ड ऑफिसमध्ये पहाटेच्या सुमारास घडली असून, होमलँड सिक्युरिटी सेक्रेटरी क्रिस्टी नोएम यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोराने शेजारच्या इमारतीतून लक्ष्य करून गोळीबार केला. गोळीबार करणाऱ्याने दुसऱ्या संघीय एजन्सीच्या व्हॅनमध्ये गोळीबार केला आणि जी आयसीई व्हॅन नव्हती. ही व्हॅन डॅलस आयसीई सुविधेत कैद्यांना घेऊन जात होती.

डॅलस पोलिसांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी नाव अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. त्याने हल्ल्यानंतर स्वत:ला देखील गोळी मारली ज्यात तो मरण पावला आहे. शिवाय आयसीईचे कार्यकारी संचालक टॉड लायन्स यांनी हल्लेखोराचे वर्णन "संभाव्य स्नायपर" असे केले आहे. परंतु आयसीई कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना कोणतेही नुकसान झाले नाही, असे होमलँड सिक्युरिटीच्या प्रवक्त्या ट्रिसिया मॅकलॉघलिन यांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यात केवळ कैद्यांना लक्ष्य करण्यात आले होते.


Powered By Sangraha 9.0