
कर्माचा आवेग बंदुकीच्या स्फोटाप्रमाणे जीवरुप गोळीला जन्म घ्यायला लावीलच. कर्म असेपर्यंत जन्म-मृत्यूचे चक्र अबाधित चालू राहील. चांगले कर्म राहिल्यास जीवात्मा चांगल्या कुळात चांगला जन्म घेतो. कर्माची गहन गती आहे आणि त्या त्या कर्मगतीनुसार जन्माचेसुद्धा गहन शास्त्र आहे. म्हणून गीता सांगते,
जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः|
त्यत्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन॥अ.४-श्लो.९॥
कर्मणो ह्यपि बोद्धव्यं बोद्धव्यं च विकर्मणः|
अकर्मणश्च बोद्धव्यं गहना कर्मणो गतिः॥ अ.४-श्लो.१७॥कर्माची गती फार गहन आहे. कर्माच्या व्यक्त आणि अव्यक्त गतीचे जो रहस्य जाणेल, तो जन्म-मृत्यूच्या फेर्यांमधून मुक्त आहे, असे गीता सांगते. उदाहरणच घ्यायचे तर, बंदुकीतील दारूगोळ्याच्या स्फोटाने जर गोळी चलित झाली नाही किंवा त्या स्फोटातून उद्भवणार्या उष्णतेतच जर गोळी विरून गेली, तर ती गोळी बंदुकीच्या बाहेर पडून लक्ष्यभेद करणार नाही. ज्या महान योग्याचे लक्ष कर्मांत नसते, त्याला लक्ष्याचा भेद करण्याची आवश्यकताच नसते. जन्म नसला, तर मृत्यूही नाही. जे जे जन्माला येते, त्याला मरण आहे; पण ज्याला जन्मच नाही, त्याला मरण कसले? चांगले कर्म झाल्यास, चांगल्या कुळात चांगला उन्नत उत्क्रांत जन्म होणे ओघाने आलेच. गीता याबद्दलही सांगते,
पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते|
न हि कल्याणकृत् कश्चित् दुर्गतिं तात गच्छति॥४०॥
प्राप्य पुण्यकृतां लोकानुषित्वा शाश्वतीः समाः|
शुचीनां श्रीमतां गेहे योगभ्रष्टोऽभिजायते॥४१॥
अथवा योगिनामेव कुले भवति धीमताम्|
एतद्धि दुर्लभतरं लोके जन्म यदीदृशम्॥४२॥अ.६॥गीता सांगते, कोणतेही चांगले कर्म वाया जात नाही. चांगल्या कर्माला दुर्गती कधीही प्राप्त होत नाही. उत्तम कल्याणकारी कर्म करून जो योगी मरतो, तो मृत्यूनंतर शूचि म्हणजे शुद्ध व श्रीमतां म्हणजे बुद्धिवान कुळात जन्म घेऊन, पुढील आयुष्यात मुक्तीची वाटचाल चालू ठेवतो. देह आहे तोवर कर्मही आहेच, पण जो कर्मगतीच्या मायेत सापडत नाही तोच मुक्त होय!
गीतेच्या वरील श्लोकांवरून एक महान सिद्धांत प्रस्थापित होतो आणि तो म्हणजे उत्तम कर्मानुसार उत्तम जन्म प्राप्त होऊ शकतो, हा होय. कर्माला धरून संस्कार होतात. जसे कर्म तद्वत् तसल्या कर्माच्या सातत्याला धरून संस्कार होत असतात. म्हणजे उत्तम संस्कारानुसार उत्तम जन्म मिळू शकतो, या एका सरळ सिद्धांतावर आपण येतो. आपण पाहिलेच आहे की, संस्कार ग्रहण करणारे जडशरीर नसून त्यात विद्यमान असणारा जीवात्मा आहे. यावरून संस्कार ग्रहण करणारा जीवात्मा उत्क्रांतीच्या वाटचालीत उत्क्रांत वा अनुत्क्रांत योनी प्राप्त करतो, असा साधारण सिद्धांत यातून निघतो. आजच्या विज्ञानाला हे कितपत मान्य आहे, याचा विचार करणे आवश्यक आहे.
वैदिक परंपरा व डार्विनचे उत्क्रांतशास्त्र डार्विनच्या उत्क्रांतवादाचे मूळ म्हणजे, जगण्यास योग्य तोच जगतो असे आहे. नवीन बदलत्या परिस्थितीशी जे जिवंत शरीर जमवून घेईल, तेच जगण्यास योग्य आहे. एवढेच नव्हे, तर तेच उत्क्रांतीच्या सर्व पायर्या ओलांडून उत्क्रांतीचे वरचे टोक गाठू शकते. हे खरे मानल्यास, जीवात्मा नावाच्या स्वतंत्र अस्तित्वाची आवश्यकताच नसते. जडशरीरच जर आपणहून उत्क्रांत होत असेल, तर जीवात्मा नावाच्या स्वतंत्र अस्तित्वाची गरजच काय? पण आपण हे पाहिले की, जीवात्म्याशिवाय जडशरीराच्या सर्व व्यवहाराचे रहस्य समजणार नाही. जडशरीरालाच केवळ उत्क्रांती लागू पडते असे मानावे, तर समाधी अवस्थेतील योग्याच्या शरीरात कोणतेच शारीरिक कार्य होत नसते. म्हणजे, केवळ प्रकृतीच बाह्य परिस्थितीशी जुळवून घेऊन, आपली उत्क्रांत अशी अवस्था प्राप्त करू शकते, या सिद्धांतानुसार योग्याचे जडशरीर बाह्य जगाशी प्रत्यक्ष संलग्न असूनसुद्धा योग्याच्या त्या समाधीस्थ शरीरात कोणतेही शारीरिक वा उत्क्रांतीचे कार्य घडत नाही. यावरून उत्क्रांतीचा संबंध केवळ जडशरीराशी नसून, त्या शरीराला चालविणार्या जीवात्म्याशी असतो, असे सिद्ध होते.
वरील अनुभवसिद्धांताला सिद्ध करण्यास आणखी एक उदाहरण देता येईल. रेशमाचे सुरवंट खाऊन तृप्त झाल्यावर, झाडाच्या पाचोळ्यात स्वतःभोवती एक कोष तयार करून त्यात आपल्या उर्वरित देहाद्वारे एक प्रकारच्या ग्लानीत जातात. या शरीर ग्लानीत त्यांना बाह्य जगताचे मुळीच ज्ञान नसते. एखादी टिचकी मारल्यानंतर चटकन पळून जाणारे ते सुरवंट कोष काढून उकळत्या पाण्यात टाकले, तरी जागे होत नाहीत! इतकी त्या सुरवंटाला समाधीइतकीच तंद्री लागलेली असते. पण समाधी व ग्लानी अवस्थेत महदंतर असते. समाधी अवस्थेत शरीर शून्य कल्पावस्थेत असते, तर त्या ग्लानी अवस्थेत ते सुरवंट नवीनच देह धारण करते. त्या कोषात ते सुरवंट तसेच काही महिने राहिले, तर त्यापासून फुलपाखरू तयार होते हे सर्वांना माहीत आहे. म्हणजे उत्क्रांतीकरिता जडशरीरासोबत त्यात विराजमान असणार्या जीवात्म्याचीही आवश्यकता आहे, हे यावरून सिद्ध होते.
पाश्चात्य जडसंस्कृतीत वाढलेल्या डार्विनला जडशरीराचा चालक असणार्या जीवात्म्याची माहिती असणे शयच नव्हते, म्हणून त्याने केवळ जडशरीरच उत्क्रांतीला सापेक्ष असते, असा ठोकळ सिद्धांत मांडून दिला. याबाबत आणखी एक उदाहरण देता येईल. उत्क्रांतवादाचे हे सार आहे की, बाह्य परिस्थितीशी जुळवून घेण्याकरिता जीवात अनुकूल फेरबदल होत असतात. मानवी समाजाला पूर्ण उत्क्रांत होऊन साधारणतः २५ हजार वर्षे तरी झाली असतील. त्या कालापासून आदिमानवाने आपल्या डोयावरचे व दाढीचे केस काढण्यास सुरुवात केली कारण, ते केस मानवाला आवडत नव्हते. आवश्यकता नसतानाही आज उत्क्रांत अशा मानवाच्या दाढीमिशा वाढतातच. मृत व्यक्तीचीसुद्धा दाढी मरणोत्तर काळानंतर थोडीतरी वाढतेच; याचे कारण त्या माणसाचे सर्वच शरीर मरत नसते, तर दाढी वाढविण्याकरिता आवश्यक असा त्वचाभाग जिवंत असतो, असे म्हणतात. याउलट समाधीस्थ योग्याचे शरीर महिनोगणती ठेवले, तरी त्याची दाढी वा मिशा वाढत नसतात आणि याचे कारण म्हणजे, योग्याचा जीवात्मा त्या शरीरातच नसून सर्व विश्वाशी एकरुप बनतो. म्हणजे एका अर्थाने योग्याचा जीवात्मा त्या शरीरात नसतो. म्हणूनच उत्क्रांतीचा संबंध जडशरीरासहित जीवात्म्याशीही असतो, या महान सिद्धांतावर आपल्याला यावे लागते.
(क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
९७०२९३७३५