मनामध्ये असंख्य वासना निर्माण होतात. इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला या वासनांच्या पूर्ततेचा आनंद मिळत असतो. मात्र, त्यातून अपेक्षित असणारी तृप्तता ही अंशकालीनच असते. शाश्वत तृप्तीचा आनंद घेण्यासाठी भक्तीचा कास धरण्याचा मार्ग अनेक संतांनी सांगितला. त्याच्या अवलंबाने अनेकांना संतवचनातील सत्यता अनुभवासही आली. जगदंबा ही मातृरुपानेच सर्वत्र वास करत असल्याने, सर्व लेकरांवर तीचे प्रेम सारखेच असते. अशा जगदंबेच्या कृपेचा साक्षात अनुभव घेऊन ज्यांनी शाश्वत सुखाचा अनुभव घेतलेल्यांचा नवरात्र उत्सवाप्रित्यर्थ घेतलेला मागोवा...
कधी कधी काही विषयच इतके मोठे असतात की त्यांबद्दल काही लिहायचे म्हटले, म्हणजे प्रबंधच्या प्रबंध कमी पडावेत. लिखाणाची सुरुवात प्रतिभेने म्हणजेच प्रति+भा तेजाकडे धाव घेणार्या वृत्तीमुळे होत असते, असं म्हणतात. जसं लेखन, कवित्व हा तेजाचा एक आविष्कार, तसंच कुठल्याही बाबतीत मनाची उचल खाणारी जी प्रवृत्ती आहे, तिला आपल्या योगशास्त्रात ‘व्युत्थान’ असा शब्द योजलेला आहे. तीच ती ‘केनोपनिषदा’तली मूळ देवी उमा. ही देवी जशी सूक्ष्म रूपाने आपल्या सगळ्यांमधे वास करून आहे, तशीच ती काही असामान्य लोकांना खरेच दृगोचर होऊन दर्शन देतीही झाली असल्याची, अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. हल्ली जनसामान्यांमध्ये ज्ञानरूप आणि तत्त्वरूप पूजन अधिक प्रमाणांत मुरणे हे भारताच्या भौतिक प्रगतीच्या दृष्टीने उत्तमच जरी असले, तरी पारंपरिक श्रद्धेने केलेली देवपूजाही त्याच्या आड येत नाही. उलटपक्षी ती श्रद्धा, ती मनाची आणि शरीराची उत्तम शुद्धी ठेवून केलेले उपचार, धारणा, मनापासून देवीला दाखवलेला नैवेद्य, मनात असलेला खरा भाव या सार्या गोष्टी त्या अतिशय आवश्यक आणि अपरिहार्य विज्ञाननिष्ठेला अधिकच बळकटी देतात. हे मी म्हणत नसून, कोण म्हणतंय तर श्रीनिवास रामानुजन! कुंभकोणममध्ये जन्माला आलेला हा थोर गणितज्ञ म्हणतो की, त्या गणितीय समीकरणाची माझ्या दृष्टीने काहीच किंमत नाही, ज्यातून ईश्वरी विचार मजपर्यंत येत नाही! पण जोवर यम-नियमांच्या मुशीतून आपण जात नाही, जोवर अनुभवाच्या गोष्टी तर्कांवर तोलणे आपण थांबवत नाही, तोवर ‘कठोपनिषदा’तले ऋषी कितीही उच्च स्वरात ओरडले, तरी आपणास ते ऐकू म्हणून जावयाचे नाही. नैतदचिर्ण-व्रतोधिते! अर्थात, ही व्रते ज्याने आचरली नाहीत, त्याला ते कळावयाचे नाही! जागतिक गणित दिवस रामानुजन यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. रामानुजन हा लहानपणापासूनच मोठा दार्शनिकही होता. गणितासारखा विषय तो उपनिषदीय तत्त्वज्ञान सांगत स्पष्ट करीत असे. आपल्या आजीपासून ध्यानाचे धडे घेतलेल्या श्री रामानुजन याने अशी गणितीय समीकरणं मांडून ठेवली आहेत की, ज्यायोगे आज कृष्णविवरांविषयी माहिती कळत आहे. यात चमत्कार असा की, त्याने ही प्रमेये त्या काळी मांडली ज्या काळी ’कृष्णविवर’ ही संकल्पनाच वैज्ञानिकांना ठावूक नव्हती. याचे श्रेय मात्र तो त्याची उपास्यदेवी नामागिरी हिला देत असे. विष्णूच्या नरसिंह अवतारातील लक्ष्मी म्हणजे नामागिरी देवी. लहानपणापासून देवीच मला गणित शिकवते, असे हा लंडनच्या नामांकित ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलेला रॉयल सोसायटीचा फेलो म्हणत आहे. ध्यानामधे देवी मज जिव्हेवर विधेयांची उत्तरे पेरते, अशी कबुली तो प्रो. हार्डी यांस देत असे. अध्यात्म आणि विज्ञानाचा किती अप्रतिम संगम! रामानुजन यांनी गणिताचा जितका तीव्रतेने अभ्यास केला, तितक्याच तीव्रतेने उपनिषदांचा अभ्यास आणि अतिशय श्रद्धेने नामगिरी देवीची उपासना केलेली असल्याकारणाने, त्यांना प्रश्नोपनिषदातली विश्वरूची सबंध विश्वेच्या विश्वे गिळंकृत करेल अशी जणू जिची रुची आहे, ती विश्वरूची ही देवी म्हणजेच आपल्यात सारे ओढून घेणारे जे ‘ब्लैक होल’ त्याची अधिष्ठात्री देवता आहे हे कळले. पण फक्त मनापासून पूजा करणार्यांसही हे साधले नाही आणि फक्त ज्ञान मिळवणार्यांसही हे साधले नाही. रामानुजन एखादाच विरळा! मी यांस सश्रद्ध चिकित्सा म्हणतो. रामानुजन म्हणत असे की स्वप्नातही मी गणितेच सोडवत असतो. एखाद्या प्रमेयाचे उत्तर मिळत नसले की, स्वप्नात ते हमखास मिळावेच. पाय या गणितीय स्थिरांकाचे मूल्य काढणारे सूत्र देवीनेच मला सांगितले, असे तो ठामपणे सांगत असे. तशीच कथा कालिदासाचीही. अशिक्षिततेमुळे आपल्या पत्नीकडून अपमानित झालेला हा तरुण, काली मातेची उपासना करूनच पांडित्य मिळविता झाला. कालीने जिव्हेवर अंगुली ठेवली आणि संस्कृत शब्दांचे अर्थ त्यांस उमगू लागले. देवीने जिव्हेवर अंगुली ठेवून कृपाप्रसाद प्राप्त झालेले अजून एक उदाहरण म्हणजे, प्रल्हाद जानी हे. गुजरातमध्ये जन्माला आलेले जानी लहानपणी दहा वर्षांचे असताना, एका जंगलात निघून गेले. तेथे त्यांना तीन देवींनी दर्शन दिले आणि पुढे याच मार्गावर चालण्याचा आदेशही दिला. त्यावेळी त्यांचे वय फारच कमी असल्याकारणाने, ‘मला भूक लागली तर मी काय करू,’ असा प्रश्न त्यांनी केला. त्यावर देवीने त्यांच्या जिव्हेवर अंगुली ठेवली आणि म्हणाली की ‘आता यापुढे भूक आणि तहान यांची चिंता तुला नको!’ त्या दिवसापासून प्रल्हाद जानी यांनी अन्न आणि पाणी यांचा त्याग केला. त्यांची योगशास्त्रात सांगितल्याप्रमाणे क्षुत्पिपासा विनिवृत्ती झाली. योगशास्त्र सांगते की, ‘कण्ठकुपे संयमात् क्षुत्पिपासा विनिवृत्तिः’ कंठकूपावर संयम केला असता, तहान-भुकेची निवृत्ती होते, ती नाहीशी होते. उत्क्रांती शास्त्रातली पुढची विधेये आपल्या संस्कृतीने आधीच देऊन ठेवली आहेत. आपण अजून किती वर्षे त्याकडे दुर्लक्ष करायचे, ते हिंदूंनी ठरवावे. आता वाचक म्हणतील की, याचे पुरावे कुठे आहेत, तर डीआरडीओ या भारताच्या नामांकित संस्थेने यावर अधिक संशोधन केले. त्यांना अनेक दिवस खरोखरच परीक्षणाखाली ठेवून पडताळणी केली. ते खरेच काही खात-पित नाहीत. त्यांच्या मूत्राशयाच्या तपासणीत असे दिसून आले की, पाणी प्यायलेले नसूनही एक पाण्यासारखा द्रव पदार्थ त्यांच्या मूत्राशयाच्या पिशवीत जमा होतो आणि तेथेच जरा वेळाने नाहीसाही होतो. अजून एक आश्चर्याची बाब जी जास्तं महत्त्वाची आहे ती ही की, देवीने ज्या क्षणी त्यांस स्पर्श केला, तेव्हापासून त्याची र्ळिीींळींरीू सश्ररपव आणि ळिपशरश्र सश्ररपव यांची वाढ थांबली. २०२० साली ते निवर्तले, त्यावेळीही या दोन्ही संस्थांची वाढ ही दहा वर्षांच्या मुलाचीच होती.देहरादूनच्या रुग्णालयात त्यांचे हे रिपोर्ट्स अजूनही बघावयास मिळतात. मेडिकल जर्नलमध्येही याची नोंद झाली असल्याने, विश्वास ठेवणे भाग आहे. खरोखरच देवीचा हा चमत्कार मान्य करणे भाग पडते.
वाचकहो, या नवरात्रात देवी हत्तीवर आरुढ होऊन येत आहे. असं म्हणतात की, ज्यावेळी देवी हत्तीवर बसून येते, तेव्हा येणारं वर्ष हे सुख-समृद्धीने पूर्ण असं जातं. एकीकडे सुखाकडे मनुष्याची दृष्टी असते, तशी या देवीच्या उत्सवातून अजून एक महत्त्वाची गोष्ट आपण शिकायला हवी. दुर्गा सप्तशतीच्या सुरुवातीस सुरथ नावाचा राजा आणि समाधी नावाचा व्यापारी, मेधा मुनींकडे येतात. समाधी नावाचा व्यापारी त्यावेळी मुनींना फार व्याकुळ होऊन प्रश्न विचारतो, "अनेकवेळा संसारात अपमानित होऊन, वाईट अनुभव घेऊनही, परत परत माझे मन संसारात गुंतते; तर यावर उपाय काय?” यावर उत्तर म्हणून मेधा मुनी त्यास सप्तशतीचा पाठ सांगतात, देवीचरित्र कथन करतात. व्युत्थान इच्छा, आकांक्षा जरी वाढवीत असले, तरी आपण भौतिक अभिलाषा कमी करून ज्ञानप्राप्ती, संतोषी वृत्ती, समाधान अंगीकारण्यासाठी या व्युत्थानाचा उपयोग केला, तर हिंदुस्थान पुन्हा एकदा खरोखरच अयाचित, अतिशय सबळ आणि म्हणूनच पुन्हा एकदा जगाचे गुरुपद भूषविण्यास समर्थ ठरेल. रामानुजन, कालिदास, छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर अशा महापुरुषांच्या चरित्रात देवीने वेळोवेळी स्वतः दखल घेतलेली आपण ज्यावेळी पाहतो, त्यावेळी त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन अंशतः तरी का होईना, त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न आपण करावयास हवा. उच्च गोष्टींचा ध्यास, आयुष्याचे एक उदात्त ध्येय जोवर मनुष्याला नाही, तोवर देवी पूर्णार्थाने समजू शकेल का? तोवर देवीच काय, हे महापुरुष समजून घेण्यातही आपण चुकाच करीत राहणार. श्री शंकराचा अवमान सहन न होऊन आत्मत्याग करणारी सती असो, अथवा सारे देव गलितगात्र झालेले पाहून त्यांच्या संरक्षणासाठी हाती शस्त्र घेतलेली देवी असो, कृपा हाच तिचा स्थायीभाव आणि सार्या भुवनाचे भय दूर करणे हेच काय ते तिला व्यसन! तिला ओळखण्यासाठी आपण काय केले पाहिजे? तिच्या इच्छा काय असाव्यात? तिला काय हवे, ते कुणी कधी विचारले आहे का?
आपल्या इच्छांवर, वासनांवर आपला जोवर ताबा नाही, जोवर आपल्या अशुद्धीची सततची बोच आपल्या मनांस घरे पाडत नाही, तोवर शुद्धी, सात्त्विकता, प्रसन्नता, आनंद हे आपणास कसे प्राप्त व्हायचे? दुर्गेच्या मंत्रातले ‘र्हिं’ हे बीज पाप कर्माबद्दलची मनातली लाज दाखवते. तेवढे ते बीज आपण रुजत घालू, प्राणपणाने पाळू, त्याला उत्तम संगतीचे पाणी घालू; म्हणजे त्यांस वैराग्याचा कोंब येईल आणि ज्ञानवृक्षाला कल्याणाची पालवी फुटून संतोषाची फळे येतील. देवीला हवे ते हे, हे लक्षात ठेवू. उद्यमेनैव सिद्ध्यति! नमः चंडिकायै॥
आदित्य शेंडे