नंदुरबार : काही दिवसांपूर्वी नंदुरबार शहरात दोन युवकांमध्ये बेदम मारहाणीची घटना झाली होती. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या जय वळवी या तरूणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जय वळवी या आदिवासी तरूणाच्या हत्येच्या निषेधार्थ बुधवार २४ सप्टेंबर रोजी नंदुरबार शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला होता. मात्र काही समाजकंटकांनी कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड करून या मूक मोर्चाला हिंसक वळण दिले आहे.
दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र मोर्चात सहभागी झालेल्या काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली आणि जमावामध्ये गोंधळ उडाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जमावावर लाठीचार्ज करत अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला, या घटनेत एक पोलीस अधिकारी, काही पोलीस कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते मालती वळवी देखील जखमी झाल्याची माहिती आहे. सोबतच जमावातील जखमींचा आकडा अद्याप समोर आलेला नाही.
मोर्चाचं नेमकं कारण काय?
जय वळवी या तरुणावर सूर्यकांत मराठे या आरोपीने काही दिवसांपूर्वी चाकूहल्ला केला होता. त्यात जय वळवी गंभीर जखमी झाला होता, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. जय वळवी हा आदिवासी समाजातील असल्यामुळे या घटनेने आदिवासी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आदिवासी संघटनांकडून जय वळवीच्या हत्याप्रकरणाचा खटला न्यायालयात चालवून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी आणि जय वळवीला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.