मोहफुलांतून स्वावलंबनाची वाट दाखवणाऱ्या वंदनाताई

24 Sep 2025 12:00:46

गडचिरोलीसारख्या आदिवासी लोकवस्तीच्या भागात मोहफुलांचे प्रमाण सर्वाधिक. दिवसभर ऊन, पावसाची पर्वा न करता मोहफुले वेचणे हे तिथल्या लोकांच्या रोजीरोटीचे साधन. पण अलीकडे, या मोहफुलांना चांगला भाव मिळत नसल्याने त्यांचा सडा पडलेला असताना त्याकडे कुणी ढुंकूनही बघत नव्हते. मग या मोहफुलांचे करायचे काय? असा प्रश्न वंदनाताईंना पडला आणि त्यांच्या पुढाकाराने आज याच मोहफुलांतून अनेक महिलांना रोजगार मिळतो आहे.


जीवनगट्टा हे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यात असलेले एक दुर्गम आदिवासी गाव. या गावातील वंदना अशोक गावडे या महिलेने पुढाकार घेतला आणि मोहफुलांपासून वेगवेगळी उत्पादने तयार करून त्यांना किंमत मिळवून दिली. केवळ आठवीपर्यंत शिक्षण घेतल्या वंदनाताई आज आदिवासी लक्ष्मी महिला बचत गटाच्या माध्यमातून जवळपास २५ महिलांना रोजगार मिळवून देतात. २ ऑक्टोबर २००४ रोजी आदिवासी लक्ष्मी महिला बचत गटाची स्थापना झाली. सध्या वंदना गावडे या बचत गटाच्या अध्यक्षा आहेत. सुरुवातीला या भागात कोणतेही गृहउद्योग नव्हते. २००६ पासून या बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी गृहउद्योग सुरु केला. सुरुवातीला अंबाडीच्या पानांच्या लोणचे बनवून त्याची विक्री केली. मात्र, आदिवासी भागाचे सोने समजले जाणारी मोहफुले रस्त्यावर पडलेली दिसायची.


तेव्हा या मोहफुलांचा केवळ २५ ते ३० रुपये प्रतिकिलो दर होता. त्यामुळे आपण असे काय केल्यास या मोहफुलांना भाव मिळेल असा प्रश्न वंदनाताईंना पडला. त्यासाठी त्यांनी मध्य प्रदेशात जाऊन अभ्यास केला आणि आजघडीला बचत गटाच्या माध्यमातून त्या मोहफुलांपासून जवळपास २४ उत्पादने तयार करतात. मोहफुलाचे लाडू, पेढा, बर्फी, चटणी, जॅम, चिक्की, लोणचे असे अनेक पदार्थ तयार करून ते विकतात. एवढेच नाही तर दरवर्षी १-२ नवीन उत्पादने तयार करण्याचा त्यांचा मानस असतो.


सुरुवातीला आपली ही उत्पादने कोण घेणार, कोण खाणार, कुठे विकणार? असे असंख्य प्रश्न त्यांच्यापुढे उभे ठाकले. तरीही हार न मानता ही उत्पादने पिशवीत घेऊन त्या आणि त्यांच्या गटातील महिला गावागावात फिरायच्या. लोकांना त्यांची चव द्यायची आणि मग ऑर्डप्रमाणे ती बनवून द्यायची. इतक्या दुर्गम भागात दळवळणाची साधने नव्हती, बाजारपेठ नव्हती शिवाय कच्चा माल कसा आणायचा अशा अनेक अडचणींवर मात करून त्यांनी आपला प्रवास सुरु ठेवला. आपल्या भागातील आदिवासी महिलांना यातून रोजगार कसा मिळेल हे एकच ध्येय डोळ्यापुढे ठेवून त्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवली. वेगवेगळ्या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये जाणे, तिथली सगळी माहिती महिलांना देऊन त्यांच्याकडून वेगवेगळी उत्पादने तयार करून घेणे. एवढेच नाही तर या सर्व अशिक्षित महिलांना सही करण्यापासून तर वजनकाटा हाताळण्यापर्यंत सर्व गोष्टी त्यांनी शिकवल्या. आज विविध शासकीय योजना, कार्यक्रमांच्या माध्यमातून येणाऱ्या ऑर्डरद्वारे त्यांना हवे ते पदार्थ बनवून देतात. दरवर्षी मुंबईतील महालक्ष्मी सरसमध्ये त्यांचा स्टॉल असतो.


२०२१-२२ मध्ये विविध अंगणवाड्यांतून पोषण आहाराकरिता मोहफुलांच्या लाडूंची मागणी करण्यात आली. आज त्यांच्या गटामार्फत त्या गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्हातील ३० आश्रमशाळांमध्ये पोषण आहार म्हणून मोहाचे लाडू पुरवतात. सुरुवातीला या लाडूंचा खप अगदी कमी होता. त्यातून वर्षाकाठी १ लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते. २०१८ ला विविध स्टॉल्सच्या माध्यमातून त्यांच्या उत्पन्नाचे प्रमाण ५ लाख रुपयांपर्यंत झाले. २०१९ ला तेच १० लाखांवर जाऊन पोहोचले. पुढे कोरोनाकाळात त्यांच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी मोहाचे लाडू खाऊ घातले. शिवाय लोकांनाही ते खाण्याचा सल्ला दिला. त्यामुळे कोरोनाकाळात त्यांना मोहाचे लाडू तयार करण्याचे ऑर्डर मिळाले आणि त्यांच्या हाताला काम मिळाले. मोहफुल फक्त दारू काढण्यासाठी उपयुक्त नसून अतिशय उत्तम पोषक द्रव्य त्यात असल्याचे सिद्ध होते.


पुढे २०२१-२२ मध्ये वैभव मडावी नावाचा मुलगा त्यांच्यासोबत जुळला. त्याने उत्पादनांचे लेबलिंग, ब्रॅण्डिंग, प्रत्येक शहरात जाऊन प्रेझेंटेशन देणे यासह ऑनलाईन वेबसाईवर ती उत्पादने अपलोड केलीत. या सगळ्या माध्यमातून त्यांच्या विक्रीत वाढ झाली.


सध्या या बचत गटात २५ महिला कार्यरत असून त्यातील १० महिला या नियमित काम करत आहेत. या बचतगटाची वार्षिक उलाढाल ४० लाखांच्या वर आहे. हा आकडा गडचिरोलीसारख्या भागात निश्चितीच मोठा ठरतो. बाजारात २५ ते ३० रुपये प्रतिकिलोने विकले जाणारे मोहफुल प्रक्रिया केल्यानंतर आता ४५० रुपये प्रतिकिलोने विकले जाते. वंदनाताईंच्या या कष्टामुळे त्यांच्या कौटुंबिक परिस्थितीत सुधारणा झालीच, शिवाय त्यांच्या मुलांनाही चांगले शिक्षण देण्यात हातभार लागला.


वंदनाताई आता वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये जाऊन मोहफुलांपासून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांबाबत विनामुल्य प्रशिक्षण देतात. दसरा, दिवाळी यासारख्या विविध सणांनिमित्त दुकानदारांकडून देण्यात येणाऱ्या रिटर्न गिफ्टकरिता त्या मोहफुलांच्या उत्पादनापासून गिफ्ट हॅम्पर तयार करून देतात.


गडचिरोली जिल्ह्यातील ज्या तालुक्यांमध्ये मोहाफुलांचे उत्पादन होते त्या त्या तालुक्यातील लोकांना प्रशिक्षण देणे आणि त्यांची उत्पादनांची विक्री करणे, हे उद्दिष्ट त्यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. ही उत्पादने इथेच न थांबता संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी आश्रम शाळांमध्ये पाठवण्याची त्यांची ईच्छा आहे.


वंदनाताईंचे पती, मुलगा, मुलगी या सर्वांचा त्यांना त्यांच्या कामात पाठिंबा आहे. शिवाय त्यांच्या बचत गटातील सर्व महिला कायम त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असल्याचे त्या सांगतात. कोणत्याही महिलेने स्वत:ला कमजोर समजू नये. आपण जिद्द, चिकाटी आणि मेहनत करून काम केल्यास कुठलीही गोष्ट अशक्य नाही. प्रत्येक महिलेत कोणता ना कोणता गुण लपलेला असून ती कोणतेही काम सहज करू शकते, असे त्या म्हणतात.

Powered By Sangraha 9.0