मंदिरे ही एकात्मता व अंतर्चेतना जागृतीची केंद्रे आहेत : सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

24 Sep 2025 17:10:35

मुंबई  : आपली मंदिरे ही फक्त पुण्य कमविण्याची किंवा मागण्याची ठिकाणे नसून अंतर्चेतना जागृतीची केंद्रे आहेत. मंदिर हे मनुष्याच्या अंतर्मनातील चेतना जागृत ठेवते, इतरांचे दुःख दूर करण्याची व समाजसेवेची प्रेरणा देते. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले. उत्तर प्रदेशच्या बरेठी येथे नारायण सेवा संस्थानच्या लक्ष्मी-नारायण मंदिराच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

उपस्थितांना संबोधत सरकार्यवाह म्हणाले, संकट काळात अनेक चांगली कार्ये घडतात. अलीकडे मानवतेपुढे उभ्या राहिलेल्या कोरोना महामारीच्या काळात अनेक संस्थांनी लोकसेवा, रोजगारनिर्मितीचे कार्य केले. संघाच्या स्वयंसेवकांनीही त्या काळात लोकसेवा बजावली. त्याच प्रेरणेतून काही काळानंतर ‘नारायण संस्था’ उदयास आली आणि त्याच संस्थेच्या परिसरात आज आपण एकत्र आलो आहोत.

त्यांनी स्पष्ट केले की समाजात कार्य करणारी संस्था ही तिच्या बँक बॅलन्समुळे मोठी होत नाही, तर संस्थेला चालविणाऱ्यांच्या अंतःकरणामुळे, त्यांच्या मोठेपणामुळे व कार्यांमुळे मोठी ठरते. कोरोना काळात सुरू झालेली ही संस्था आता न्यास झाली असून, विविध उपक्रम करत गावात मंदिराची स्थापना झाली. हीच मंदिरे अंतर्चेतना जागृत करण्यासाठी असतात. मंदिरे शिल्पकला, एकात्मता आणि जनमानस एकत्र आणण्याचे कार्य करतात. मंदिर ही फक्त विटा-पाषाणांची रचना नसून, आगम शास्त्र व शास्त्रोक्त पद्धतीने उभारलेली पवित्र स्थाने आहेत, जी व्यक्तीला परमेश्वरी सत्याशी जोडतात.

मंदिर केंद्रित ग्रामविकासाचे महत्त्व अधोरेखित करत ते म्हणाले, की समाजसेवी अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे मंदिर केंद्रित ग्रामविकासाचा प्रयोग केला. त्यांनीच सांगितले की त्यांना प्रेरणा ही मंदिर केंद्रित व्यवस्थेतून मिळाली. तसेच एका स्वयंसेवकाने सरकारी नोकरी सोडून कर्नाटकातील ९०० वर्षे जुने सीताराम मंदिर स्वच्छ केले, त्याची शिल्पकला पुस्तकातून जनतेसमोर आणली आणि केवळ ५ वर्षांत तो परिसर ग्रामचेतनेचे केंद्र झाला.

गावांचा विकास हा आरोग्य व शिक्षणकेंद्रित व्हायला हवा. पंतप्रधान ग्रामविकास व कुटीरउद्योगाला चालना देत आहेत. संघाचे स्वयंसेवकही हे कार्य करीत आहेत. गावातच शिक्षण, आरोग्यसेवा व रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा. भारताचे पुनर्निर्माण दिल्लीपुरते मर्यादित नसून ते गावागावांतून घडले पाहिजे. “नरसेवा हीच नारायण सेवा आहे”, याच दृष्टीने आपली भूमिका असावी. लक्ष्मी-नारायण म्हणजेच प्रकृती व पुरुष यांचे तादात्म्य आहे. असे सरकार्यवाह यावेळी म्हणाले.


Powered By Sangraha 9.0