इंडोनेशियाची ‘उम्मा’ला चपराक

    24-Sep-2025
Total Views |

संयुक्त राष्ट्रांच्या महासभेच्या अधिवेशनात इंडोनेशियाचे पंतप्रधान प्रबोवो सुबियान्तो यांनी केलेले भाषण हे केवळ औपचारिक राजनैतिक निवेदन नव्हते, तर ते त्यातून इंडोनेशियाच्या प्रगत विचारसरणीचे प्रतिबिंब संपूर्ण जगाला दिसले. ‘सलाम वालेकुम’ने जरी त्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात केली असली, तरीही भाषणाच्या समारोपावेळी सर्वधर्मसमभावाचे आदर्श उदाहरण जगासमोर ठेवताना हिंदू, बौद्ध, ज्यू अशा सर्व धर्म-पंथांच्या शुभेच्छा देऊनच त्यांनी आपला संदेश संपवला. जगातील सर्वांत मोठी मुस्लीम लोकसंख्या असलेल्या देशाच्या नेत्याने, अशापद्धतीने मानवतेचा ध्वज उंचावणे, ही संयुक्त राष्ट्रसंघ आणि जागतिक राजकारणाच्या इतिहासात दुर्मीळ बाबच म्हणावी लागेल.

आज जगामध्ये अनेक मुस्लीमबहुल राष्ट्रांमध्ये, धर्माचा वापर केवळ राजकारणासाठी होताना दिसतो. कट्टरतेच्या नावाखालीच जनतेची मते मिळवली जातात, हिंसेला धार्मिक कोंदण देत जनतेचे समर्थन मिळवले जाते आणि यातूनच पुढे जगामध्ये द्वेषाची बीजे पेरली जातात. जागतिक मुस्लीम समुदायाच्या आजच्या भूमिकेच्या नेमकी उलट भूमिका इंडोनेशियाच्या पंतप्रधानांनी घेतली. त्यांची भूमिका ही पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून, प्रगल्भतेकडे वाटचाल करणारी म्हणावी लागले. केवळ मुस्लीम देशांसाठीच नव्हे, तर संपूर्ण जगासाठी त्यांचा संदेश आज आदर्श आहे.

सुबियान्तो यांनी इस्रायल-पॅलेस्टाईन संघर्षावर मांडलेली भूमिकाही विशेष लक्षवेधी ठरली. इस्रायललाही आत्मसंरक्षणाचा अधिकार आहे, असे सांगत त्यांनी ‘मुस्लीम ब्रदरहूड संकल्पने’च्या आंधळ्या समर्थनाला छेद दिला. मुस्लीम राष्ट्रे साधारणपणे इस्रायल-पॅलेस्टाईन प्रश्नावर एकमुखाने पॅलेस्टाईनचीच बाजू घेतात, यामागे ‘मुस्लीम ब्रदरहूड’ हीच संकल्पना असते. परंतु, सुबियान्तो यांनी त्यांच्या भूमिकांमधून स्पष्ट केले की, शाश्वत शांततेसाठी आवश्यक असलेला न्याय दोन्ही बाजूने समान असणे आवश्यक आहे. सुबियान्तो यांची ही भूमिका केवळ धाडसीच नाही, तर वास्तववादीही आहे.

सुबियान्तो यांनी धर्माच्या नावावर चालणार्या दहशतवादालाही थेट आव्हान दिले. शांततेसाठी इंडोनेशिया २० हजार सैनिक देण्यास तयार आहेत, असे जाहीर करून त्यांनी जबाबदार राष्ट्राची भूमिका बजावली. मुस्लीम जगतातील फारच कमी नेते इतक्या स्पष्टपणे दहशतवादाविरुद्ध उभे राहतात. सुबियान्तो यांचे विधान म्हणजे केवळ शब्दांचा प्रयोग नव्हे, तर दहशतवादाच्या भरणपोषणाला दिलेला ठाम इशारा आहे. याच्या बरोबर उलट परिस्थिती जगातील अनेक देशांत दिसते. धर्मनिरपेक्षतेचा नारा देऊन, प्रत्यक्षात धर्माचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला जातो. मतांच्या गणितासाठी धर्माला ढाल म्हणून वापरले जाते. अशावेळी इंडोनेशियाचे पंतप्रधान आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर उभे राहून मानवतेचा संदेश देतात, ही घटना राजकारणाच्या पातळीवर थेट तुलना करणारी ठरते.

मुस्लीम जगातील आव्हान हे केवळ बाह्य संघर्ष नाही, तर अंतर्गत मानसिकताही आहे. कट्टरतेच्या राजकारणाला खतपाणी घालणार्या प्रवृत्ती, धार्मिक अंधश्रद्धांचा पगडा आणि स्वतःच्या समाजालाच मागे नेणारे निर्णय हे सर्व इस्लामी राष्ट्रांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवत आले आहेत. इंडोनेशियाने मात्र त्या प्रवाहाच्या विरोधात जाण्याचे धाडस दाखवल्यानेच सुबियान्तोंचे भाषण हा शांतीसाठी, मानवतेसाठी आणि सर्वधर्म समभावासाठीचा एक प्रकारचा शंखनाद ठरतो. भारताने कायमच जागतिक समुदायासमोर, ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही संकल्पना जगासमोर मांडली आहे. इंडोनेशियाचा संदेशही या विचाराशी जवळून जुळणारा आहे. दोन्ही देशांनी जागतिक पटलावर शांततेचा आणि सर्वधर्मीय एकतेचा ध्वज फडकावला आहे. या दोन देशांचा अनुभव इतर राष्ट्रांसाठी एक वस्तुपाठच!

सुबियान्तोंच्या भाषणातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, त्यांनी आपल्या देशाच्या मुस्लीम बहुसंख्येचा आधार घेऊन एकतर्फी राजकारण करण्याऐवजी, सर्वधर्मीय स्वीकाराला प्राधान्य दिले. ही गोष्ट त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे स्थान देते. शेवटी एवढेच सांगावेसे वाटते की, सुबियान्तो यांचे भाषण हे मुस्लीम जगताला दिशादर्शक ठरावे. दहशतवाद, कट्टरता आणि स्वार्थी राजकारण यांचा त्याग करून जर धर्माचा खरा अर्थ अंगीकारला, तरच जग शांततेकडे जाईल, अन्यथा, धर्माच्या नावाने राजकारण करणार्यांना इतिहास कधीच माफ करणार नाही!

कौस्तुभ वीरकर